Sangli Shirala Zilla Parishad Election Politics sarkarnama
विश्लेषण

Sangli Politics : सांगली उत्तरमध्ये मिनी मंत्रालयाचा आखाडा तापणार? पक्षापेक्षा स्वतःचे अस्तित्व टिकवण्यावर नेत्यांचा भर

Shirala Zilla Parishad Election : सांगली जिल्ह्यातील राजकीय हॉटस्पोट सध्या शिराळा बनले आहे. येथे आगामी स्थानिकसाठी नेते पक्षापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाच्या लढाईसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Aslam Shanedivan

शिवाजीराव चौगुले

Sangli : पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण हे पक्षीय नसून ते गटातटाचे आहे. यामुळेच येथे पक्ष नाही तर आधी गटाला महत्व दिलं जाते. यामुळेच आगामी स्थानिकमध्ये देखील गटा-तटाचे राजकारण दिसून येईल. सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागातील जिल्हा परिषद गट व गणाला देखील विशेष महत्त्‍व प्राप्त झालेलं असेल. कारण येथे सक्रीय असणारे गट.

उत्तर भागात माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. येथे अनेकवेळा नाईक विरुद्ध नाईक असा संघर्ष झालेला आहे. गत निवडणुकीत वाकुर्डे गणातून पंचायत समितीचे माजी सभापती सम्राटसिंह नाईक यांनी आपले राजकीय बस्तान बसवले आहे. वाकुर्डे जिल्हा परिषद गटात मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा विरुद्ध महायुती (भाजपचे आमदार सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे भगतसिंग नाईक) असा सामना रंगणार असे प्राथमिक चित्र आहे. पण ऐनवेळी पक्षापेक्षा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी गटाचे राजकीय समीकरण जुळण्याची दाट शक्यता आहे. गत निवडणुकीतील मित्र या निवडणुकीत राजकीय शत्रू म्हणून एकमेकांसमोर येतीच अशीच शक्यता आता आहे.

वाकुर्डे गटाअंतर्गत वाकुर्डे व पाचुंब्री हे दोन गण आहेत. गतवेळी वाकुर्डे गटात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असा आघाडीचा धर्म पाळत माजी आमदार मानसिंगराव नाईक व आमदार सत्यजित देशमुख यांनी भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. त्यावेळी दोन्ही गटांमार्फत प्रत्येकी दोन गट वाटून घेतले होते. त्यावेळी वाकुर्डे आणि मांगले हे दोन गट मानसिंगराव नाईक यांना तर कोकरूड व प. त. वारुण गट सत्यजित देशमुख यांच्याकडे होते.

त्यामुळे वाकुर्डे गटाची उमेदवारी मानसिंगराव नाईक यांच्याकडून आशाताई झिमूर यांना तर भाजपची उमेदवारी शिवाजीराव नाईक यांच्याकडून पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयराव कांबळे यांच्या पत्नी सुरेखा कांबळे यांना दिली होती. शिवसेनेकडून सुनंदा झिमुर यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये आशाताई झिमूर ह्या विजयी झाल्या होत्या.

वाकुर्डे गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सम्राट नाईक यांच्याकडून भाजपच्या सत्यजित नाईक यांना तर पाचुंब्री गणातून भाजपच्या सारिका पाटील यांच्याकडून काँग्रेसच्या पौर्णिमा श्रीकांत मोरे यांना पराभूत व्हावे लागले होते. शिवाजीराव नाईक यांना फक्त पाचुंब्री गणातील एका उमेदवारावर समाधान मानावे लागले होते.

मात्र आता या मतदारसंघाचे चित्र बदलले असून पूर्वी काँग्रेसचे असणारे सत्यजित देशमुख आता भाजपचे झाले आहेत. शिवाजीराव नाईक यांनी भाजप, काँग्रेस व्हाया अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगतसिंग नाईक यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. मानसिंगराव नाईक यांनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडलेली नाही. त्यामुळे येथील लढत ही सध्य स्थितीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र जाणवत आहे.

मात्र, ऐनवेळी पक्षीय राजकारण बाजूला जाऊन एकाचा विचारधारेच्या गटांची मजबूत बांधणी होण्याची शक्यता आहे. तशा राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. कारण सत्यजित देशमुख हे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांच्यावर भाजपची मोठी जबाबदारी आहे. शिवाय याच मतदारसंघातील सम्राट महाडिक यांच्यावर भाजपने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्याने दोघांना या मतदारसंघात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे. या मतदारसंघातून गतवेळी शिवसेना लढली होती. त्यावेळी सेनेची ताकद नगण्य होती. मात्र, आता भगतसिंग नाईक यांच्यामुळे काही प्रमाणत सेनेला बळ मिळाले आहे. महायुतीत पक्ष तीन आणि उमेदवारी एक असे चित्र आहे.

राजकीय व्यूव्हरचना सुरू

या मतदारसंघावर नेहमीच शिवाजीराव नाईक यांच्या गटाचा दावा असतो. मग ही जागा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला सोडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या मतदारसंघावर आपली पक्कड ठेवण्यासाठी प्रत्येक जण आतापासून राजकीय व्यूव्हरचना आखू लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT