Local Body Election Vishwajeet Kadam, Sangram Singh Deshmukh, Arun Lad, Prithviraj Deshmukh sarkarnama
विश्लेषण

Akhara Mini Ministry : लावा ताकद! कडेपूर जिप गटात भाजप विरूद्ध काँग्रेस लढाई फिक्स; देशमुख विरुद्ध कदम थेट लढत

Local Body Election : सांगलीत जिल्ह्यासह राज्यात सध्या मिनी मंत्रालयाचा आखाडा राजकीय कुस्तीसाठी सज्ज झाला आहे. येथे राजकीय पैलवान तेल लावून मैदानात उतरणार असून कोण बाजी मारणार हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.

Aslam Shanedivan

Sangli Kadegaon : संतोष कणसे

सांगलीत सध्या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी शड्डू ठोकला आहे. स्थानिकच्या मोर्चे बांधणीच्या तयारीला आता वेग असून आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. पण कडेपूर जिल्हा परिषद गटात थेट लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेसमध्येच होणार आहे. येथे डॉ. विश्वजित कदम, संग्रामसिंह देशमुख, अरुण लाड, पृथ्वीराज देशमुख यांच्या जोडण्या निर्णायक ठरणार आहेत.

कडेपूर जिल्हा परिषद गट हा भाजपचा बालेकिल्ला असून आतापर्यंत येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत झाली आहे. पण सातत्याने भाजपने हा गड अबाधित ठेवला आहे. गतवेळच्या निवडणुकीत येथे भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख विरुद्ध तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सत्यजित यादव अशी चुलत बंधू मध्येच सामना झाला होता. ज्यामध्ये भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांनी बाजी मारली होती. आताही आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत येथे काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना पाहावयास मिळणार आहे. पण नेमके काय आरक्षण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण याकडे सध्या लक्ष न देता भाजप आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. कडेपूर गटात राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. येथे कडेपूर, हिंगणगाव बुद्रुक, उपाळे मायणी, अमरापूर, ढाणेवाडी, उपाळे वांगी, कोतीज, खेराडे विटा, हणमंतवडीये, अमरापूर, चिखली, तोंडोली, सोहोली, भिकवडी खुर्द, अशी गावे येतात. यामुळे सर्वच राजकीय नेतेमंडळींचा तालुक्यात वावर वाढला आहे. विविध समारंभ, विवाह समारंभांना नेतेमंडळीची उपस्थिती वाढली आहे. तसेच इच्छुकांची सलगी कार्यकर्ते आणि नेतेमंडळींशी वाढवलेली दिसत आहे.

गतवेळच्या निवडणुकीत येथे भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांनी बाजी मारली होती. त्यांनी जिल्हा परिषदेत भाजपचे सत्तेचे गणित जुळून आले होते. यामुळे पहिल्यांदाच कडेपूर गटातून विजयी झालेल्या संग्रामसिंह देशमुख यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून संधी मिळाली होती. त्यांनी या त्यावेळी या संधीचे सोनं करत जिल्हा परिषदेत अनेक उपक्रम राबवले होते. ज्यामुळे सांगली जिल्हा परिषदेचा राज्यभरात नावलौकिक वाढवला होता. तर येथील दिव्यांग अभियान राज्य शासनाने राज्यभरात राबवले होते. मतदार संघच माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचाच असल्याने संग्रामसिंह देशमुख व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी निधी खेचून आणत विकासकामांवर भर दिली होती.

पण आता काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येथे ताकद लावली आहे. त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून कडेपूर जिल्हा परिषद गटातील गावा गावात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. विकास निधीच्या माध्यमातून आणि संपर्कातून भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच यावेळी काहीही झाले तरी कडेपूर जिल्हा परिषद गटात काँग्रेस झेंडा फडकवायचाच असाच कानमंत्र कार्यकर्त्यांना कदम यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमिवर सध्या कदम यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा जोर वाढवला आहे. तर दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या कार्यकाळात मंत्रिपदाच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांची येथे फौज निर्माण केली होती. यामुळेच आता येथे काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार अरुण लाडही मैदानात

दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड देखील कडेगाव तालुक्यात चाचपणी करत आहेत. येथे राष्ट्रवादीची ताकद जेमतेम असली तरीही कडेपूर गटात राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आधीपासूनच पक्षाची बांधणीकडे लक्ष दिले होते. कडेगाव तालुक्यात संपर्क वाढवण्याकडे लक्ष दिले आहे.

यामुळे आगामी स्थानिकच्या निवडणुकीत कडेपूर जिल्हा परिषद गट भाजप आपला बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी तर काँग्रेस हा गट आपल्याकडे खेचण्यासाठी ताकद लावताना दिसेल. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटही आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसेल. यामुळे येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पण विश्वजीत कदम आणि अरूण लाड यांच्यात तडजोड झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास ते भाजपसाठी जड जाऊ शकते. पण काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT