NCP Rajya Sabha Nomination Analysis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभा उमेदवारीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव निश्चित मानले जात होते. नवनीत राणांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र, भुजबळ यांचेच नाव अंतिम होईल अशी चर्चा होते.
पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांच्या समोर येत राज्यसभेचे उमेदवार म्हणून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ हे देखील होते. भुजबळ यांचे नाव अंतिम असल्याच्या चर्चा असताना जैन यांच्या नावाच्या घोषणनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, जैन यांच्या निवडीमागे चार मोठी कारणं आहेत.
छगन भुजबळ यांनी आपण राज्यसभेवर गेलो तर आपला पुतण्या समीर यांना मंत्रिपदाची संधी द्यावी. त्यांना तातडीने मंत्रिमंडळात घ्यावे, अशी अट घातली. मात्र, हा मुद्दा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांकडे गेला तेव्हा त्यांनी दिल्लीत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, असे सांगितले.
त्यातच केंद्रातील नेत्यांकडून या अटीला रेड सिग्नल असल्याचे समोर आले. त्यामुळे समीर भुजबळ यांचा लगेच मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वेगळ्याच नावाची चर्चा सुरू झाली.
नवनीत राणा या भाजपमध्ये आहेत. मात्र, त्यांनी राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न देखील सुरू केले होते. त्यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तर एकदा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती.
अगदी उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशी (रविवारी) सकाळी त्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली. मात्र, राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या नावाला विरोध करण्यात आला.
पक्षाच्या बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी देऊ नये, असे त्यांचे मत होते. नुकतेच पक्षात प्रवेश केलेल्या पुण्यातील व्यावसायिक विक्रम काकडेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. त्यानंतर पुन्हा बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली पक्षातील कार्यकर्ते नाराज होतील, असा मतप्रवाह निर्माण झाला. त्यामुळे राणा यांचे नाव मागे पडले.
राजेंद्र जैन हे प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. जैन यांनी पटेल यांचे पीए म्हणून आपल्या कारकीर्द सुरू केली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी मागे पटेल हेच असल्याचे सांगितले जात आहे.
मागील काही काळापासून पटेल यांचे पक्षातील महत्त्व कमी होत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, अजूनही पक्षात आपल्या शब्दाला किंमत आहे, असा संदेश त्यांनी राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळवून देत दिला. त्यांच्याकडूनच जैन यांच्या नाव पुढे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जैन हे पक्षासोबत कायम राहिलेले आहेत. पक्षसंघटनेत त्यांना काम करण्याचा अनुभव आहे. बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्यापेक्षा जैन यांना उमेदवारी दिला तर कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल, असा तर्क जैन यांच्या उमेदवारी बाबात लावला गेल्याचे बोलले जात आहे.
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज संस्थेतून विधान परिषदेवर राजेंद्र जैन यांनी दोनदा नेतृत्व केले आहे. गोंदिय जिल्हा बँकेत मागील 19 वर्षांपासून संचालक असून सलग दोन वेळा अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. विदर्भात भाजपची मोठी ताकद आहे.
तेथे काँग्रेस त्यांचा मुख्य विरोधक आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहेत. भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादी शक्तीशाली होती तेथे देखील आता भाजपने आपली ताकद वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील नेत्याला ताकद दिली तर पक्ष संघटना मजबूत होईल, असे विचारप्रवाह पुढे आला त्यातून राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.