Maharashtra Rajya Sabha news : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यातील सात जागांपैकी महायुतीचे सहा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. तर एका जागेवर महाविकास आघाडीचा विजय निश्चित मानला जात आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने चार उमेदवारांची नावे जाहीर करत एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, २०२२ मधील घडामोडींकडे मागे वळून पाहिल्यास भाजप पाचवा उमेदवारही देऊ शकते. असे झाल्यास महाविकास आघाडीची आपला एकमेव उमेदवार निवडून आणताना दमछाक होऊ शकते.
काय घडलं होतं २०२२ मध्ये?
2022 मध्ये राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. सुरूवातीला भाजपने दोन नेत्यांना उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते. तर शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. सहावी जागा निवडून आणण्यासाठी सेनेकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. सेनेला अपक्षांसह इतर छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार होती.
महाविकास आघाडीकडून चार उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली जात असतानाच भाजपने सहाव्या जागेसाठी अचानक धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर करत धक्का दिला. भाजपने आधीच पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची नावे फिक्स केली होती. पण सहाव्या जागेसाठी महाडिकांना मैदानात उतरवत भाजपने आघाडीला आव्हान दिले. या निवडणुकीत संजय पवार यांना पराभूत करत महाडिक निवडून आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी ठरली होती. सुहास कांदे यांचे मत अवैध ठरलं होतं, तर राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मतदानात सहभागी होता आले नव्हते. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे महाडिकांनी विजयी गुलात उधळला होता.
सध्याची स्थिती काय?
सध्या महायुतीकडे सहा उमेदवार निवडून येतील, एवढे संख्याबळ आहे. त्यामध्ये भाजपचे चार आणि शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार असेल. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पण आघाडी कोण उमेदवार देणार, यावर भाजपची पुढील रणनीती अवलंबून राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी दिल्यास भाजप उमेदवार देणार नाही. मात्र, पवारांऐवजी काँग्रेस किंवा ठाकरेंचा उमेदवार मैदानात असल्यास भाजप २०२२ प्रमाणे ऐनवेळी उमेदवार देऊ शकते.
भाजपने पाचवा उमेदवार उतरविल्यास सात जागांसाठी आठ उमेदवार होतील. असे झाल्यास निवडून बिनविरोध होण्याचा मार्ग बंद होईल. भाजपकडील सध्याचे संख्याबळ पाहता त्यांना आपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. महायुतीचे सहा उमेदवार निवडून आल्यानंतरही काही मते शिल्लक राहतात. त्या जोरावर भाजपकडून महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी २०२२ चा हवाला दिला जात आहे. मात्र, त्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागेल. महाविकास आघाडीची मते फोडून भाजप आपला पाचवा उमेदवार निवडून आणू शकते, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. त्यामुळे आघाडीकडूनही शरद पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.