Cricketer's Political Innings Sarkarnama
विश्लेषण

Cricketer's Political Innings : क्रिकेटचं मैदान गाजविलेल्या खेळाडूंची पॉलिटिकल 'इनिंग'! ; कोण ठरलंय लकी, कोण अनलकी ?

Indian Political News : स्फोटक फलंदाजी आणि आपल्या शेरोशायरीसाठी लोकप्रिय असलेले नवज्योतसिंग सिद्धू हे 2004 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले.

Deepak Kulkarni

सचिन वाघमारे -

Political News : आगामी काळात होत असलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने निवडणूक रिंगणात मात्तब्बर मंडळींना उतरविले आहे. त्यामध्ये काँग्रेसने काही स्टार खेळाडूंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी हैदराबाद शहरातील ज्युबिली हिल्स मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला संधी दिली आहे.

यापूर्वी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली हॊती. मात्र, त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. क्रिकेटनंतर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले कोणते खेळाडू राजकीय आखाड्यात लकी ठरले हे जाणून घेऊ यात.

मोहम्मद अझरुद्दीन यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2009 साली त्यांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून लोकसभा निवडणूक लढवीत विजयश्री खेचून आणली होती. सध्या अझरुद्दीन तेलंगणा काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीनच्या वाट्याला अनेक चढउतार आले.

1990 साली मनगटी फटक्यांद्वारे प्रतिस्पर्धी संघावर राज्य करणारा हा खेळाडू 2000 मध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर खेळातून बाहेर पडला. मात्र 2009 मध्ये त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कीर्ती आझाद हे 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग होते. आझाद सुरुवातीचे काही दिवस भाजपमध्ये होते.बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर ते तीनवेळा निवडून आले. पण फेब्रुवारी 2019 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. किर्ती आझाद हे बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचे पूत्र आहेत.

स्फोटक फलंदाजी आणि आपल्या शेरोशायरीसाठी लोकप्रिय असलेले नवज्योतसिंग सिद्धू हे 2004 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. त्यांनी अमृतसरमधून निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात ही जागा जिंकली. 2014मध्ये सिद्धू यांना पंजाबमधून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्याच वर्षी नेतृत्वाशी मतभेद असल्याचे कारण देत त्यांनी पक्ष सोडला. 2017 मध्ये, ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि पूर्व अमृतसरमधून पंजाब विधानसभेवर निवडून आले.

1981 साली क्रिकेट कारकीर्द संपवल्यानंतर चेतन चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चेतन चौहान उत्तर प्रदेशच्या अमरोहा मतदारसंघातून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले. काहीच महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू होण्यापूर्वी चेतन चौहान उत्तर प्रदेश सरकारमध्ये क्रीडा मंत्री होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 2014 साली सहा वर्षासाठी राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे सहा वर्ष खासदार म्हणून राज्यसभेवर होते. टीम इंडियाचा माजी ओपनर गौतम गंभीरने 22 मार्च 2019 ला भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतून तो लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहिला. या निवडणुकीत विजय मिळवत गंभीर लोकसभेत दाखल झाला.

टीम इंडियाचा क्रिकेटपटू मनोज तिवारी आता राजकारणाच्या आखड्यात उतरला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या(Mamata Banerjee) तृणमूल काँग्रेसने मनोज तिवारला तिकीट दिले. हावडा जिल्ह्याच्या शिबपूर विधानसभा मतदारसंघातून मनोज तिवारी निवडणुक लढवली अन त्याने विजयश्री खेचून आणली. भारताचा माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता त्याने पश्चिम बंगाल विधानसभेत आमदार बनून पदार्पण केले आहे. अशोक डिंडा यानेही पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरत यश मिळवले.

'या' खेळाडूंना स्वीकारावा लागला होता पराभव !

भारताचा आक्रमक फलंदाज मोहम्मद कैफने २०१४ साली काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढली. उत्तर प्रदेशच्या फूलपूरमधून कैफ रिंगणात उतरला होता, पण या निवडणुकीत त्याला पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी हेदेखील काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. मात्र या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यानेही 2009 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकभारती पक्षाकडून मुंबईच्या विक्रोळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला, पण यात त्याला यश आले नाही. भारताचे माजी ऑलराऊंडर मनोज प्रभाकर साध्य भाजपचा सदस्य आहे. मात्र, 1996 साली दिल्लीतुन काँग्रेसच्या तिकीटावर मनोज प्रभाकर यांचा पराभव झाला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT