Rajesh Vitekar Sarkarnama
विश्लेषण

Rajesh Viteakar Vishleshan : लोकसभेला माघार घेतलेल्या विटेकरांना अजितदादांचे मोठं बक्षीस

Sachin Waghmare

Maharashtra Politics : सरपंचपदापासून, बाजार समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेले राजेश विटेकर हे अजित पवारांच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जातात. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कमी मताने पराभव स्वीकारावे लागलेले विटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांना खंबीरपणे साथ देण्याचे ठरवले.

विटेकरांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज होते. मात्र, त्यांनी नाराजी दाखवली नाही. त्यांनी निष्ठेने महादेव जानकर यांचा प्रचार केला. त्यांनी निष्ठेने केलेल्या कामाचे फळ लगेचच मिळाले. अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिली अन त्यांना निवडूनही आणले.

राजेश विटेकर यांचे व्यक्तिमत्त्व मितभाषी आहे. त्यासोबतच सहजतेने संवाद साधण्याची त्यांची शैली युवावर्गाला आकर्षित करणारी आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व असल्याने शेतीविषयक प्रश्नांची त्यांना जाण आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले राजेश विटेकर यांचे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील विटा हे त्यांचे मूळ गाव आहे.

राजेश विटेकर हे चिंतामणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असतात. प्रतिष्ठानतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. श्री छत्रपती शिवाजीमहाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था उभारून विद्यार्थी व विशेषतः विद्यार्थिनींच्या शिक्षणाची सुविधा निर्माण केल्या. महातपुरी, नरवाडी, विटा या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत.

राजेश विटेकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात गंगाखेड बाजार समितीपासून झाली. 2005 मध्ये विटा या गावाचे सरपंच म्हणून त्यांची निवड झाली. 2007 मध्ये जिल्हा परिषद गटातून त्यांनी विजय मिळवत जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला. 2005 ते 2022 या कालावधीत सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापती होते. 2014 मध्ये त्यांची परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान संचालक आहेत.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. पक्षनेतृत्वानेही त्यांच्या कर्तृत्वाला वाव देत परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. विटेकर यांनीही पक्षनेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत कडवी झुंज देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत विटेकर पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय जाधव यांची दुसरी टर्म होती. शिवसेना-भाजप युतीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ कायमच शिवसेनेकडे राहिला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCp) आघाडीमध्ये परभणीची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढवली. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. संजय जाधव यांना 5,38,941 मते मिळाली, तर राजेश विटेकर यांना 4,96,742 मते प्राप्त झाली.

केवळ 42,199 मतांच्या फरकाने राजेश विटेकर यांचा पराभव झाला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आलमगीर खान यांना तब्बल 1,49,946 मते मिळाली. शिवसेनेचा बालेकिल्ला आणि नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान उमेदवाराविरोधात दिलेली ही लढत चर्चेचा विषय बनली होती. मतविभागणीमुळे त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर विटेकर 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करीत होते. त्यावेळी अचानक महायुतीमध्ये ही जागा रासपला सुटली. त्यांनी केलेल्या तयारीवर पाणी पडले. उमेदवारी न मिळाल्याने ते काही काळ नाराज होते. मात्र, त्यांनी नाराजी दाखवली नाही. त्यांनी निष्ठेने महादेव जानकर यांचा प्रचार केला. त्याच प्रचार सभेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेची उमेदवारी विटेकर यांना देणार असल्याचे आश्वसन सर्वांसमोर दिले होते. अजितदादांनी त्यांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. विटेकरांना विधान परिषदेची उमेदवारी दिली व निवडूनही आणले.

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची संघटनात्मक बांधणी मजबूत होऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी राजेश विटेकर c यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे विशेषतः मराठवाड्यात पक्षाला मोठे यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. परभणी जिल्ह्यातच नव्हे तर येत्या काळात संपूर्ण मराठवाड्यात पक्षवाढीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT