Raj Thackeray: बिनशर्त पाठिंबा देऊनही मनसेच्या वाट्याला अवहेलनाच!

Maharashtra Politics MNS Leader Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काहीही फायदा झाला नाही, असे विधान भाजपचे विदर्भातील आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांनी केले आहे. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेसाठी ही नामुष्कीच म्हणावी लागेल.
Maharashtra Politics news
Maharashtra Politics newsSarkarnama

राजकारणात सतत भूमिका बदलल्या की लोक अशा पक्षावर विश्वास ठेवत नाहीत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था अशीच काहीशी झाली आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकासाची ब्ल्यू प्रिंट बाळगणाऱ्या या पक्षाने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला हौता. बिनशर्त पाठिंबा देऊनही मनसेच्या पदरी अवहेलना येत आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेचा काहीही फायदा झाला नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळणार नाही, असे विधान भाजपच्या एका आमदाराने केले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता मनसेच्या विरोधात आता क्षीण वाटत असलेला भाजपमधील हा आवाज येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणुकांचा हंगाम सुरू झाला की रात्र थोडी, सोंगे फार अशी अवस्था राजकीय पक्षांच्या नेत्यांची होते. लोकसभा निवड़णुकीत महाराष्ट्रात महायुतीला जबर धक्का बसला. गेल्यावेळी 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागेल. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा, केंद्र, राज्यातील मंत्र्यांचा पराभव झाला.

दोन-तीन वर्षांपासून भाजपने महाराष्ट्रात 'मिशन 45'ची घोषणा केली होती. भाजपला 48 पैकी 45 जागा जिंकायच्या होत्या, मात्र झाले उलटेच. महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. या पराभवाबाबत महायुतीत चिंतन सुरू असल्याचे दिसत आहे.

Maharashtra Politics news
Modi 3.0 Cabinet: मोदींचा ‘सेफ गेम’; मंत्रिमंडळामध्ये भाजपचं 'मोठा भाऊ'

अपयश आले की त्याला अनेक कारणे जोडली जातात. काही खरी असतात, काही ओढूनताणून आणलेली असतात. वणीचे भाजप आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांना भीती दुसरीच आहे, मात्र त्यांनी मनसेवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल 2 लाख 60 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूरसह वरोरा, राजुरा, बल्लारपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, आर्णीचा समावेश आहे.

या सहाही मतंदरसंघांतून धानोरकर यांना आघाडी मिळाली आहे. संजीवरेड्डी बोडकुरवार हे आमदार असलेल्या वणी मतदारसंघातून धानोरकर यांना 56,648 मतांचे घसघशीत मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे बोडकुरवार यांचे धाबे दणाणले गेले आहे.

2019 च्या निवडणुकीत प्रतिभा धानोकर यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर विजयी झाले होते.त्यावेळी वणी मतदारसंघातून ते दोन हजार मतांनी पिछाडीवर राहिले होते. प्रतिभा धानोरकर यांना मिळालेली आघाडी भाजप आणि आमदार बोडकुरवार यांची चिंता वाढवणारी ठरली आहे.

Maharashtra Politics news
Modi 3.0 Cabinet: मोदींचा राजीनामा नाही; केजरीवालाचं भाकीत खोटं ठरणार?

भाजपचे पराभूत झालेले राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातूनही पिछाडीवर राहिले. बल्लारपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना 48,200 मतांची आघाडी मिळाली. प्रतिभा धानोरकर या 2019 ला वरोरा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांना वरोरा मतदारसंघातून 37,050 मतांची आघाडी मिळाली.

धानोरकर यांना स्वतःच्या मतदारसंघापेक्षा भाजपचे बोडकुरवार आणि वनमंत्री मुनगंटीवार यांच्या मतदारसंघांतून अधिक मताधिक्य मिळाले. चंद्रपूरसह यवतमाळ मतदारसंघातही महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे बोडकुरवार यांची चिंता वाढणे साहजिक आहे. मनसेचा फायदा झाला नाही, असे ते म्हणत आहेत आणि त्यात तथ्य असले तरी विदर्भात मनसेची ताकद किती आहे, याचा विचार त्यांनी केलेला दिसत नाही.

राज ठाकरे यांच्या मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता. त्यापूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळीही त्यांचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता.

असे असले तरी राज्यातील विविध शहरांत सभा घेऊन मोदी, शाह यांच्या विरोधात त्यांनी रान पेटवले होते. त्यावेळी शिवसेना - भाजप युतीच्या 41 जागा निवडून आल्या. राज ठाकरे यांना या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात सभा घेतल्या. महाविकास आघाडीचे 31 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आमदार संजीव बोडकुरवार यांच्या म्हणण्यात तथ्य आढळून येते.

मनसेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मनसे महायुतीकडे विधानसभेच्या काही जागा मागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता मनसेच्या विरोधात भाजपमधून आवाज उठायला सुरुवात झाली आहे, असे आमदार बोडकुरवार यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. सध्या हा आवाज क्षीण असला तरी येत्या काही दिवसांत तो वाढूही शकतो.

राज ठाकरे यांच्या सततच्या भूमिका बदलण्यामुळे मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र कोंडी होत आहे. त्यांच्या वाट्याला अवहेलना येत आहे. राज्यभरात मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. अगदी सुरुवातीपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. मनसेच्या राजकीयदृष्ट्या पडत्या काळातही त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. आपल्या नेत्याच्या भूमिकांचा बचाव कसा करावा, असा प्रश्न या कार्यकर्त्यांसमोर आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com