Mohite Patil-Shahaji Patil Sarkarnama
विश्लेषण

Sangola Politics : शहाजीबापू मोहिते पाटलांविरोधात आक्रमक का? विधानसभेच्या राजकीय गणितांची भीती की आणखी काय...?

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 April : सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. परवाच्या सांगोल्याच्या सभेत तर त्यांनी हद्द सोडली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच शिवराळ भाषेत मोहिते पाटील यांच्यावर टीका केली. पण, शहाजीबापू हे मोहिते पाटील यांच्या विरोधात एवढे आक्रमक का झाले आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य पडला आहे. त्यामागे त्यांचे आगामी विधानसभेचे राजकीय गणित असून, त्यात त्यात अकलूजचे मोहिते पाटील हे निर्णयायक भूमिका बजावू शकतात, हे त्यांच्या ध्यानात आले आहे, त्यातूनच ते मोहिते पाटील यांच्यावर तोंडसुख घेत सुटले आहेत.

शहाजीबापू पाटील हे अस्सल ग्रामीण ढंगातलं मोकळं ढोकळं व्यक्तिमत्त्व. माणदेशी बोलीभाषेतील अचूक संवादफेक यामुळे ते विशेष चर्चेत आले आहेत. गुवाहाटीला तर 40 ते 42 आमदार गेले होते. पण, शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) ‘काय झाडी....काय डोंगार... काय हाटील’मुळे राज्यभर प्रसिद्ध झाले. माढ्यातून तिकीट वाटपाचा मुद्दा आला, तेव्हा शहाजीबापू खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहिले. त्याला कारण तसेच आहे. तो पूर्वइतिहास लक्षात ठेवूनच शहाजी पाटील हे अकलूजच्या मोहिते पाटील (Mohite patil) यांच्या विरोधात सुसाट सुटले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगोला (Sangola) येथे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 28 एप्रिल) रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सभा झाला. त्या सभेत मोहिते पाटील यांच्यावर बोलताना शहाजीबापूंनी शिवराळ भाषा वापरली. गेली 40 वर्षे मोहिते पाटील यांनी मला घरात बसवलं आहे. मोहिते पाटील हे आता मैदानात सापडले आहेत, त्यांना आता सोडायचं नाही, असा इशारा त्यांनी दिला. बोलण्याच्या ओघात शहाजी पाटील हे रणजितसिंह मोहिते पाटील यांना निवडून द्यायचं आहे, असे बोलून गेले. व्यासपीठावरील लोकांनी त्यांना निंबाळकर अशी आठवण करून देताच मोहिते 40 वर्षे माझ्या मागं लागलेत, डोक्यातूनच निघेनात. तिच्या..... दमवून टाकत आहेत मोहिते....’ अशी शिवराळ भाषा शहाजीबापूंनी वापरली.

लंकेत रामाने रावणाला बाण मारला अन्‌ रावण लंकेत मेला. पण, त्या रावणाचा आत्मा भरकटत भरकटत अकलूजला येऊन पडला. अकलूजला रावण जन्माला आला आणि आमच्या उरावर येऊन बसलाय. आता रावण पुन्हा जन्माला घालू नका आणि आपल्या तालुक्याचे वाटोळे करू नका, असे सांगताना मोहिते पाटील यांना उद्देशून रावणाचा उल्लेख केला. त्यामुळे शहाजीबापू पाटील हे मोहिते पाटील यांच्याविरोधात एवढे आक्रमक का झाले आहेत, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्याचे उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित असल्याचे दिसून येते.

शहाजी पाटील हे 1990 पासून निवडणुका लढवत आहेत. त्यांना 1995 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकण्यात यश आले. त्यानंतर 2019 मध्ये दुसऱ्यांदा त्यांना निवडणूक जिंकता आली, तीही अवघ्या 768 मतांनी. पुढे गणपतराव देशमुख नसतानाही त्यांना 2019 ची निवडणूक प्रचंड कठीण गेली होती. माळशिरस मतदारसंघातील 22 गावे मतदारसंघ पुनर्रेचनेत सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आली होती.

मोहिते पाटील आणि गणपतराव देशमुख यांच्यातील संबंध सलोख्याचे होते. त्यामुळे राज्यात कोणतेही राजकीय समीकरण जुळले तरी सांगोल्यात मोहिते पाटील यांची ताकद गणपतराव देशमुख यांच्या पाठीशी कायम असायची. त्यामुळे माळशिरसच्या 22 गावातील मतं एकगठ्ठा गणपतआबांना मिळायची. त्यामुळे कितीही ताकद लावली तर शहाजीबापूंच्या पदरी पराभव कायम असायचा. ती सल शहाजी पाटील यांच्या मनात गेली तीस ते चाळीस वर्षांपासून बोचत आहे. नीरा उजव्या कालव्यातून सांगोल्याला कमी पाणी यायचं आणि त्यावर सांगोल्याचे लोकप्रतिनिधी कधीही बोलत नाहीत. पाणी आणि मतांसाठी दोघांमध्ये सेटलमेंट होतं, असा आरोप शहाजी पाटील यांचा असायचा.

मागील निवडणुकीत तर शिवसेनेची उमेदवारी, भाजपची (भाजपमुळे मोहिते पाटील यांची मत मिळाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही ) साथ. राज्यातील राष्ट्रवादी शेकापसोबत असली तरी सांगोल्यात दीपक साळुंखे हे शहाजी पाटील यांच्यासोबत होते. तरीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 768 मतांनी शहाजी पाटील विजयी झाले होते.

आताही आगामी विधानसभेची भीती शहाजी पाटील यांना आहे. ती 22 गावे आता सांगोल्या जोडलेली नसली तरी सोलापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगोल्यातही मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग आहे, त्यामुळे मोहिते पाटील समर्थक साहजिक शेकापच्या देशमुखांना साथ देणार. त्यातच डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी गेल्या पाच वर्षांत शेकापची जोरदार बांधणी केली आहे, त्यामुळे शहाजीबापूंपुढे कडवे आव्हान असणार आहे. त्यातच मोहिते पाटील यांची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे शहाजीबापू पाटील यांनी मोहिते पाटील यांच्याविरोधात तलवार उपसल्याचे मानले जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT