shivaji sawant | tanaji sawant | dhananjay sawant sarkarnama
विश्लेषण

Assembly Election 2024 : तानाजी सावंत भूम-परांडा, पुतण्या धाराशिव तर बंधू माढ्यातून लढण्यास इच्छुक

Akshay Sabale

माढा विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे. येथून अजितदादा यांच्या राष्ट्रवादीतील बबनदादा शिंदे हे आमदार आहेत. मात्र, माढ्यातून बबनदादा लढणार की पुत्र रणजितसिंह शिंदे याची उत्सुकता लागली आहे. यातच मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढ्यातून लढण्याचे संकेत दिले आहेत.

शिवसेनेच्या ( शिंदे गट ) पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी पार पडला. मेळाव्याला माढा विधानसभा मतदारसंघातील 136 गावातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी माढ्याची जागा शिवसेना ( Shivsena ) लढत आली आहे. त्यामुळे माढ्यातून शिवाजी सावंत यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जागा लढण्यासाठी आग्रह धरू, असं शिवाजी सावंत यांनी सांगितलं.

"माढा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथून विधानसभेसाठी इच्छुक असणे गैर नाही. बबनदादा शिंदे हे महायुतीतून लढणार नसतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही जागा लढविण्याचा आग्रह धरू. तसे, झाले तर आपण माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार," असे संकेत शिवाजी सावंत यांनी दिले आहेत.

भूम-परंडा, धाराशिव अन् माढ्यातूनही सावंतच?

तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) हे भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. दुसरीकडे तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. धनंजय सावंत यांनी तिकीटासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांसह मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. पण, तेव्हा हा मतदारसंघ अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेल्यानं तेथून अर्चना पाटील यांनी निवडणूक लढली.

मात्र, आता धाराशिव विधानसभा मतदारसंघातून धनंजय सावंत इच्छुक आहेत. धाराशिवमधून सध्या शिवसेनेचे ( ठाकरे गट ) कैलास पाटील हे आमदार आहेत. तिकीट मिळाल्यास धनंजय सावंत विरुद्ध कैलास पाटील, अशी निवडणूक होण्याची शक्यता आहेत. तर, तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढ्यातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

माढ्यातून बबनदादा की रणजितसिंह शिंदे?

माढ्याचे आमदार बबनदादा यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील काळात अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या बबनदादा आणि रणजितसिंह शिंदे यांनी मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब यांची भेट घेतली होती. रणजितसिंह शिंदे हे अपक्ष किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीकडून लढू शकता, असं बोललं जात आहे. त्यामुळे शिवाजी सावंत यांनी माढ्यातून लढण्याचे संकेत दिले आहेत.

अभिजित पाटील यांनी थोपटले दंड...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा त्यांनी थेट कुस्तीच्या मैदानातून केली आहे. निवडणूक लढविण्याची घोषणा पाटील यांनी केली असली, तरी कोणत्या पक्षाकडून लढविणार? याबाबतचे पत्ते त्यांनी अद्याप ओपन केले नाहीत.

चुलत बंधूंमध्ये लढत होणार?

आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी 13 ऑगस्टला शरद पवारसाहेबांची भेट घेतली होती. तत्पूर्वी धनराज शिंदे यांचे वडील रमेश शिंदे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह आणि धनराज शिंदे या चुलत बंधूंमध्ये संघर्ष पाहायला मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT