Mumbai News : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना हटविण्याबाबत मागील काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांची यामागे महत्वाची भूमिका असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. 15) नगरपरिषदेच्या कायद्यामध्ये सुधारणा करून नगरसेवकांकडूनच नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्याची तरतूद केली आहे. या सुधारणेचे अध्यादेश निघताच काही तासांत मोठ्या घडामोडी घडल्या आणि कर्जतच्या नगराध्यक्षांविरोधात प्रस्तावही दाखल झाला.
नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात 13 नगरसेवकांनी बुधवारी (ता. 16) अविश्वास ठराव जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दाखल केला आहे. नवीन तरतुदीनुसार हा ठराव दाखल झाला असून विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आहे.
अविश्वास ठराव आणणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे आठ आणि काँग्रेसचे तीन आणि भाजपच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्याकडून पडद्यामागून सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा आहे. राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी मागील काही दिवसांपासूनच तयारी सुरू झाली होती. पण कायद्यातील तरतुदींमुळे तांत्रिक अडथळा निर्माण झाला होता.
मंत्रिमंडळाने मंगळवारी हा अडथळा दूर केला. कायद्यातील सुधारणेनुसार निवडून आलेल्या सदस्य संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येने सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी दहा दिवसांच्या आत विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल. पूर्वी निवडून आलेल्या निम्म्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर शासनस्तरावरून नगराध्यक्षांना पदावरून हटविण्याचा कार्यवाही होत होती. आता कायद्यातील सुधारणेमुळे हा अधिकार सदस्यांनाच मिळाला आहे.
मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांना हटविण्यासाठीच्या तरतुदीत बदल करण्यास आणि अध्यादेश काढण्यास मान्यता दिल्यानंतर काही तासांतच घडामोडी घडल्याचे दिसते. त्यानंतर बुधवारी अध्यादेश निघाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका रात्रीत नेमकं काय घडलं, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केवळ काही तासांत एवढ्या घाईत अध्यादेश निघाल्यानंतर लगेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. त्यामुळे हा प्रस्ताव दाखल करणाऱ्या नगरसेवकांपर्यंत लगेच अध्यादेश कसा पोहचला, यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रा. राम शिंदे यांच्याकडून रोहित पवार यांची कर्जत नगरपंचायतीमधील सत्ता घालविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींना महत्व प्राप्त झाले आहे.
राजकीय घडामोडींमागे कोण, याचे उत्तर राम शिंदे यांचे ट्विटर हँडल पाहिल्यानंतर लगेच मिळते. मंगळवारी मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांना हटविण्याबाबतच प्रस्तावसह एकूण सात प्रस्तावांना मंजुरी दिली होती. बहुतेक मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी या सर्व निर्णयांची माहिती ट्विट केली आहे. मात्र, राम शिंदे यांनी केवळ नगराध्यक्षांबाबतची माहितीच ट्विट केली आहे. इतर निर्णय त्यांच्य हँडलवर दिसत नाहीत. तसेच 30 मार्चनंतर थेट 15 एप्रिललाच म्हणजे 15 दिवसांत हे एकमेव ट्विट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.