डॉ. राहुल रनाळकर
भाजपा राममंदिराच्या विषयाला सांस्कृतिक, आध्यात्मिक अंगाने पाहत असली तरी यातील राजकीय दृष्टिकोन अन्य राजकीय पक्षांच्या नजरेतून सुटणे अशक्य आहे. किंबहुना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण देश ढवळून काढत असल्याचा आरोप काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांकडून होत आहे.
केंद्रात सत्ताधारी पक्ष भाजप असल्यामुळे हे आरोप होणे स्वाभाविक आहे. मात्र केवळ राममंदिराच्या मुद्द्याकडे लक्ष न देता अलीकडे झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील भाजपच्या व्यूहरचनेकडे पाहावे लागेल.
सध्या देशभर राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे धार्मिक आणि हर्षोल्हासाचे वातावरण आहे. सर्वसामान्य जनता आपली दुःखे क्षणभर बाजूला ठेवत सुमारे बत्तीस वर्षापूर्वी पाहिलेले ‘मंदिर वही बनायेंगे’चे स्वप्न साकार होताना कृकृत्य झाल्याचे वातावरण दिसून येत आहे. गावागावत स्वच्छता, मंदिरांवर रोषणाई, आरतीचे नियोजन यामुळे सर्वत्र दिवाळीसारखे वातावरण तयार झाले आहे. एकीकडे हे आनंदतरंग उमटत असताना राजकीय क्षितिजावर मात्र भाजप कमालीच्या वेगळ्या पद्धतीने सक्रिय होताना दिसत आहे.
निवडून येण्याची क्षमता, मजबूत आर्थिक स्थिती आणि जनमानसातील छबी आदी मुद्दे कोणत्याही निवडणुकीत उमेदवारीसाठी सर्वसाधारणपणे गृहीत धरले जातात. सर्वच पक्षांमध्ये ही पध्दत गेल्या अनेक वर्षांपासून रूढ आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने उमेदवारीच्या या निकषांना छेद देत अलीकडे झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत नवे प्रयोग केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अन्यायग्रस्ताला पुढे करत प्रसंगी त्याच्यामागे सर्व शक्ती उभी करुन त्याला निवडून आणण्याचा विक्रम छत्तीसगडमध्ये भाजपाने केला. राजकारणाबद्दल अनभिज्ञ असलेल्या ईश्वर साहू या उमेदवाराने चक्क सात वेळा आमदार असलेल्या आणि विद्यमान मंत्री असलेल्या कॉंग्रेसच्या रवींद्र चौबे यांना पराभवाची धूळ चारली.
विजयी झालेले भाजपचे उमेदवार ईश्वर साहू यांच्या तरुण मुलाची हिंदू-मुस्लिम जातीय दंगलीत हत्या झाली होती. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचा हा राजकारणातील नवा ट्रेंड आता भाजप लोकसभेसह अन्य राज्यांतही राबवणार याविषयी शंका नाही. किंबहुना त्यादिशेने हालचाली सुरू असून काँग्रेससह भाजपच्या अनेक विद्यमान आमदार, खासदारांनी भाजपाच्या या खेळीचा धसका घेतला आहे. खासकरुन महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाच्या कोअर टीमने अशा उमेदवारांचा शोध सुरु केला आहे.
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने सत्ताधारी कॉंग्रेसचा केलेला पराभव हा मुख्यत्वे भाजपच्या व्यापक, सर्वंकष रणनीतीचा भाग होता. उमेदवारी कुणाला मिळेल, याबाबतचे आत्तापर्यंतचे सर्व आडाखे दूर ठेवत भाजपने या दोन्ही राज्यांत काही प्रयोग केले. सुरवातीला विरोधकांनी हे गांभीर्याने घेतले नाही. पण मतदान जसजसे जवळ आले तसतशी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. त्याचे कारण म्हणजे भाजपने दिलेल्या सामान्य उमेदवाराभोवती संपूर्ण निवडणूक केंद्रीत होत गेली. अर्थात यामागे भाजपने बांधलेले आडाखे आणि जनमत फिरवत आपल्याकडे खेचून आणण्याचे नवे कसब होते.
छत्तीसगडमधील ईश्वर साहू यांच्या विजयाने हेच अधोरेखित झाले. कॉंग्रेसच्या बाहुबलींविरोधात सर्वसामान्य माणूस हा प्रयोग म्हणजे राजकारणातील नवे असामान्य असे उदाहरण म्हणावे लागेल. जनसामान्यांना उमेदवार म्हणून कोण हवा आहे, हे भाजपने नेमके हेरले आहे. हा प्रयोग आता महाराष्ट्रातही केला जाणार आहे. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपाची कोअर टीम अशा चेहऱ्यांच्या शोधात आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपने तब्बल ५४ जागांवर विजय मिळवत काँग्रेसच्या ३५ जागा कमी केल्या. हे करताना भाजपने उमेदवारीचे पारंपरिक निकष पार बदलून टाकले. या राज्यात काँग्रेस खरेतर बलाढ्य होती. मात्र भाजपने एकेका जागेसाठी अतिशय चाणाक्षपणे व्यूहरचना केली. समाज कुणाच्या पाठीमागे राह शकतो, याचा सर्वांगाने विचार करणे, त्यातही अशक्यप्राय वाटणारी बाब ऐनवेळी जाहीर करून जनतेला संमोहित करण्याचा नवा पण तेवढाच धाडसी निर्णय घेणे तसे सोपे नव्हते.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.