Swabhimani Shetkari Sanghatana: शेतकऱ्यांची नाळ ओळखून चळवळीत उतरलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या दहा वर्षात 'बॅकफूट'वर आली. या संघटनेची शेतकरी वर्गांवरील मजबूत पकड हळूहळू ढिली होत गेली अन् सत्ताधाऱ्यांवरील राजकीय प्रभाव कमी झाला. त्याला मागील दोन लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि समीकरणांचा परिणाम जबाबदार आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ मजबूत केली आहे. या आंदोलनात शेतकरी बांधला गेल्यामुळे सातत्याने सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण होत आहे. संपूर्ण महाविकास आघाडी या आंदोलनात उतरली असताना केवळ शेट्टी यांनाच महायुतीकडून टार्गेट केले जात आहे.
2019,2024 अशा दोन लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व माजी खासदार राजू शेट्टी बरेच भरकटलेले दिसले. कदाचित राजकीय परिस्थितीनुसार किंवा बदलत्या समीकरणामुळे 2014 च्या निवडणुकीत महायुती सोबत तर 2019 च्या निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत सलगी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, 2019 च्या निवडणुकीत शेट्टी यांना स्वतंत्र लढावे लागले. दोन्ही पराभवामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राजकीय आधार मिळाला नाही. त्यामुळे या निर्णयाचा फटका त्यांना नक्की बसला.
पण अगदी लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांची राजकीय भूमिका पाहिली तर इकडे कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक तर सांगलीमध्ये संजय काका पाटील हे लोकसभेला पराभूत झालेले उमेदवार आहेत. मात्र, मागील दोन वर्षात ते कोणत्याच मुद्द्याला धरून राजकारणात सक्रिय नसल्याचे चित्र आहे.
स्वाभिमानी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोणताच पराभव मनाला लावून धरला नाही. उलट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका आणखी तीव्र करत विविध प्रश्नावर आवाज उठवला आणि त्यातूनच पुन्हा एकदा भरकटलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टिकली पाहिजे या माध्यमातून त्याला बळ दिलं.
या दोन लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला आक्रमकपणा कायम ठेवला. ऊस दर असो, काजू शेतकऱ्यांचे प्रश्न असो अथवा सोयाबीन दरा संदर्भातील आंदोलनात शेतकरी संघटनेने आपला दबदबा कायम ठेवला आहे.तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना मूळ मुद्द्यावर आली आहे.
केवळ मुद्द्यावरच आली नाही तर राज्याच्या राजकारणात नागपूर ते गोवा या पट्ट्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस पट्ट्यात आपली भूमिका कायम ठेवून महत्व वाढवून होती. पण यंदा पहिल्यांदाच विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळ मिळत आहे.
यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र सोडला तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये ऊस दराचा प्रश्न हा नगण्य होता. त्यामुळे मराठावाडा आणि विदर्भात स्वाभिमानीची म्हणावी तशी ताकद निर्माण झाली नव्हती. आता मात्र शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादन होणार असल्याने शेतकऱ्यांचा ओढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीकडे वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेट्टी यांना राज्यभर नेतृत्व साध्य करण्याची संधी या महामार्गाच्या विरोधी आंदोलनामुळे मिळाली आहे
आतापर्यंत राजू शेट्टी दूध आणि उसाच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवत होते. मात्र त्यांनी विविध प्रश्नावर देखील आवाज उठवायला सुरुवात केली आहे. शक्तिपीठ महामार्गातील नागपूर ते गोवा पर्यंत बारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना या माध्यमातून पोहचली आहे.
मुळात ज्या पद्धतीने शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरले आहेत त्यांचा एक राजकीय विरोध म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांचा झाला आहे. ज्या तीव्रतेने राजू शेट्टी आपल्या चळवळीला घेऊन शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उतरले आहेत त्या तीव्रतेने राजकीय नेते उतरलेले दिसत नाहीत.
या आंदोलनात ज्या पद्धतीने शेट्टी सक्रिय झाले त्या पद्धतीने इतर नेते सक्रिय न झाल्याची दिसत आहे त्याचं सर्वात महत्त्व कारण म्हणजे शेतकऱ्यांना बांधून ठेवण्याचं मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे नाही.
ज्या तीव्रतेने महाविकास आघाडीचे नेते शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात उतरताना दिसले त्या पद्धतीने त्यांची भूमिका ठराविक वेळे पुरतेच मर्यादित आहे की काय असा सवाल कालच्या घटनेमुळे उपस्थित होत आहे. शक्तिपीठ आंदोलनामुळे राजू शेट्टी यांच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. मुळात शेट्टी यांच्यामुळेच या आंदोलनाला धार आहे.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शेती यांच्या बाबत केलेले वक्तव्य हे शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत होते. मात्र त्याचा निषेध करण्यासाठी केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरताना दिसली. किमान शेतकरी संघटनेच्या निदर्शने आणि आंदोलनात महाविकास आघाडीतील पक्षांनी सहभाग घेतला असता तर सहाजिकच स्वाभिमानीच्या आंदोलनाने राज्य सरकारवर आणखीन प्रभाव पडला असता.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या वक्तव्यावर शेट्टी यांनी ते आपल्यासाठी गौण आहेत असे वक्तव्य करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांची मनी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात वळवली आहेत. गेल्या चार दिवसांपासून संघटना केवळ क्षीरसागर यांच्या विरोधात उभी राहिली.
मात्र, शेट्टी यांनी हे वक्तव्य करून पुन्हा एकदा संघटनेला शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात उभे केले आहे. कोल्हापूर सांगली सोलापूर ज्या पद्धतीने शेट्टी यांनी वजरमूठ बांधली आहे तो फोडण्याचा प्रयत्न कुठेतरी महायुतीकडून होतं आहे. अशा अलीकडच्या काही घटनांमधून समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.