Loksabha Election : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने यश मिळवले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी धक्कातंत्राचा वापर केला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवड असो की तीन राज्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या प्रस्थापितांना धक्का देण्याचा प्रकार असो हे काहीसे अपेक्षितच होते. मात्र, मोदींच्या या निर्णयामुळे आता जुन्या-जाणत्या नेतेमंडळींचे काय होणार ? याची चिंता सतावत आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थनच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे (vasundhra raje) या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असलेल्या त्या-त्या राज्यातील नेत्यांना बाजूला ठेवून पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे नेते शोधून काढले आहेत. त्या मागचे नेमके गणित आगामी काळातील लोकसभा निवडणूका दिसत आहे. या तीन राज्यातील विजयाचे श्रेय बहुतांशी नरेंद्र मोदी यांच्या नावावर जमा झाले आहे. त्यामुळे या प्रादेशिक क्षेत्रात त्यांनी नवनवीन नेते निवडले आहेत.
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक ठिकाणी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे. सोशल इंजिनिअरिंग हा शब्द अलीकडच्या काळात राजकारणात अधिकच लोकप्रिय होत आहे. तीन राज्यात मुख्यमंत्री निवड करताना आगामी लोकसभा सोप्या जाव्यात या दृष्टीने भाजपकडून साखर पेरणी केली जात असून त्यातून जुन्या-जाणत्या नेत्यांना ही हवा तो संदेश दिला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत पाहता अनेकांना इंदिरा गांधी यांच्या पर्वाची आठवण होते. अन ही आठवण होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रात ए. आर. अंतुले यांच्यानंतर अचानक मुख्यमंत्री पदासाठी बाबासाहेब भोसले यांचे नाव पुढे आले. तेंव्हा अनेकांना त्यांचे पूर्ण नाव मतदारसंघ आठवत नव्हता.
काँग्रेसमधील दिग्गज नेते मुख्यमंत्रिपदासाठी रांगेत असताना त्यांना डावलून बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करण्याचा धक्कादायक निर्णय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना घेतला होता. मुख्यमंत्री मराठा समाजातीलच करायचा होता, मात्र तो जनाधार असलेला नसावा, पक्षश्रेष्ठींच्या या भूमिकेतून बाबासाहेब भोसले यांची आश्चर्यकारकरित्या निवड झाली होती. तेच गुजरातमध्ये भूपेंद्र पाटील यांना मुख्यमंत्रीपदी आणताना पंतप्रधान मोदी यांनी हेच तंत्र अवलंबले. दुसरीकडे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली.
राजस्थानात 13 टक्के ब्राह्मण समाज आहे. त्यामुळे भजनलाल शर्मा यांच्या रूपाने ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री नेमण्यात आला. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी दिया कुमारी या राजपूत समाजातून आहेत तर प्रेमचंद्र बैरवा हे एससी आहेत. अशा प्रकारे सोशल इंजिनिअरिंगचा बॅलन्स ठेवण्यात आलेला आहे.
वसुंधरा राजेंकडे कानाडोळा
राजस्थानात वसुंधरा राजे यांचे महत्त्व कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना फार काही संधी मिळेल असे सध्या तरी वाटत नाही. मुलगा दुष्यन्त हा खासदार असल्याने त्यांना केंद्रात संधी दिले जाते का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, आता तरी काही संधी मिळेल, असे चित्र दिसत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवराजसिंह चौहानांना काय जबाबदारी देणार ?
मोहन यादव यांची मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होणे हे उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यातील यादव समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. मध्य प्रदेशात मोहन यादव यांच्या रूपाने ओबीसी समाजाचा नेता मुख्यमंत्रीपदी नेमला आहे. या राज्यात ओबीसीची संख्या साठ टक्केपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे जगदीश देवडा हे अनुसूचित जातीचे तर राजेंद्र शुक्ला ब्राह्मण समाजातील नेते आहेत.
मुख्यमंत्री म्हणून तीन टर्म पूर्ण करणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजप नेतृत्वाने निवडणुकीपूर्वी त्यांना पायउतार न करता त्यांना सन्मानाने पदावरून दूर केले. दुसरीकडे त्यांना केंद्रात कृषी मंत्री पद मिळू शकते. मात्र, हे सर्व काही जर तर वर अवलंबून आहे. त्यामुळे येत्या काळात काय निर्णय देण्यात येणार याकडे लक्ष लागले आहे.
छत्तीसगडमध्ये रमण सिहांना साइडलाइन
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री म्हणून आदिवासी समाजाचे विष्णूदेव साय यांची नियुक्ती करण्यात आली. या राज्यातील 29 विधानसभा मतदारसंघात आदिवासी मतदारांचे वर्चस्व आहे. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी अर्जुन साव हे ओबीसी तर विजय शर्मा हे ब्राह्मण समाजाचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी बॅलन्स ठेवण्यात आलेला आहे.
दुसरीकडे जुने जाणते नेते रमण सिंह (Raman Sinh) यांना साइडलाइन करीत त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद दिले आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा वर्णी लागेल अशी आशा होती. मात्र, त्यांना हवा तो संदेश यामधून मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात या पेक्षा अधिक काही मिळेल असे वाटत नाही.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.