Mohol News: सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन पाटील यांनी नगरपंचायतीचे 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. तसेच सून प्राजक्ता पाटील यांचं नगराध्यक्षपद फिक्स करत अनगरचे 'किंग' आपणच असल्याचं विरोधकांना दाखवून दिलं.
पण राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपप्रवेश केल्यानंतरचा पहिल्याच विजयी जल्लोषावेळी राजन पाटील (Rajan Patil) यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच चॅलेंज केले. 40 वर्षे राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलेल्या राजन पाटलांचे चिरंजीव बाळराजे पाटील अजितदादांवर एवढे का भडकले, त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान देण्यापर्यंत मजल गेली. पण पवार-पाटील कुटुंबाच्या या वादाची ठिणगी विधानसभा निवडणुकीवेळी पडली होती.
यंदाच्या निवडणुकीत राजन पाटलांच्या साम्राज्याला प्रथमच आव्हान दिलं गेल्यानं आतापर्यंतच्या बिनविरोधच्या परंपरेला ब्रेक लागला होता. अनगरच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायतीसमोर जल्लोष केला. यावेळी पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज केले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नामुष्कीजनक टीकेनंतर उमेश पाटील हे पक्षापासून दुरावले होते. त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा देत उमेश पाटील यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून तत्कालीन आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांचा पराभव करण्याचा पण उमेश पाटील यांनी मांडला होता.
त्यासाठी त्यांनी पक्षापासून हरकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांच्यासाठी आपली ताकद पणाला लावली होती, त्यात त्यांना मोहोळमधील सर्वपक्षीय नेत्यांचीही साथ मिळाली होती. या सर्व कारणांमुळे राजू खरे हे अवघ्या पंधरा दिवसांत आमदार म्हणून निवडून आले. उमेश पाटील यांनी यावेळी राजन पाटील यांचे वर्चस्व मोडीत काढले होते.
पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवासांतच उमेश पाटील यांनी आपण अजितदादांच्या बरोबर असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर उमेश पाटील यांनी देवगिरी बंगल्यावर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ज्या कारणामुळे उमेश पाटील हे पक्षापासून लांब गेले होते, ते मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांसोबत कायम होते. त्यामुळे उमेश पाटील यांनी राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव केला आहे, त्यामुळे स्थानिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कारण एकाच म्यानात दोन तलवारी किती दिवस राहणार,हीच चर्चा मोहोळच्या राजकारणात सुरू होती.
उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेशमध्ये प्रवेश केल्यामुळे माजी आमदार राजन पाटील यांची डोकेदुखी पुन्हा वाढली होती. कारण, या दोन पाटलांमधील संघर्ष,कुरघोडीचं राजकारण थांबलेलं नव्हतं. शिवाय विधानसभेला पराभव झाल्यामुळे राजन पाटील गटही आक्रमक झाला होता. त्याचमुळे य सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळमधील उमेश पाटील आणि राजन पाटील हे दोन राष्ट्रवादीचे मातब्बर नेते एकाच छताखाली किती दिवस राहणार, हाच खरा प्रश्न होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभवासाठी ताकद लावलेल्या उमेश पाटलांना अजितदादांनी पुन्हा पक्षात घेतल्यानंतर राजन पाटील प्रचंड दुखावले होते. उमेश पाटलांना मानाचं पान देत अजितदादांनी राजन पाटलांच्या जखमेवर मीठच चोळल्याची चर्चा मोहोळच्या राजकारणात होती. यशवंत मानेंचा मोहोळमधला पराभव आणि त्याला जबाबदार असलेले उमेश पाटील हे दोन्ही राजन पाटलांच्या डोक्यात गेले होते.
अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राजन पाटील यांनी भाजपची वाट धरली. मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच फिल्डिंग लावत राजन पाटलांचा मोठा जाहीर भाजप प्रवेश घडवून आणल्याची चर्चा होती. पण भाजपमध्ये पाऊल ठेवताच राजन पाटलांनी अनगरच्या नगरपंचायतीत आपलं वर्चस्व दाखवून दिलं. अनगरची नगरपंचायत जिंकल्यानंतर राजन पाटील आणि त्यांच्या दोन चिरंजीवांनी आपली सगळी खदखद बाहेर काढत थेट अजितदादांनाच टार्गेट केलं.
गेली 40 वर्षे अनगर (Angar) या ग्रामपंचायतीवर राजन पाटलांचं एकहाती वर्चस्व राहिलं होतं. या गावात आजतागायत कधीच निवडणूक लागली नव्हती. अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. त्या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.
आतापर्यंतच्या परंपरेनुसार अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा पाटील समर्थकांना होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता.यामुळे अनगरचं राजकारण प्रचंड तापलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.