Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Video Sharad Pawar News : वय झाले वगैरे सब झूट; शरद पवार पुन्हा पायाला भिंगरी लावून फिरणार

अय्यूब कादरी

Lok Sabha Election Result : विविध पक्ष लोकसभा निवडणुकीतील जय-पराजयाची कारणमीमांसा करत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला मिळालेल्या यशाच्या कौतुकात फार न अडकता पवार यांनी पुन्हा पायाला भिंगरी लावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ncp) फूट पडली त्यावेळी शरद पवार यांच्या वयाचे दाखले देण्यात आले होते. आता त्यांचे वय झाले आहे, त्यांनी बाजूला व्हावे आणि आम्हाला संधी द्यावी, या अर्थाने ते दाखले होते. वय आपल्यासाठी अजिबात 'मॅटर' करत नाही हे शरद पवारांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा तशी तयारी केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलाही पायाला भिंगरी लावून फिरणार असल्याचा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे. (Sharad Pawar News)

शरद पवार (Sharad Pawar) संपले, अशी हाकाटी त्यांच्या विरोधकांकडून सातत्याने देण्यात आली. गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि ते लोक विरोधकांना जाऊन मिळाले. त्यामुळे शरद पवारांना विरोधाच्या तीव्रतेची धार वाढली. कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा न करता, आवाज न वाढवता, कोणावरही मर्यादा सोडून टीका न करता शरद पवार यांनी विरोधकांचे आणि स्वकियांचेही हल्ले परतवून लावले.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने दहा जागा लढल्या आणि त्यापैकी आठ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आणि पक्षातून फुटून गेलेल्यांच्या पदरी निराशा पडली.

शरद पवार हे वयाच्या 84 व्या वर्षात आहेत. पक्ष फुटला त्यावेळी सर्वकाही संपले अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांनी हार मानली नाही की मैदान सोडले नाही. या वयातही ते धाडसाने रस्त्यावर उतरले. लोकसभा निवडणुकीत त्यांना बारामती मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची खेळी भाजपकडून (Bjp) खेळण्यात आली, मात्र शरद पवार त्या खेळीला पुरून उरले. त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या.

माढा मतदारसंघात त्यांनी आखलेल्या डावपेचांची भाजपने कल्पनाही केली नसेल. माढ्यातून शरद पवार पळाले, अशी टीका भाजपने त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी केली होती. त्याच माढ्यात पवार यांनी भाजपला चारीमुंड्या चीत केले.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, पक्षाला चांगले यश मिळाल्याचे कौतुकही झाले. पवार त्यात फार अडकून पडले नाहीत. लोकसभेचा विषय संपवत त्यांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. बुधवारी त्यांनी इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्याची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

दुधाला दर नाही, दुधाचे अनुदान खात्यावर जमा होत नाही, पिण्याचे पाणी नाही, चाऱ्याची टंचाई आहे आदी तक्रारी शेतकऱ्यांनी मांडल्या. सत्ताधाऱ्यांकडे आपण या अडचणी मांडू, मात्र ते याकडे लक्ष देतील की नाही, हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना सत्ता दिली आहे, त्याचा ते किती वापर करतात, हे पाहावे लागेल, असे पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

सध्याचे सरकार शेतकरीविरोधी आहे किंवा त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही, असे पवार यांनी यानिमित्ताने सांगून टाकले आहे. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना हवी तशी धोरणे आखता येत नाहीत. धोरण ठरवण्याचे अधिकार येत्या सहा महिन्यांत तुमच्या हाती द्यायचे आहेत. त्यामुळे विधानसभा आपल्याला जिंकायची आहे, असे सांगत पवार यांनी येणारे सरकार शेतकऱ्यांचे हित पाहणारे असेल, असा संदेश दिला. सत्ताबदलासाठी पुढाकार घ्या, असेही आवाहन त्यांनी याद्वारे शेतकऱ्यांना केले आहे.

शरद पवार यांचे वय झाले आहे, त्यांनी बाजूला होऊन आम्हाला संधी द्यावी, असा सूर पक्षात फूट पडली त्यावेळी अजितदादा पवारांचा होता. वय होऊनही शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत अजितदादांसह महायुतीला मात दिली आहे. शरद पवार यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे.

लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अनेक ठिकाणच्या सभांना तीन पिढ्यांचे लोक म्हणजे आजोबा, वडील आणि मुलांच्या वयाचे लोक उपस्थित राहिल्याचे दिसून आले. 2019 पासूनच तरुणांचा ओढा त्यांच्याकडे वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत हे सिद्ध झाले आहे, आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवार पायाला भिंगरी लावून फिरणार आहेत. त्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा घाम फुटण्याची शक्यता आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT