Raghav Chadha Sarkarnama
विश्लेषण

Raghav Chadha News : राघव चड्ढांकडून भाजपला ठेंगा; विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच 'सोशल' दणका

Raghav Chadha Social Media, BJP Social Media, BJP Punjab : आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेवर पाठवत राघव चड्ढा यांना पहिल्यांदाच मोठी संधी दिली होती. दरम्यानच्या काळात त्यांची सोशल मीडियातील लोकप्रियता प्रचंड वाढली होती.

Rajanand More

BJP leaders update : सोशल मीडियात कोट्यवधी फॉलोअर्स असलेल्या मोजक्या भारतीय नेत्यांमध्ये भाजपचे खासदार राघव चड्ढा यांचे नाव घेतले जाते. मागील काही वर्षांत देशाच्या राजकारणावरही सोशल मीडियाचा मोठा प्रभाव दिसतो. निवडणुका जशा प्रत्यक्ष मतदारांसमोर जाऊन लढविल्या जातात, तशाच आता सोशल मीडियातील प्रचारातूनही लढविल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेक नेते या व्यासपीठावर सक्रीय असतात. पण कोट्यवधी फॉलोअर्स असूनही चड्ढा यांचा सध्याचा सोशल कनेक्ट भाजपसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

मागील काही महिन्यांत इंडिया आघाडीकडून सातत्याने केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना टार्गेट केले जात आहे. मतचोरीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले जात आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सत्ताधारी आम आदमी पक्षाविरोधात मोहिम उघडली आहे. गुन्हेगारी, अमली पदार्थांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. पण या सर्वच बाबतीत चड्ढा यांनी सोशल मीडियात भाजपला जणू ठेंगा दाखविल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियातील चड्ढा यांच्या मागील काही दिवसांतील पोस्ट पाहिल्या तर हे प्रकर्षाने जाणवते. एकीकडे भाजपमधील बहुतेक नेते विरोधकांवर तुटून पडत असताना कोट्यवधी फॉलोअर्स असलेले चड्ढा मात्र अत्यंत शांत आहेत. विशेष म्हणजे ते ज्या राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत, त्या पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. भाजपने त्यांना जाहीरनामा समितीत स्थान दिले आहे. असे असूनही चड्ढा यांची मागील काही दिवसांत पंजाबमधील आप सरकारविरोधात एकही पोस्ट नाही.

आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेवर पाठवत राघव चड्ढा यांना पहिल्यांदाच मोठी संधी दिली होती. दरम्यानच्या काळात त्यांची सोशल मीडियातील लोकप्रियता प्रचंड वाढली होती. प्रामुख्याने त्यांच्या फॉलोअर्समध्ये तरुणाईचा भरणा आहे. यापार्श्वभूमीवर राज्यसभेत गेल्यानंतर चड्ढा यांनीही तरुणाई आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे मुद्दे राज्यसभेत उपस्थित करून त्याकडे सरकारचे लक्ष वेधले. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांचे फॅन फॉलोअर्स वाढण्यावर झाला.

राघव चड्ढा यांच्यासारखा सोशल मीडियात सक्रीय असलेला, एकदाही सत्तेची चव न चाखता आलेल्या पंजाबमध्ये निवडणूक नियोजनात काम केलेला अनुभवी नेता भाजपला हवाच होता. या राज्यासह भाजपला इंडिया आघाडीविरोधातही जमिनीवरील लढाईप्रमाणेच सोशल मीडियातील लढाईही लढायची आहे. विरोधकांचे नॅरेटिव्ह फोल ठरिवण्यासाठी अनेक नेते झटतही आहेत. पण त्यात राघव चड्ढा कुठेही दिसत नाही. राजकीय वर्तुळात याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT