Bhai Uddhavradada Patil: Sarkarnama
विश्लेषण

Bhai Uddhavradada Patil: हेच खरे भाई अन् दादाही! ज्यांनी CM पदावर सोडले पाणी, मात्र पक्ष सोडला नाही!

Shetkari Kamgar Paksha Bhai Uddhavradada Patil: पक्षनिष्ठा, विचारसरणीवर निष्ठा आणि लोकल्याणाशी बांधिलकी, असा विषय निघाला की भाई उद्धवरावदादा पाटील यांचा उल्लेख आपोआप येतो. पक्षनिष्ठेसमोर मुख्यमंत्रिपदही त्यांच्यासाठी किरकोळ होते. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची नव्हे, तर प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे, दादांनी सिद्ध करून दाखवले होते.

अय्यूब कादरी

तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद देतो, अशी ऑफर आली आणि संबंधित नेत्याने ती नम्रपणे नाकारली! खरे वाटते का हे? किमान नव्या पिढीला तरी खरे वाटणार नाही, असे काही होऊ शकते यावर कोणाचाही विश्वासच बसणार नाही.

राज्यात असे एक नेते होऊन गेले आहेत, ज्यांनी मुख्यमंत्रिपद नाकारले, मात्र आपला पक्ष सोडला नाही, निष्ठा बदलली नाही की विचारसरणीही बदलली नाही. होय, भाई उद्धवरावदादा पाटील! शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक, विरोधी पक्षनेते असताना सरकारला घाम फोडणारे उद्धवरावदादा यांचा आज जन्मदिन आहे.

पक्षनिष्ठेला, विचारसरणीला महत्त्व देणारे नेते राज्यात, देशात होऊन गेले आहेत. असे नेते, ज्यांचा संबंध फक्त लोकांच्या कल्याणाशी होता, त्यांचे प्रश्न सोडवण्याशी होती. घरातून भाकरी बांधून आणून निवडणुकांत प्रचार करणारे असे नेते, कार्यकर्ते राज्याने पाहिले आहेत. त्यात उद्धवरावदादा पाटील यांचा क्रमांक अगदी वरचा. शेतकरी, कष्टकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच त्यांनी अखेरपर्यंत काम केले. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता लागत नाही, तर काम करण्याची जिद्द लागते, प्रामाणिकपणा लागतो, हे त्यांनी दाखवून दिले होते.

उद्धवरावदादा यांचा जन्म 30 जानेवारी 1920 रोजी माणकेश्वर (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे झाला. माणकेश्वर हे त्यांचे आजोळ. परंडा तालुक्यातील इर्ला हे त्यांचे गाव. धाराशिवमधून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर दादांनी पुढील शिक्षणासाठी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी वंदे मातरम चळवळीत भाग घेतला. तेथे आसिफजाही घराण्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा दिली जात होती. या प्रतिज्ञेऐवजी वंदे मातरम् गायिले जावे यासाठी विद्यार्थांनी 1938 मध्ये चळवळ सुरू केली होती, उद्धवरावदादा या चळवळीत अग्रस्थानी होते. पुढे त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातही सक्रिय सहभाग घेतला.

कायद्याची पदवी मिळवल्यानंतर दादांनी अॅड. नरसिंगराव काटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरू केली. गोवा मुक्तिसंग्राम, हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये अनेक उपपक्षांचा समावेश होता.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसची या पक्षांची गरज संपली होती. त्यामुळे उपपक्ष, शेतकरी कामगार संघ अशा गटांना बाहेर काढण्यासाठी काँग्रेसच्या घटनेत बदल करण्यात आला होता. त्यामुळे 26 एप्रिल 1948 रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली.

उद्धरावदादा आणि नरसिंगराव काटीकर यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये काम करत असतानाच शेतकरी संघाची स्थापना केली होती. काँग्रेसकडून त्याला मान्यता मिळण्याची शक्यता नव्हती. काँग्रेसने शेतकरी संघाचे विसर्जन केले.

उद्धरावदादा हे क्रातिंसिंह नाना पाटील, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, भाई जी. डी. लाड यांच्या संपर्कात होते. काटी (ता. तुळजापूर) या नरसिंगराव देशमुख यांच्या गावी 1949 मध्ये बैठक झाली. मराठवाड्यात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करून तो राज्यातील पक्षात विलीन करण्याची सूचना दादांनी मांडली. त्याला समर्थन मिळाले. त्याच वर्षी बार्शी येथे ही घोषणा करण्यात आली.

उद्धवराव दादांनी 1952 मध्ये देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली. तत्कालीन उस्मानाबाद-तुळजापूर मतदारसंघातून ते हैदराबाद असेंब्लीत आमदार म्हणून गेले. त्यावेळचे वातावरण काँग्रेसला पूर्णपणे अनुकूल होते.

अशा वातावरणातही दादांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. 1957 मध्ये दादांनी उस्मानाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्यांच्यासमोर हैदराबाद राज्यात शिक्षणमंत्री राहिलेले फुलचंद गाधी हे उमेदवार होते. आर्थिकदृष्टीने त्यांच्यासमोर दादांचा टिकाव लागणे शक्यच नव्हते. तरीही दादांनी त्यांचा पराभव केला.

एस एम. जोशी यांच्यानंतर 1958-1959 मध्ये उद्धवरावदादा मुंबई राज्याचे विरोधी पक्षनेते बनले. सध्या विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्यासारखा दर्जा असतो. पण त्यावेळी तसा दर्जा नव्हता. सभागृहातील अभ्यासू मांडणीमुळे दादांनी विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदाला एक उंची मिळवून दिली होती.

सत्ताधारीही आमदार त्यांचे भाषण चुकवत नसत. 1962 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र दादांच्या वाट्याला पराभव आला. त्यानंतर पक्षाने त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत उतरवले. त्यांची लढत रिपब्लिकन पक्षाचे राजाभाऊ खोब्रागडे यांच्याशी झाली.

यशवंतराव चव्हाण यांनी खोब्रागडे यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते, मात्र सत्तारूढ काँग्रेसच्या आमदारांनी दादांना मतदान केले. दादा विजयी झाले. 1964 ते 1966 काळात त्यांनी दिल्लीत आपल्या कामाची चुणूक दाखवली होती. 1967 च्या विधानसभा निवडणुकीत ते उस्मानाबाद मतदारसंघातून विजयी झाले.

1972 मध्ये मतदारसंघ बदलून ते भूम-परंड्यातून लढले. तिरंगी लढतीत त्यांचा पराभव झाला. पुढे आणीबाणी उठवल्यानंतर 1977 मध्ये दादांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांना डिपॉझिट भरण्यासाठीचे पैसे लोकांनी गोळा करून दिले होते. या निवडणुकीत ते विजयी झाले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे शेकापमधील नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध होते. 1962 च्या सुमारास ते केंद्रात गेले. आपल्या मागे बहुजन समाजातील चारित्र्यवान, कार्यक्षम, धडाडीच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये येऊन सत्तेत सहभागी व्हावे,

बहुजनांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात, असे यशवंतरावांना वाटायचे. उद्धवरावदादा हे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे यशवंतरांवानी त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑॅफर दिली होती, मात्र दादांनी ती नम्रपणे नाकारली होती.

सत्तेसाठी पक्ष आणि विचारसरणीशी बांधिलकी दादांनी सोडली नाही. गोरगरीबांच्या कल्याणाशी त्यांची कायम बांधिलकी होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानभवनावर त्यांनी काढलेल्या विशाल बैलगाडी मोर्चाची इतिहासात नोंद झाली आहे. आपला पक्ष सत्तेत येणार नाही, हे माहित असूनही त्यांनी पक्ष सोडला नव्हता.

चालून आलेल्या मुख्यमंत्रिपदाकडे पाठ फिरवणारे उद्धवरावदादा यांच्यासारखे नेते राज्यात होऊन गेले, यावर आताच्या पिढीचा विश्वास बसणे शक्य नाही. दादांनी तत्वांशी कधीही फारकत घेतली नाही. आपले जीवन लोकांच्या सेवेसाठी आहे, ते सत्तेसाठी नाही, असे जणू त्यांनी ठरवूनच टाकले होते. कर्करोगाशी लढा देणाऱ्या उद्धवरावदादांनी 12 जुलै 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT