Rahul Gandhi latest news : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या खांद्यावर बंदू ठेऊन ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टार्गेट करत आहेत. मागील काही दिवसांत सातत्याने रस्त्यावर उतरत सरकारविरोधात रान उठवत आहेत. त्यांचे लक्ष २०२९ च्या लोकसभा निवडणुकीकडे आहे. देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण एकीकडे विरोधी पक्षातील नेत्यांची एकजुट करत असताना काँग्रेसच्या नेत्यांमधील मतभेदांचे काय? याकडेही त्यांना गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी पक्षातील नेत्यांची एकजुट, पदाधिकारी-कार्यकर्त्यांमधील समन्वय, संघटनात्मक ताकद आणि त्याचा योग्यप्रकारे वापर करून घेणे महत्वाचे असते. २०१४ नंतर काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी झाली आहे. अनेक नेते पक्षाला सोडून गेले आहे. पक्षाची जेमतेम चार राज्यांत सत्ता आहे. पण असे असले तरी अनेक राज्यांमध्ये काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. दोन राज्यात मित्रपक्षांची सत्ता आहे. इंडिया आघाडीत असलेले काही पक्षही ताकदवान आहेत.
सर्वांची घटट् मोट बांधण्याची मोठी कसरत राहुल गांधी यांना करावी लागणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी नेत्यांची एकजुट महत्वाची आहे. मागील काही दिवसांत पक्षाने दिल्लीत काढलेल्या मोर्चांमध्ये ही एकजुट काही प्रमाणात दिसत आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील काँग्रेस आमदार, खासदार, पदाधिकारी सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये नेत्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. पण हा उत्साह, ही एकी निवडणुकांमध्ये दिसत नाही. काँग्रेससाठी प्रत्येक निवडणुकीत हीच मोठी डोकेदुखी ठरली आहे.
पुढील वर्षी पंजाब, उत्तर प्रदेशसह आणखी तीन राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. या दोन्ही राज्यांमध्ये नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पंजाबमध्ये तर माजी मुख्यमंत्र्यांनीच प्रदेशाध्यक्षांविरोधात दंड थोपटले होते. त्यामुळे पक्षाला प्रदेशाध्यक्ष बदलावे लागेल. आधीच निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. उत्तर प्रदेशातही नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यातच मावळत्या प्रदेशाध्यक्षांविरोधात नाराजी समोर आली. सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातही वेगळे चित्र नाही.
मतभेद नको, एकजुट हवी
पक्षांतील नेत्यांच्या मतभेदांमुळे काँग्रेसला निवडणुकीत अपेक्षित यश मिळत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये यापूर्वी हे पाहायला मिळाले आहे. पक्षातील नेतेही ते मान्य करतात. महाराष्ट्रातील पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतच्या मतभेदांबाबत पक्षातील नेत्यांसोबत जाहीरपणे भाष्य केले होते. हे मतभेद संपविण्यासाठी दिल्लीतून आलेल्या नेत्यांसमोर पहिले पाऊल पुढे टाकले. हे मतभेद संपल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यावेळी धानोरकरही तिथे उपस्थित होत्या. भाजपचे सरकार हटविण्यासाठी हे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
खरंतर वडेट्टीवार हे बोलून गेले असले तरी पक्षातील नेत्यांच्या एकजुटीसाठी ते खूप महत्वाचे आहे. त्यांचे हे विधान 'बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात' ठरू नये, अशीच काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा असेल. इतर नेत्यांनीही तोच आदर्श घेत आपआपसातील राजकीय भांडणे मिटवून निवडणुकीला सामोरे जाणे आवश्यक आहे. एकटे राहुल गांधी पुन्हा पक्षाचीच सत्ता कधीच आणू शकणार नाही. त्यांना एकजुटीने सर्व राज्यांतूनही रसद मिळणे गरजेचे आहे. पुढीलवर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत नेत्यांची एकजुट दिसणार की 'पुन्हा पहिले पाढे पंचावन्न' या म्हणीप्रमाणे मतभेद पाहायला मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.