Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  sarakrnama
विश्लेषण

Shivsena Analysis : ठाकरेंना काय फरक पडला ? मोदी असो व नसो दिल्लीत हवाच हवा

Sachin Waghmare

latest Election News : एका झटक्यात चार डझन आमदार पळवले तर डझनभर खासदार ओढून घेतले. त्यानंतर डझनावर जिल्हाप्रमुख पळवले शेकडो, शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख खेचून घेतले. मुंबई पालिकेतील काही माजी नगरसेवकही गळाला लावले. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार आणि खासदार उरले होते.

त्यांच्या मदतीनेच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत लढवय्या योध्याप्रमाणे लढले अन बाजीही मारली. ठाकरेंचे सर्व शिलेदार सोडून गेलेले असताना ठाकरे यांनीही निष्ठावंतांना सोबत घेऊन किल्ला लढवला. त्यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेसकडूनही साथ लाभली.

आतापर्यंतच्या निवडणुकीत भाजपसोबत शिवसेना लढली होती. मात्र, दोन वर्षापूर्वी म्हणजेच 22 जून 2022 मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करीत महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यानंतर आतापर्यंत राज्यात कुठलीही निवडणूक पार पडली नव्हती. त्यामुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक पार पडली.

त्यामुळे या निवडणुकीत काय होणार ? याची उत्सुकता लागली होती. या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची प्रतिष्ठा पणाली लागली होती. उद्धव ठाकरे व शरद पवार गटासोबत सहानभूती असल्याची चर्चा होती.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपला सोडत उद्धव ठाकरे पहिल्यांदाच महाविकास आघाडीसोबत लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. त्यांनी 21 जागांवर निवडणूक लढवली. भाजपसोबत असताना 2014 मध्ये 20 जागावर निवडणूक लढताना 18 जागा जिंकल्या होत्या. तर 2019 मध्ये 22 जागांवर निवडणूक लढवताना 18 जागा जिंकल्या होत्या. तर 2024 मध्ये महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला 21 जागा आल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले. त्यानंतर मशाल चिन्हावर निवडणूक लढवली. उद्धव ठाकरेंना निवडणुकीला सामोरे जाताना भाजपवर टीका करीत आपली बाजू कशी योग्यही मांडावी लागली. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यामागची कारणे त्यांनी जनतेला पटवून द्यावी लागली. त्यासोबतच ऐन निवडणुकीत त्यांच्या प्रचार गीतावर निवडणूक आयोगाने घेतलेल्या आक्षेपांचा सामना मोठ्या निकराने केला. उद्धव ठाकरे यांनी या अस्तित्वाच्या लढाईत त्यांची बाजू जोरदारपणे मांडली.

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम देशात सात टप्पे, 43 दिवस रंगला होता. या लोकसभा निवडणुकीदरम्यान रात्रीचा दिवस करून उद्धव ठाकरे यांनी मेहनत घेतली. राज्यभर प्रचार सभेच्या माध्यमातून राज्यभरातील मतदारसंघ पिंजून काढले. त्यांच्या सभांना राज्यातील जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात मतदार उभे राहणार असे चित्रच होते. मात्र, हे मतात परिवर्तन होणार की नाही याची प्रतीक्षा होती.

लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी सातव्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल्स आले आहेत. त्यामध्ये राज्यातील हे पोल्स पहिले तर शिवसेना ठाकरे गटाने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे. ठाकरे गटाला या पोल्सनुसार डझनभरापेक्षा अधिक जागावर आघाडी घेत खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे सिद्ध केले आहे.

शिवसेनेतील फाटाफुटीनंतर निवडणूक आयोगाने खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे सांगून चिन्ह व पक्ष त्यांना सुपूर्द केले. मात्र, उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत स्वतःच्या बळावर शिवसेना कोणाची हे सिद्ध केलं आहे.

सत्ताधाऱ्यांनी मनी, मसल पॉवर दाखवूनही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोडेही डगमगले नाहीत, अथवा मागे हटले नाहीत. उलटपक्षी प्रचाराच्या मैदानावर ताकदीने उतरून फुटीर आणि फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपला शब्दांनी फोडून काढले. जिथे कुठे ठाकरेंनी थेट भाजप, शिंदेंच्या शिवसेनेविरोधात उमेदवार दिले, तिथे प्रचारा धडाका लावून खरी शिवसेना आपल्याकडे असल्याचे दाखवून दिले.

SCROLL FOR NEXT