Prakash Ambedkar Sarkarnama
विश्लेषण

Ambedkar On Sharad Pawar: शरद पवार महाराष्ट्रापुरते सीमित; आणखी काही राजकीय घडामोडी घडणार; आंबेडकरांचा रोख कोणाकडे?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं राजकारण हे महाराष्ट्रात सीमित आहे, असं मी मानतो. दुसऱ्या राज्यात राजकारण करायला तेथील नेते सक्षम आहेत. तसेच, राज्यात आणखी काही राजकीय घडामोडी घडणार आहेत, असेही सूचक विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. (Sharad Pawar is limited to Maharashtra: Prakash Ambedkar)

ॲड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी पवारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या बाहेर शरद पवार (Sharad Pawar) हे नेत्यांमध्ये ओळखले जातात. लोकांमध्ये त्यांना ओळख नाही. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे हे माहिती घेतील. त्यानंतर ते आपल्या सर्वांना सांगतील. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दर १५ दिवसांनी आमच्या बैठका होत आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा येथील दंगलीसंदर्भात पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी दंगलीसंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचे म्हटले होते. मग, पवारांनी ते पुरावे का दिले नाहीत. ते दिले असते तर पुण्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात दिलं असतं आणि संभाजी भिडे यांच्यावर कारवाई झाली असती. तसेच गांधी यांच्यावरील विधान आज आलं नसतं. अर्धवट कारवाई करून सोडून देण्याचं राजकारण सर्वांनी सोडून दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे.

शरद पवार हे एनडीएसोबत की इंडिया या आघाडीसोबत हे समजायला काही गोष्टी घडल्या पाहिजेत. काही घटना घडणार आहेत, हे मला माहिती आहेत, त्यामुळे त्या घडल्यानंतर मी त्यावर बोलेन, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांना आव्हान

संभाजी भिडे बोलवता धनी कोण आहे, या प्रश्नावर आंबेडकर म्हणाले की, भिडे यांच्यासोबत आमचा संबंध नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही म्हणत राहिले. भाजपच्या किती संघटना आहेत, त्यांच्या ६१ हजार संघटना आहे, त्यांच्याशी आमचा संबंध नाही, हे तुम्ही जाहीर करायला सुरुवात करा. तेव्हा मी तुम्हाला पकडायला सुरुवात करतो, असे आव्हान आंबेडकर यांनी फडणवीसांना दिले.

बीआरएसने आमच्यासोबत यावं

भारत राष्ट्र समिती तेलंगणात भाजपच्या विरोधात लढत आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात येऊन जर भाजपच्या विरोधात ते मदत करत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. पण बीआरएसकडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. कोण कोणाची बी टीम आहे, हे बोलणं बंद केलं पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT