विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’

भाजपच्या नेतृत्वाने आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
Narendra Modi and Amit Shah
Narendra Modi and Amit ShahSarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह चार राज्यातील यशानंतर भाजपच्या (BJP) नेतृत्वाने आता राष्ट्रपती (President), उपराष्ट्रपतीपदाच्या (Vice President) निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. एका मास्टर प्लॅनवर पक्षनेतृत्वाने काम सुरूही केले आहे. केंद्रासह 17 राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या साथीने सत्तेवर असूनही भाजपला या निवडणुकीत आपल्या ताकदीवर आपला उमेदवार निवडून आणणे अवघड असल्याचे मतांचे गणितच बोलत आहे. यामुळे आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारला या निवडणुकीत अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, बीजू जनता दल, बसप व अन्य मित्रपक्षांचे मत विचारात घेऊनच उमेदवारांची निवड अंतिम करावी लागणार आहे. भाजपची मते कमी पडत असल्यानेच राष्ट्रपती- उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडताना गृहमंत्री अमित शहा यांच्या संघटन कौशल्याचा, योगी आदित्यनाथ यांच्या वाढलेल्या प्रभाव क्षेत्रात व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सौम्य स्वभावाचा पुन्हा कस लागणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद व उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना भाजप नेतृत्व व संघाकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे.

विरोधकांचीही मोर्चेबांधणी

भाजपला बहुमतासाठी अजूनही एनडीएबाहेरील 9 हजार 194 मतांची गरज आहेत. यामुळे विरोधी पक्षांनी एकच उमेदवार देण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधी पक्षांचा एक गट यासाठी सक्रिय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे नवीन पटनाईक, तमिळनाडूचे एम. के. स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेलंगणचे के. चंद्रशेखर राव, केरळचे पिनराई विजयन आदी प्रमुख नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी या गटाने पुढाकार घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही संपर्क करण्याचे प्रयत्न डाव्या पक्षांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून सुरू आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना विरोधकांकडून उमेदवारी जाहीर झाल्यास सध्या भाजपच्या बाजूने असलेल्या पण धर्मनिरपेक्षता, राज्यघटना यावर विश्वास असलेल्या पक्षांचे मन वळविण्यात यश येईल, अशी आशा विरोधी पक्षांच्या गटाला वाटते.

Narendra Modi and Amit Shah
मोदी सरकार बॅकफूटवर! आपल्याच खासदाराला संसदेत पाडलं तोंडावर

उमेदवार कोण असणार?

दिल्लीतील स्वघोषित राजकीय पंडितांनी प्रस्तावित नावांची चर्चा करण्यास सुरवात केली आहे. यात काही नावांची चर्चा जोरात सुरू असली तरी प्रत्यक्ष भाजप उमेदवारांचे नाव जाहीर होईल तेव्हाच मोदींचे धक्कातंत्र समजेल. दोन्ही पदांसाठी उमेदवार निवडताना मोदी-शहा यांना 2024 ची लोकसभा निवडणूकही लक्षात घ्यावी लागेल. मोदींनी राष्ट्रपतिपदासाठी 2017 मध्ये दलित समाजातील कोविंद यांचे नाव पुढे केले होते. के. आर. नारायणन यांच्यानंतरचे ते दुसरेच दलित राष्ट्रपती ठरले होचे. या धर्तीवर पाहिल्यास मोदी यंदा एखाद्या महिलेच्या नावाची निवड सर्वोच्च पदासाठी करू शकतात. त्यासाठी छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुइया उईके, झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन आदींच्या नावांची चर्चा आहे.

Narendra Modi and Amit Shah
पायताणानं हाणू! महाडिकांच्या नंतर आता भाजपचे उमेदवार कदमांची जीभ घसरली

याचबरोबर वरिष्ठ भाजप नेते थावरचंद गेहलोत व केरळचे राज्यपाल आरीफ महंमद खान यांची नावेही चर्चेत आहेत. गेहलोत यांची प्रकृती यात अडथळा ठरू शकते. तसेच, दलित समाजाला मोदी सलग पुन्हा संधी देतील का, अशी शंका व्यक्त होत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी डॉ. ए. के. अब्दुल कलाम यांची निवड करून 2002 मध्ये हुकमाचा एक्का टाकला होता. मूळचे कट्टर काँग्रेसी असलेले आरीफ महंमद खान यांची डॉ. कलाम यांच्याशी स्पर्धा अशक्य असली तरी खान यांचे नाव अल्पसंख्यांक म्हणून मोदी पुढे करणारच नाहीत व वाजपेयींशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणारच नाहीत, असे कोणी सांगू शकत नाही. उपराष्ट्रपती पदासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांची नावे आघाडीवर आहेत. राजनाथसिंह व सीतारामन ही भाजप वर्तुळातील वरिष्ठ पातळीवरील नावे आहेत. राजनाथसिंह यांना वाजपेयी व मोदी या दोन्ही सरकारांचा अनुभव आहे. राज्यसभेचे कामकाज चालविण्यासाठी त्यांना तो कामी येऊ शकतो, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात अशा खासदार-आमदारांच्या- प्रेसिडेन्शियल कॉलेजची एकूण मते आहेत 10 लाख 98 हजार 903 आहेत. यात 6 हजार 264 मते असलेल्या जम्मू-काश्मीरचा समावेश केल्यास भाजपला बहुमतासाठी आणखी 5 लाख 46 हजार 320 मतांची गरज भासेल. यात एकट्या भाजपकडे सद्यस्थितीत 4 लाख 65 हजार 797 मते असून, भाजपला सोडून गेलेले शिवसेना, अकाली दल आदी वगळता राहिलेले नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल व उरलेल्या अन्य मित्रपक्षांची 71,329 मते होतात. ही एकूण बेरीज होते 5 लाख 37 हजार 126. विजयाच्या जादुई आकड्यापासून ही संख्या 9 हजार 194 मतांनी कमी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com