Eknath Shinde, Sanjay Gaikwad Sarkarnama
विश्लेषण

Shinde Government : शिंदे सरकार, सावध राहा, विरोधक नव्हे; तुमचेच आमदार तुम्हाला...

अय्यूब कादरी

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे राजकारण सध्या कधी नव्हे इतक्या खालच्या पातळीवर गेले आहे. विविध नेते आपल्या वक्तव्यांद्वारे रोज नवीन नीचतम पातळी गाठत आहेत यासाठी जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसत आहे. एकमेकांची औकात काढली जात आहेत. इकडून एकजण बोलला की तिकडून दुसरा तयारच असतो. महाराष्ट्राच्या प्रगल्भ, संयमी राजकीय परंपरेचे गेल्या काही वर्षांपासून वकूब नसलेले राजकीय नेते आणि त्यांच्या चेलेचपाट्यांनी वाटोळे करून टाकले आहे.

भाजप-शिवसेना युती २०१९ मध्ये तुटली, त्यानंतर असे प्रकार सुरू झाले. गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार पडले, शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर अशा प्रकारांची तीव्रता वाढली. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि पुन्हा नव्याने अशी वक्तव्ये सुरू झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शनिवारी शिंदे गटाच्या एका आमदाराने तर कहरच केला. कुठे अन्याय दिसला तर मी मंत्र्यांना ठोकून काढतो, सरकारलाही ठोकू शकतो, असे अत्यंत सुमार, किळसवाणे विधान त्यांनी केले. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) असे त्यांचे नाव, ते बुलडाण्याचे आमदार आहेत. अशा वक्तव्यांसाठीच ते ओळखले जातात. अशी वक्तव्ये करून काही नेते आपला वकूब काय आहे हे समाजासमोर सातत्याने दाखवून देत असतात.

२०१९ नंतर असे प्रकार सुरू झाले. टीका जरूर करावी. मात्र, त्याची एक पातळी असावी, ती व्यक्तिगत स्वरूपाची नसावी, याचा विसर बरेच नेते, आमदारांना पडला आहे. यात सर्वच पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. अशी वक्तव्ये करण्याची एकही संधी या नेत्यांनी वाया घालवलेली नाही.

सर्वच पक्षाच्या प्रमुखांनी वेळीच अशा वाचाळांना आवर घातला असता, त्यांच्यावर कारवाई केली असती तर राज्याच्या राजकारणाची इतकी अधोगती झाली नसती. या अधोगतीला एकूण एक पक्ष आणि झाडून सारे पक्षप्रमुख कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहेत. परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईल याची कल्पना त्यांना आली नसेल का, असा प्रश्न आहे.

राज्यात सध्या धनगर समाजानेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. बुलडाणा येथेही धनगर समाजाने आंदोलन केले. आमदार संजय गायकवाड यांनी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. कुठेही अन्याय होत असेल तर आपण कशाचीही पर्वा करत नाही. वेळप्रसंगी मी मत्र्यांनाही ठोकून काढू शकतो. अन्याय होत असेल तर मी सत्ताधारी पक्षात आहे की विरोधी पक्षात आहे, याचा विचार न करता सरकारलाही ठोकून काढू शकतो, असे विधान त्यांनी केले.

आमदार म्हणजे लॉ मेकर म्हणजेच कायदे तयार करणारे. लॉ मेकरलाच कायद्यावर विश्वास नसावा, हे दुर्दैवी आहे आणि तो थेट मंत्री आणि सरकारलाच ठोकून काढण्याची भाषा करतो आहे, हे त्यापेक्षा दुर्दैवी. अशा आमदारांचे कान उपटण्याचे नैतिक धैर्य महाराष्ट्र हरवून बसला आहे काय? अशा वाचाळ आमदारांचे कान उपटण्याइतपत, त्यांना समज देण्याइतपत नैतिक वजन असलेला एकही नेता महाराष्ट्रात राहिला नाही काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT