Atul save Sarkarnama
विश्लेषण

SIT Inquiry : सांगली, चंद्रपूरसह चार बॅंकांतील गैरव्यवहारची एसआयटीमार्फत चौकशी : सहकारमंत्र्यांची विधान सभेत घोषणा

सावे यांनी प्रथम सीआयडी चौकशीच्या मागणीला आढेवेढे घेतले. मात्र, बागडे यांनी वर्मी घाव घालताच सहकार मंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणाच करून टाकली.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधानसभेत आज सांगली, सातारा, चंद्रपूर, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील गैरव्यवहाराची चर्चा झाली. आमदार संजय सावकारे यांनी सांगली बॅंकेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या चर्चेत आमदार सुभाष देशमुख, राम सातपुते, प्रकाश आबीटकर, हरिभाऊ बागडे व अन्य एका आमदाराने भाग घेतला. आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी प्रथम सीआयडी चौकशीच्या मागणीला आढेवेढे घेतले. मात्र, बागडे यांनी वर्मी घाव घालताच सहकार मंत्र्यांनी या बॅंकांमधील गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणाच करून टाकली. (Sangli, Chandrapur including four banks to be probed by SIT : Atul save)

संजय सावकारे यांनी विधानसभेत म्हणाले की, सांगली जिल्हा बॅंकेमधील गैरव्यवहाराचे प्रकरण मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेत मांडले होते. त्यावर आता पहिल्यांदा उत्तर आलंय की सरकारने जानेवारी २०२३ मध्ये या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अजूनही सांगली जिल्हा बॅंकेची चौकशी झालेली नाही. चौकशीला दिरंगाई कशामुळे होत आहे. कोणत्या अधिकाऱ्यामुळे ही दिरंगाई होत आहे. त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि ती किती दिवसांत पूर्ण करणार, असा प्रश्न सावकारे यांनी उपस्थित केला होता.

त्यावर सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, आमदार मानसिंग नाईक व इतर नऊ जणांच्या तक्रारीवरून १४ सप्टेंबर २०२१ रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पुणे सहकार आयुक्तांनी याबाबत समितीही नियुक्त केली होती. मात्र, सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब व्होनमोरे यांच्या विनंतीनुसार तत्कालीन सहकार मंत्र्यांच्या आदेशावरून स्थगिती देण्यात आली होती.

पडळकरांनीही केली होती विधान परिषदेत मागणी

आमदार गोपीचंद पडळकर यांनी यांसदर्भात विधान परिषदेत नव्याने चौकशीची मागणी केली हेाती. त्या मागणीनुसार आम्ही पुन्हा ३० डिसेंबर 2022 रोजी सहकार विभागाने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठवली आणि नव्याने चौकशीचे आदेश दिले होते. तीन महिन्यांत चौकशीचा अहवाल सादर करावा, असा आदेश आज आम्ही पुन्हा दिले आहेत. तो अहवाल आल्यानंतर आम्ही तो विधानसभेत सादर करू, असे सहकार मंत्री सावे यांनी सांगितले.

आम्ही कुणाच्याही दबावाखाली नाही

निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून सांगली जिल्हा बॅंकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या आणखी एका आमदाराने केली. त्यावर सहकार मंत्री सावे म्हणाले की आमच्याकडे सांगली, सातारा, चंद्रपूर, नाशिक या जिल्हा बॅंकेच्या चौकशी मागणी आली असेल तर त्यांची चौकशी लावण्यात येईल. आम्ही कुणाच्याही दबावाखाली नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

राम सातपुतेंचा चंद्रपूर बॅंकेबाबत प्रश्न

आमदार राम सातपुते यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची चौकशी सीआयडीमार्फत करणार का, असा प्रश्न उपस्थित केला. ज्या बॅंकांची तक्रार सहकार विभागाकडे आली आहे, त्यांच्या चौकशीचे आदेश दिले जातात. चंद्रपूर, सांगली, सातारा, नाशिक या सर्व बॅंकांच्या चौकशीचे आदेश आपण दिले आहेत. सीआयडी चौकशीच्या आदेशाचे अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होऊ शकते. नाही तर आपण संबंधित बॅंकांवर प्रशासक नेमू शकतो, असे उत्तर सावे यांनी दिले.

सहकार अधिकारी एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करतात : बागडे

बॅंकांच्या गैरव्यवहाराच्या चर्चेत आमदार प्रकाश आबीटकर, आमदार हरिभाऊ बागडे यांनीही चर्चेत भाग घेतला. बागडे म्हणाले की, बॅंकांतील गैरव्यवहाराची चौकशी सहकार अधिकाऱ्यांकडून केली जाणार असेल तर ते एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. कितीही भ्रष्टाचार होऊ द्या. कितीही खरं असूद्या. ते संबंधितांना निर्दोष सोडल्याशिवाय राहणार नाहीत. त्या बॅंकांमधील गैरव्यवहाराची चौकशी सीआयडी अथवा अन्य यंत्रणांच्या मार्फत करणार आहात, असा सवाल केला.

सहकार मंत्र्यांची घोषणा

बागडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सहकार मंत्री सावे म्हणाले की, हरिभाऊ बागडे यांनी जी मागणी केली आहे. आपल्या सर्वांची मागणी असेल तर सीआयडी किंवा एसआयटीमार्फत चौकशी करायला सहकार विभागाला कोणतीही हरकत नाही. एसआयटीच्या माध्यमातून आम्ही सांगली, चंद्रपूर, सातारा आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी केली.

सुभाष देशमुखांच्या प्रश्नाचे उत्तर सहकार मंत्र्यांकडे नाही

सांगली जिल्हा बॅंकेतील शेतकरी सोडून जे साखर कारखानदार, सूत गिरणी यांची किती कर्जे आहेत. जे थकबाकीदार आहेत, पण त्यांनी कारखाने विकूनही थकबाकी भरलेली नाही आणि त्यांची नावे जाहीर करता, असा प्रश्न सुभाष देशमुख यांनी विचारला. त्यावर सध्या माझ्याकडे ही माहिती नाही. पण ती घेऊन मी पटलावर ठेवण्याची व्यवस्था करतो, असेही उत्तर सावे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT