Narendra Modi and Atal Bihari Vajpayee Sarkarnama
विश्लेषण

वाजपेयींशी बरोबरीची मोदींना संधी..राष्ट्रपतिपदी महाजन की खान?

भाजपच्या नेतृत्वाने आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) नेतृत्वाने आता राष्ट्रपती (President), उपराष्ट्रपतीपदाच्या (Vice President) निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) आणि केरळचे राज्यपाल आरीफ महंमद खान (Arif Mohammd Khan) यांची नावे चर्चेत आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महिलेला संधी देणार की मुस्लिम व्यक्तीला सर्वोच्च स्थान देऊन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी बरोबरी साधणार याची उत्सुकता आहे.

दिल्लीत प्रस्तावित नावांची चर्चा सुरू झाली आहे. यात काही नावांची चर्चा जोरात सुरू असली तरी प्रत्यक्ष भाजप उमेदवारांचे नाव जाहीर होईल तेव्हाच मोदींचे धक्कातंत्र समजेल. दोन्ही पदांसाठी उमेदवार निवडताना मोदी-शहा यांना 2024 ची लोकसभा निवडणूकही लक्षात घ्यावी लागेल. मोदींनी राष्ट्रपतिपदासाठी 2017 मध्ये दलित समाजातील रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे केले होते. के. आर. नारायणन यांच्यानंतरचे ते दुसरेच दलित राष्ट्रपती ठरले होते. या धर्तीवर पाहिल्यास मोदी यंदा एखाद्या महिलेच्या नावाची निवड सर्वोच्च पदासाठी करू शकतात. त्यासाठी छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुइया उईके, झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन आदींच्या नावांची चर्चा आहे.

याचबरोबर वरिष्ठ भाजप नेते थावरचंद गेहलोत व केरळचे राज्यपाल आरीफ महंमद खान यांची नावेही चर्चेत आहेत. गेहलोत यांची प्रकृती यात अडथळा ठरू शकते, असे मानले जाते. तसेच, दलित समाजाला मोदी सलग दुसऱ्यांदा संधी देतील का, अशी शंका व्यक्त होत आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी डॉ. ए. के. अब्दुल कलाम यांची निवड करून 2002 मध्ये हुकमाचा एक्का टाकला होता. मूळचे कट्टर काँग्रेसी असलेले आरीफ महंमद खान यांची डॉ. कलाम यांच्याशी स्पर्धा अशक्य असली तरी खान यांचे नाव अल्पसंख्यांक म्हणून मोदी पुढे करणार नाहीत व वाजपेयींशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणारच नाहीत, असे कोणी सांगू शकत नाही.

विरोधकांना विश्वासात घ्यावे लागणार

नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारला या निवडणुकीत अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, बीजू जनता दल, बसप व अन्य मित्रपक्षांचे मत विचारात घेऊनच उमेदवारांची निवड अंतिम करावी लागणार आहे. भाजपची मते कमी पडत असल्यानेच राष्ट्रपती- उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडताना गृहमंत्री अमित शहा यांच्या संघटन कौशल्याचा, योगी आदित्यनाथ यांच्या वाढलेल्या प्रभाव क्षेत्रात व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सौम्य स्वभावाचा पुन्हा कस लागणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद व उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना भाजप नेतृत्व व संघाकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT