Tanaji Sawant : आरोग्यमंत्री सावंतांनी फुंकले रणशिंग, मात्र तोंड गोड ठेवण्याचे आव्हान

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. महायुतीचे उमेदवार तेच असणार, हे निश्चित असल्याने त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत जबर दणका दिलेल्या मतदारांना आपलेसे करण्यात किती यशस्वी होतात, यावरच त्यांच्या जय-पराजयाची समीकरण अवलंबून आहेत.
Tanaji Sawant is a businessman, Shiv Sena politician and deputy leader from Solapur district, Maharashtra.
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे नेते आणि मतदारांची तोंडे परस्परविरोधी दिशेला होती, असे चित्र उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात दिसून आले होते. एकवटलेल्या सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांचे मतदारांनी काहीएक ऐकले नाही आणि महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे तब्बल 3 लाख 30 हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. यात सर्वाधिक 81 हजार मतांची आघाडी दिली ती पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भूम-परंडा विधानसभा मतदारसंघाने.

या धक्क्यातून पालकमंत्री सावंत (Tanaji Sawant) सावरले आहेत. राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील आणि सुजितसिंह ठाकूर या तीन माजी आमदारांच्या काही कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेच प्रवेश केला आहे. यापैकी मोटे आणि पाटील हे महाविकास आघाडीत असून, ठाकूर हे भाजपचे आहेत.

या मतदारसंघातून महायुतीकडून सावंत हेच उमेदवार असणार, हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना अन्य उमेदवारांपेक्षा अधिक वेळ मिळणार आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. असे असले तरी त्यांच्या तोंडाचे काय, त्यांच्या देहबोलीचे काय, असे प्रश्न मतदारांच्या मनात आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघ शिवसेनेला सुटावा आणि पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आरोग्यमंत्री सावंत अडून बसले होते.

धनंजय सावंत यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चनाताई पाटील (Archana Patil) यांना उमेदवारी मिळाली होती. त्यानंतरही धनंजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांसमोर शक्ति प्रदर्शन केले होते.

अर्थात त्याचा काही परिणाम होणार नव्हताच. नंतर काही दिवसांनी सावंत महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारात उतरले, मात्र त्यांच्या बेताल वक्तव्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेनिंबाळकर यांनाच सहानुभूती मिळत गेली.

सावंत म्हणतात की, भूम-परंडा मतदारसंघात इतकी विकासकामे केली आहेत की विरोधकांना बोलायला जागाच उरत नाही. हे एकदा मान्य केले तरी नागरिकांच्या मनात मात्र वेगळेच प्रश्न आहेत. सावंत यांच्या जवळचे काही कार्यकर्ते प्रचंड श्रीमंत झाले आहेत, आम्ही त्यांची श्रीमंतीच पाहात बसायची का, असे लोक बोलू लागले आहेत.

कांद्याला भाव नाही, दुधाला दरवाढ जाहीर केली मात्र वाढ झालेली रक्कम मिळत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. सावंत यांनी मतदारसंघात रस्त्यांची कामे केली आहेत. असे असतानाही मतदारांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 81 हजारांचे मताधिक्य का दिले, याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे नागरिक बोलू लागले आहेत.

Tanaji Sawant is a businessman, Shiv Sena politician and deputy leader from Solapur district, Maharashtra.
Rohit Pawar: सत्ताधाऱ्यांच्या 'गेम प्लॅन'चे रोहित पवारांना 'टशन'; माझ्या विरोधात अपक्ष, पक्षाच्या लोकांना निवडणुकीत उतरवतील...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी सावंत आणि त्यांच्या जवळच्या लोकांचा उल्लेख मागे एकदा 'मलिदा गँग' असा केला होता. लोकांच्या ते अजूनही लक्षात आहे. काही ठरावीक कार्यकर्त्यांच्या मोठ्या गाड्या, त्यांच्या अंगावरील उंची वस्त्रे लोकांना दिसत आहेत.

शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये परंड्याचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार राहुल मोटे यांचे निकटवर्तीय जाकीर सौदागर यांचाही समावेश आहे. सौदागर हे आधीपासूनच सावंत यांच्यासोबत होते, त्यांचीच कामे ते करायचे. आता त्यांनी शिवसेनेच (Shivsena) प्रवेशाची औपचारिकता पार पाडली आहे, असे नागरिकांचे मत आहे.

कार्यकर्ते सोबत असले तरी लोक सावंतांपासून दुरावलेले आहेत, हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. आता सध्याही कमी-अधिक प्रमाणात तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सावंत यांना निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे, असे मतदारसंघातील जाणकारांचे म्हणणे आहे.

वादग्रस्त विधानांमुळे आरोग्यमंत्री सावंत हे कायम चर्चेत राहिले आहेत. मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, मी सांगेल तेच करायचे असे आयपीएस अधिकार्‍यांशी बोलताना ते जाहीरपणे बोलून गेले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी मिळावी, यासाठी उद्धव ठाकरे यांना मोठी रक्कम दिली होती, असे ते म्हणाले होते.

Tanaji Sawant is a businessman, Shiv Sena politician and deputy leader from Solapur district, Maharashtra.
Tanaji Sawnat News : पालकमंत्री सावंतांचा तीन माजी आमदारांना 'जोर का झटका'; शिवसेना शिंदे गटात नेतेमंडळींचा प्रवेश

उमेदवारी मिळवताना पक्षनिधी द्यावाच लागतो, त्यात नवीन काही नसते, हे आता लोकांनाही माहित आहे. राजेनिंबाळकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले असे सावंत सागंत होते, त्याचा दुसरा अर्थ असा होता की तत्कालीन खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी कापण्यासाठीही सावंतांनीच प्रयत्न केले.

खेकड्यांमुळे धरण फुटले, सत्तांतर झाल्यांनंतरच मराठा आरक्षणाची खाज सुटली, अशीही वादग्रस्त वक्तव्ये त्यांनी केली होती. स्वतःच्या अखंड प्रेमात बुडालेल्या सावंतांची अशा वक्तव्यांमुळे सातत्याने कोंडी झाली आहे, मात्र आपण त्याची पर्वा करत नाहीत, अशी त्यांची देहबोली असते. त्याचाच फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विधानसभा मतदारसंघात बसला होता.

पैसा, शक्ती, कार्यकर्त्यांच्या बळावर सर्वकाही करता येते, असा आविर्भाव सावंत यांचा असतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांचा हा समज कायम असल्याचे दिसत आहे. भूम-परंडा मतदारसंघातून त्यांची लढत महाविकास आघाडीचे राहुल मोटे यांच्याशी होण्याची शक्यता आहे.

राहुल मोटे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. तसेच ते भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचेही अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. आमदार पाटील यांचे वडील, राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे राहुल मोटे यांचे मामा आहेत. त्यामुळे सावंत यांच्यासमोर आव्हान मोठे आहे. त्यांनी तोंटपाटीलकी सुरूच ठेवली तर त्यांच्यासमोरील आव्हाने आणखी कठीण होत जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com