गुजरात मधील सोमनाथ मंदिर उद्धघाटन सोहळा असो की, अयोध्येतील राम मंदिर उद्धघाटन सोहळा असो या दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या नेहरु-गांधी परिवाराने उद्धघाटन सोहळ्यास जाण्यास नकार दिला. त्यांची ही भूमिका ‘हिंदू’ विरोधी आहे की, संविधानाच्या ‘सेक्युलर’ अर्थात धर्मनिरपेक्ष भुमिकेशी बांधील आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो. जर काँग्रेस सरकार ‘सेक्युलर’ शब्दांवर कायम असती तर, काँग्रेस सरकारने हज सबसिडी सुरु केली नसती आणि ती पुढे सुरु ठेवली नसती, असा विरोधकांचा दावा आहे.
काँग्रेसनेच सर्वप्रथम हिंदू दहशतवाद हा शब्द देशात पेरल्याची ओरड आहे. देशातील बहुसंख्य हिंदूंची ज्या ठिकाणी मान्यता आहे, श्रध्दास्थाने आहेत त्यांच्या उद्धघाटनाला न जाणे हे काँग्रेसच्या नेहरु-गांधी परिवाराच्या कुठल्या संस्कृतीत बसते ? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे नेहरु-गांधी परिवाराची भुमिका नेहमी बहुसंख्य हिंदू विरोधी आहे की सेक्युलर आहे की कुठल्या धर्माचे लांगुनचालन करणारी आहे. याचा संशय राम मंदिर उदघाटनाच्या विरोधावरुन दिसून येतो.
मोहम्मद गझनी ने सोमनाथ मंदिर पाडले. त्यानंतर अनेक वर्षांनी जुनागढ राज्य भारतात समाविष्ठ करताना तत्कालिन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 12 नोव्हेंबर 1947 रोजी सोमनाथ मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात येईल, असे यांनी जाहीर सभेत आश्वासन दिले. सरदार पटेल यांच्या या भुमिकेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मान्यता होती. जिर्णोध्दार करताना तो शासकीय पैशातून नाही तर ट्रस्टच्या माध्यमातून करा असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता.
इतकेच नाही तर त्यावेळचे काँग्रेस नेते के.एम.मुन्शी यांनी ट्रस्ट स्थापन करत सोमनाथ मंदिर जिर्णोध्दारासाठी पुढाकार घेतला. जेव्हा सोमनाथ मंदिराचे काम पुर्ण झाले तेव्हा महात्मा गांधी आणि पटेल दोन्ही नेते जिवंत नव्हते. सोमनाथ मंदिर राष्ट्राला समर्पित करण्यासाठी के.एम.मुन्शी यांनी तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी उपस्थित रहावे अशी आग्रही मागणी केली. ती नेहरुंनी फेटाळली. त्याच बरोबर नेहरुंनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना देखील या उद्धघाटन सोहळ्याला न जाण्याचा सल्ला दिला. पण, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तो धुडकावून लावत 11 मे 1951 रोजी सोमनाथ मंदिर राष्ट्राला समर्पित केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जवाहरलाल नेहरु यांनी विरोध करताना देशाच्या ‘सेक्युलर’ इमेजला हे योग्य नसल्याचे सांगत राष्ट्रपतींनी मंदिर उद्धघाटन सोहळ्यास न जाण्याचा सल्ला दिला होता. त्याच बरोबर राज्य सरकारला सरकारी निधीतून मंदिर उदघाटन सोहळ्यास खर्च न करण्याचा आदेश दिला. जवाहरलाल नेहरुंनी हे सर्व करताना देशातील बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना जपल्या नसल्याची विरोधकांची ओरड आज ही कायम आहे. पुढे 2017 मध्ये याच मंदिरात काँग्रेस नेते राहुल गांधी दर्शनास गेले. देशातील बारा ज्योर्तिलिंग पैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिरावर कोट्यावधी हिंदूंची श्रध्दा आहे, असे असताना त्यांच्या उद्धघाटनासाठी नेहरूंनी दिलेला नकार आज ही हिंदुंच्या मनात घर करुन आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू सोमनाथ मंदिर उद्धघाटन सोहळ्याला जात नाही. पण,राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, काँग्रेसचे नेते के.एम.मुन्शी, एन.व्ही.गाडगीळ यांची महत्वाची भुमिका मंदिर निर्माणात असते हा विरोधभास सोमनाथ मंदिर लोकार्पण होताना 1951 मध्ये समोर आला. याचे अनेक दाखले विविध पुस्तकांमध्ये आहे.
अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी 1525 मध्ये बाबरने राम मंदिर तोडले. त्या ठिकाणी मशिद बांधली. जवळपास पाचशे वर्षापासून या ठिकाणी हिंदू मंदिर नव्हते, त्याचे उद्धघाटन उद्या (ता. 22) होत आहे. या मंदिराच्या उद्धघाटन सोहळ्यात काँग्रेस अनुपस्थित राहणार आहे. 1949 पासून रामलल्ला हे बाबरी मशिदच्या एका भागात होते. ज्यावेळी या मशिदीत रामलल्ला स्थापित केले गेले त्यावेळी देखील पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी 1950 मध्ये रामलल्ला बाहेर काढण्यासाठी दबाव टाकल्याचे अनेक पुस्तकांमध्ये म्हटले आहे. नेहरुंच्या दबावामुळे गोविंदवल्लभ पंत यांना रामलल्ला हटविण्याचा निर्णय घेतला. पण, फैजाबादचे काँग्रेस आमदार बाबा राघव दास यांनी त्याला विरोध केला. अखेर रामलल्ला ही बाबरी ढाच्यात एका ठिकाणी कायम राहिले. बाबरी ढाच्यातून रामलल्ला काढण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी नायर यांच्यावर मोठा दबाव होता. तो त्यांनी झुगारला आणि त्यांची बदली झाली. जिल्हाधिकारी नायर यांच्या पत्नी शकुंतला नायर या 1952 च्या लोकसभा निवडणूकीत हिंदूमहासभेच्या उमेदवार म्हणून विजयी झाल्या. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्यात.
भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वात 25 सप्टेंबर 1990 पासून रथयात्रा सुरु झाली. ही रथ यात्रा जिथे नेहरुंनी जिर्णोध्दारास विरोध केला त्याच सोमनाथ मंदिरातून काढण्यात आली. कारसेवा, देशात दंगली आणि अनेक गोष्टींना देश समोर गेला. पुरातत्व विभागाच्या पाहणीनंतर आणि तपासणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजुंची नोंद घेत 9 नोव्हेंबर 2019 रोजी राम मंदिर विषयाचा निकाल दिला. त्यानंतर येथे ट्रस्ट च्या माध्यमातून निर्माण कार्य सुरु झाले. 22 जानेवारी रोजी मंदिर उद्धघाटनाचे निमंत्रण राम मंदिर ट्रस्टने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, अधीर रंजन चौधरी यांना दिले. अयोध्येतील या राम मंदिर उद्धघाटन सोहळ्याकडे पुन्हा एकदा काँग्रेसच्या गांधी परिवाराने पाठ फिरवली. उद्धघाटन सोहळ्यास न जाण्याचे कारण सांगताना काँग्रेसने राम मंदिर उद्धघाटन सोहळा हा राजकीय असून तो निवडणूकीच्या तोंडावरील अजेंडा आहे, असे म्हणत नकार दिला. काँग्रेसच्या या हिंदूंच्या विरोधातील भूमिकेमुळेच गुजरात मधील काँग्रेसच्या एका आमदाराने नुकताच राजीनामा दिला. इतकेच नाही तर दूसरीकडे काँग्रेस उत्तरप्रदेश प्रभारी अविनाश पांडे हे रामलल्ला च्या दर्शनासाठी जावून पण आले.
सोमनाथ असो की अयोध्या उद्धघाटन काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी काँग्रेसला नेहमीच आरसा दाखविला. पण, ‘सेक्युलर’ या गोड नावाखाली नेहरु आणि गांधी परिवाराने हिंदूंच्या भावनांचा अनादर केल्याचे चित्र दोन्ही घटनांमध्ये उघडपणे दिसते. अयोध्येत राम मंदिर निर्माण हा देशातील 110 कोटी हिंदूंच्या भावनांचा विषय आहे. या देशातील 110 कोटी जनता ही सेक्युलर शब्द नित्यनियमाने पाळते आणि त्याची अमलबजावणी देखील करते. अशा वेळी बहुसंख्य हिंदूंच्या भावनांचा आदर नेहरु आणि गांधी परिवाराने का केला नाही ?. केवळ ‘सेक्युलर’ या शब्दाला चिपकून राहत काय साध्य केले गेले ?, असा प्रश्न या निमित्त चर्चेत आहे. सोमनाथ मंदिर असो की अयोध्या मंदिराचे उद्धघाटन असो या दोन्ही ठिकाणी काँग्रेसची ताठर भुमिका ही हिंदू विरोधी होती की सेक्युलर होती हे सुज्ञ वाचकांनी ठरवावे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची रामराज्याची संकल्पना ही हिंदू डोळ्यासमोर ठेवून होती की सेक्युलर या परिभाषेतील होती हे पण यानिमित्त ठरवावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.