<div class="paragraphs"><p>Ajit Pawar-Sudhir Mungantiwar-Aditya Thackeray</p></div>

Ajit Pawar-Sudhir Mungantiwar-Aditya Thackeray

 

Sarkarnama

विश्लेषण

अजितदादांचे कौतुक करत नेतृत्व देण्याचं मुनगंटीवारांचे आदित्य ठाकरेंना साकडं

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अजितदादांच्या नेतृत्वाखाली अधिवेशन चांगलं झालं. माझी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विनंती आहे की, किमान अधिवेशनाच्या काळात तरी सरकारचे नेतृत्व अजितदादांकडे द्या आणि इतर दिवशी बाबांकडे (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) द्यावे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) कौतुक केले. (Sudhir Mungantiwar lauded the leadership of Deputy Chief Minister Ajit Pawar)

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी मुनंगटीवार यांनी अधिवेशन काळात अजित पवार यांनी केलेल्या नेतृत्वाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ पाचच दिवसांचे होते; पण उत्तम झाले. या अधिवेशनात किमान आम्हाला बोलता तरी आले. अजितदादांच्या नेतृत्वाखाली अधिवेशन चांगलं झालं आहे, त्यामुळे माझी आदित्य ठाकरे यांना विनंती आहे की किमान अधिवेशनाच्या काळात तरी नेतृत्व अजितदादांना द्यावे आणि इतर दिवशी बाबांना द्यावे.

तुम्ही सहकारी संस्थेला का बदनाम करता, असा सवाल करून सहकारी संस्थांचे ऑडिट करायला 9 महिने लागले, असा टोलाही सुधीर मुनंगटीवार यांनी सरकारला लगावला.

सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्य सरकारवर हल्लाबोल केले. ते म्हणाले की, सहकार संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारने दुटप्पी भूमिका घेतली आहे. सरकारला जिथे सोयीच्या होत्या, तिथे निवडणुका घेतल्या आहेत. सरकारचा वापर करून आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

अडचणीमध्ये असलेल्या राज्यातील सर्व कारखान्यांना सरकारने पैसे द्यावेत. सर्व कारखानदारांना समान न्याय द्यावा. एका कारखान्याची थकहमी घेतली जाते आणि एकाची घेतली जात नाही. काही लोकांनी मागच्या वर्षीची थकबाकी भरली नाही तरी त्याला मदत दिली गेली आहे. चेहरे पाहून सरकारने कारखानदारांना मदत करू नये. ज्यांना पैसे दिले, त्यांना हरकत नाही. पण, ज्यांना दिले नाहीत, त्यांना का दिले नाहीत, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या विषयावरील चर्चेदरम्यान विचारला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तपासून घेऊन त्याबाबतचे उत्तर देण्यात येईल, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT