Prakash Abitkar-Rahul Desai-A.Y. Patil-k. P. Patil' Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतच होणार राधानगरी-भुदरगड विधानसभेची मोर्चेबांधणी; बिद्रीचा इम्पॅक्ट जाणवणार

Rahul Gadkar

Kolhapur, 21 March : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राधानगरी भुदरगड हा मतदारसंघ महायुतीचे बलस्थान म्हणून ओळखला जाताे. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई असे मतदारांचे पॉकेट असणारे नेते महायुतीत आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून लोकसभेची खेळी खेळण्याचा अंदाज महायुतीतील नेत्यांमध्येच आहे.

महायुतीत आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध माजी आमदार के. पी. पाटील हे विधानसभा निवडणुकीतील विरोधी आहेत. शिवाय ए. वाय. पाटलांचे पालकमंत्री मुश्रीफांसोबत बिनसले आहे. त्यामुळे महायुती शक्तिशाली दिसत असली तरी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कोणत्याही क्षणी याला तडा जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेल्या राधानगरी शहराचे अस्मिता असणारे राधानगरी धरणाने संपूर्ण जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केले आहे, याचीही जाण राधानगरीच्या जनतेमध्ये आहे. मात्र, महाविकास आघाडीचे गटागटांत विखुरलेले नेते एका पंक्तीत बसणार काय? हा कळीचा मुद्दा आहे. मतपेटीपर्यंत जाण्याइतपत हे आव्हान कठीण आहे.

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपला उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना निश्चित केल्याने गेल्या काही निवडणुकांमध्ये लुप्त झालेला काँग्रेसचा कार्यकर्ता या ठिकाणी उघड होण्याची शक्यता आहे. महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी येथील आजी-माजी आमदारांची कुमक त्यांच्या बाजूने राहील. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाल्यास बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची किनार या लोकसभेला कारणीभूत ठरणार यात शंका नाही.

आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार मंडलिक यांच्यातील जिव्हाळा सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मंडलिक हे आबिटकर यांच्याच बाजूने असतील, हा अंदाज आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांची भूमिका काय असणार? हे पाहणे हे महत्त्वाचे असणार आहे.

अनेक वर्षांनंतर काँग्रेसला (Congress) हक्काचा उमेदवार मिळाल्याने पक्षाला उभारी येईल. शरद पवार यांच्याही नावावर प्रेम करणारे कार्यकर्तेही इथे आहेत. शेकाप, जनता दल असे पक्ष जातीयवादाच्या विरोधात आहेत. महायुतीतील विद्यमान आमदार, दोन माजी आमदार, राष्ट्रवादी अजित पवार गट हे आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून एकदिलाने लढतील का? हा प्रमुख मुद्दा असेल. दुसरीकडे शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) विरोधात कोण? या प्रश्‍नावरही समीकरणे ठरतील. राधानगरी तालुक्यात भावनिक वातावरण निर्माण होऊ शकते.

बिद्री कारखाना (Bidri Sugar Factory) निवडणुकीचा प्रभाव अद्यापही कायम आहे. भाजपचे नेते समजितसिंह घाटगे यांनीही राधानगरीत संपर्क ठेवला आहे. राधानगरी, भुदरगड हे पूर्ण तालुके आणि आजरा असे दुर्गम तालुक्यातील हे चित्र आहे. अतिदुर्गम परिसरात प्रचार यंत्रणा राबवणे आव्हानात्मक असले तरीही महाआघाडीचे उमेदवार निश्चित धरून प्रचाराची यंत्रणा आतापासूनच सुरू झाली आहे. या उलट विरोधी महायुतीचे उमेदवार निश्चित नसल्याने कमी वेळात लोकांपर्यंत पोहोचणे हे आव्हान ठरेल. विधानसभेला ज्यांच्याकडून शब्द आणि पाठबळ मिळण्याचे वचन मिळेल त्यांचीच झोळी लोकसभेला भरेल याचा अंदाज आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT