ठाकरे बंधूंची एकत्रित कामगिरी: राज आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले, ज्यामुळे सरकारला हिंदी सक्तीचे जीआर मागे घ्यावे लागले.
राजकीय वातावरणात हालचाल: स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा रंगली असून आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे.
राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल: राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती, मुख्यमंत्री फडणवीस, व भाजपवर जोरदार टीका करत हिंदी लादण्याच्या धोरणाचा तीव्र विरोध केला.
Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूनी विजयी मेळावा घेतला. त्यामुळे महायुती सरकारपुढील अडचणीत भर पडली आहे. राज-उद्धव ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरल्याने फडणवीस सरकारला हिंदी सक्तीचे दोन जीआर मागे घ्यावे लागले होते. त्यानंतर ठाकरे बंधूनी एकत्र येत २० वर्षानंतर विजयी मेळावा घेतला. त्यामुळे राज्यातील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना राजकीयदृष्ट्या युती करणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना काही मुद्द्यावरून टार्गेट केले जात आहे. त्यामुळे मीरा भाईंदर येथील सभेप्रसंगी राज ठाकरेंनी या टीका करणाऱ्यांच्या बोलण्यातील हवाच काढली आहे. विशेषता हिंदी सक्ती करण्याबाबत महायुती सरकारवर कोणाचा दबाव आहे का? असा सवाल करीत धारेवर धरले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षांनी आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच राजकीय पक्षाकडून एकमेकावर आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच वातावरण तापले आहे. त्यातूनच आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकमेकांवर टीका करण्यात आली. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला असल्याचे सांगत आता येत्या काळात निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळी निवडणुका जवळ येतात, तेव्हा काही लोक मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याची भीती दाखवतात. हे केवळ जनतेच्या भावना भडकवण्यासाठीच केले जाते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत कोणाचे न नाव न घेता केली.
दुसरीकडे कुणाचा बाप, त्याचा बाप, आजा-पंजा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते. त्यामुळे या मुद्द्यांवरून येत्या काळात वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. त्यातच संधी मिळताच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मीरा भाईंदर येथील सभेतून त्यांच्यावर नाव न घेता केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे.
राज ठाकरे यांनी यावेळी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा, मी त्यांना सांगतो की तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू. सरकारला हिंदी सक्तीची करून आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी करावी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीची सक्ती सोडून हिंदीच्या सक्तीसाठी प्रयत्न करतोय ? कोण दबाव आणत आहे तुमच्यावर? केंद्राचे हे धोरण पूर्वीपासूनचे आहे, असा हल्लाबोल करीत त्यांनी सीएम फडणवीसांवर पीएम मोदी, अमित शाह यांचा दबाव आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
भाषा कोणतीही वाईट नसते, पण ती भाषा सक्तीने लादणे खपवून घेणार नाही. आमच्यावर लादणार असाल तर आम्ही नाही बोलणार. लहान मुलांवर तर नाहीच लादू देणार नाही असे राज ठाकरे यांनी स्पष्ट करीत येथे व्यवसायाला आलेल्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे, माज करू नये, आम्ही तुमच्याशी मराठीतच बोलू. मराठी माणसाला स्वतःहून काही करायची गरज नाही, कुणाच्या अंगावर जायची गरज नाही पण समोरचा कुणी माज घेऊन आला तर ठेचायचाच, असा इशारा त्यांनी दिला.
हिंदुत्वाच्या आडून तुम्ही मराठी संपवायला येणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही. हे हिंदवी स्वराज्य व्हावे, असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य होते, हिंदूवी नव्हे, हिंदवी. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे राज्य केलेला हा महाराष्ट्र आहे. येथे आमच्यावर बाहेरच्यांनी येऊन राज्य नाही करायचे. मराठी माणूस या ठिकाणचा मालक असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी महायुती सरकारची कोंडी केली आहे.
ठाकरे बंधू एकत्र का आले?
– हिंदी सक्तीविरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.
सरकारने हिंदी सक्तीचे निर्णय मागे का घेतले?
– जनआक्रोश आणि ठाकरे बंधूंच्या विरोधामुळे सरकारला जीआर मागे घ्यावा लागला.
राज ठाकरे सरकारवर कशासाठी टीका करत आहेत?
– ते हिंदी सक्ती व बाह्य राजकारणाच्या दबावावरून टीका करत आहेत.
या घडामोडींचा पुढील निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
– ठाकरे बंधूंची एकजूट महायुतीसाठी मोठी अडचण ठरू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.