Rahul Gandhi, Congress's new political strategies.  Sarkarnama
विश्लेषण

Rahul Gandhi Politics : काँग्रेसच्या चुकांना माफी मिळणार का? राहुल गांधींचा मास्टरस्ट्रोक अन् पायावर कुऱ्हाडही...

Congress's Historical Mistakes : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2014 पर्यंत देशात काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता उपभोगली. या सत्ताकाळातील काही निर्णयच आता पक्षाच्या आड येऊ लागले आहेत.

Rajanand More

Rahul Gandhi's Strategic Moves : सलग तीन लोकसभा निवडणुकांसह अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव सहन करावा लागला आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील हे पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागणारे ठरले आहेत. गांधी कुटुंबासाठीही हा मोठा झटका आहे. अजूनही देशात पक्षाला लवकरच अच्छे दिन येतील, असे म्हणण्याजोगीही स्थिती नाही. पण त्यादिशेने पक्षासह राहुल गांधींनीही पावले टाकण्यास सुरूवात केल्याचे मागील काही दिवसांतील घडामोडींवर स्पष्ट झाले आहे. ही पावले म्हणजे पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये थेट 360 अंशांमध्येच बदल केला जात असल्याचे दिसते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2014 पर्यंत देशात काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता उपभोगली. या सत्ताकाळातील काही निर्णयच आता पक्षाच्या आड येऊ लागले आहेत. त्याचा फटका अनेक निवडणुकांमध्य बसला. खुद्द राहुल गांधी यांनी यापूर्वी अनेकदा या चुकांची कबुलीही दिली आहे. भाजपने याच चुकांचे भांडवल करत काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला टार्गेट केले आणि सत्ताही मिळवली. आता पुन्हा राहुल यांच्याकडे या चुकांचा आधार घेत पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

एखादी चूक स्वीकारण्यात मोठेपणा असतो, तुमच्यातील सुधारणांची ती सुरूवात असते, असे म्हटले जाते. तेच धोरण काँग्रेस आणि राहुल यांनी स्वीकारल्याचे दिसते. नुकतीच याची प्रचितीही आली. अमेरिकेतील एका कार्यक्रमादरम्यान शीख तरुणाने राहूल यांना 1984 च्या ऑपरेशन ब्लु स्टारविषयी हटकले. काँग्रेस केवळ शीखांच्या भल्ल्याचा गप्पा मारते, पण अजूनही सज्जन कुमारसारखे अनेक लोक पक्षात असल्याची आठवण या तरूणाने करून दिली. त्यावर राहुल यांनीही काँग्रेसच्या त्या काळात चुका झाल्याची कबुली दिली.

राहुल एवढ्यावरच थांबले नाहीत. त्या चुकांची जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचेही ते म्हणाले. राहुल यांचे हे विधान म्हणजे काँग्रेस आणि त्यांच्या विचारांमध्ये कालानुरूप होत असलेल्या बदलाचे संकेत मानले जात आहेत. हा राजकीय रणनीतीचाही भाग असू शकतो. सातत्याने काँग्रेसच्या चुकांवर बोट ठेवणाऱ्या भाजपच्या हातून मुद्देच काढून घेण्याचाही हा प्रयत्न असू शकतो. पण काँग्रेसला हा वरवरचा मास्टरस्ट्रोक वाटत असला तरी ते आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखेही आहे.

भाजपसारखा पक्ष राहुल यांच्या या विधानाला सहजासहजी घेईल, असे नाही. नेत्यांनी या व्हिडीओवरून पुन्हा राहुल यांनाच टार्गेट करत त्यांच्या जाहीर माफीची मागणी केली. काँग्रेस चूक कबुल केल्याचे सांगत भाजप नेत्यांनी काँग्रेसवर पुन्हा त्यावरून हल्ला चढवला आहे. पण फक्त काँग्रेसच नाही तर भाजपनेही यापूर्वी आपल्या भूमिका वारंवार बदलल्या आहेत. पण भाजपच्या या चुकांना टार्गेट करण्यात काँग्रेसच कमी पडताना दिसत आहे. ताजे उदाहरण म्हणजे, जातनिहाय जनगणनेचे.

राहुल गांधी हे मागील काही महिन्यांपासून सातत्याने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडत होते. त्याला भाजपमधील अनेक नेत्यांनी उघडपणे विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपल्याला फक्त चारच जाती माहिती असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधत होते. भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी तर राहुल यांच्या या मागणीवर टीका करताना ज्यांच्या जातीची माहिती नाही, ते जात जनगणनेची मागणी करत असल्याचे विधान भर संसदेत केले होते. त्यामुळे भाजपचा त्याला विरोध असल्याचे स्पष्ट होते. पण बिहार निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने अचानक जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करत काँग्रेससह सर्वांनाच धक्का दिला.

जातनिहाय जनगणनेवर भाजपची बदललेली भूमिका काँग्रेससाठीही धडा शिकविणारी आहे. काँग्रेसचा इतिहास पाहिल्यास पक्षांतर्गत बदल असोत किंवा सरकारचे धोरणात्मक निर्णय, सतत रेंगाळत ठेवण्याचे धोरण असायचे. त्यामुळे अनेक निर्णय वर्षानुवर्षे झालेच नाहीत. त्याचे धक्के 2014 नंतर जाणवू लागले आहेत. पक्षाच्या ध्येयधोरणांमुळे अनेक नेते सोडून गेले. ज्येष्ठांसह तरूण नेत्यांनीही पक्षाची साथ सोडली. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये एक विधान केले होते. रेसचे घोडे वरातीत आणि वरातीचे घोडे रेसमध्ये... या विधानातून राहुल यांनी पक्षातील नेत्यांबाबतची भूमिका मांडली होती. आता बदलल्या भूमिकेनुसार रेसचे घोडे रेसमध्येच सोडले नाहीत तर मात्र चुकीला माफी नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT