
Security in Jammu and Kashmir Prisons : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये कोम्बिग ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सर्व यंत्रणाला कामाला लागल्या आहेत. पण असे असले तरी सुरक्षा यंत्रणांमुळे आणखी एक आव्हान उभे ठाकले आहे. दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील जेलवर हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडून प्रामुख्याने श्रीनगर मध्यवर्ती कारागृह आणि जम्मूतील कोट बलवाल कारागृहाला टार्गेट केले जाऊ शकते. या तुरूंगांमध्ये अनेक हायप्रोफाईल दहशतवादी तसेच स्लीपर सेलचे सदस्य आहेत.
दहशतवाद्यांना सर्वप्रकारची मदत करण्याची जबाबदारी स्लीपर सेलमधील सदस्यांवर असते. ते थेट दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होत नसले तरी त्यांच्या मदतीशिवाय हल्ले करणेही शक्य होत नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून या तुरुंगांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातील स्लीपर सेलचे सदस्य आणखी सक्रीय झाल्याचे वृत्त होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला असून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून त्याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी जेलमधील निसार आणि मुश्ताक या दोघांची चौकशी करण्यात आली होती. हे दोघे लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी आहेत. त्यांच्या चौकशीनंतर जेलची सुरक्षा वाढविण्यात आल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्सकडे जम्मू आणि काश्मीरमधीलल जेलची सुरक्षाव्यवस्था आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये सीआरपीएफकडून सीआयएसएफकडे ही जबाबदारी देण्यात आली. यापार्श्वभूमीवर CISF च्या महासंचालकांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतल्याचे समजते. सुरक्षा वाढविण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पहलगाम (Pahalgam) हल्ल्यातील दहशतवादी अद्यापही सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत. ते दक्षिण काश्मीरमध्ये लपल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास यंत्रणांकडून कोम्बिक ऑपरेशन राबविण्यात येत आहे. याभागात आणखी दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. जंगलामध्ये आणखी काही दिवस राहण्यासाठी दहशतवाद्यांकडे पुरेशी शस्त्रास्त्रे, अन्न तसेच इतर साधने असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.