Tanaji Sawant Sarkarnama
विश्लेषण

Tanaji Sawant News : आरोग्यमंत्र्यांच्या या सरंजामी देहबोलीचे करायचे काय?

अय्यूब कादरी

Maharashtra Politics Latest News : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंतांना नेमके झाले तरी काय आहे? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. असा प्रश्न विचारण्याची संधी त्यांनी पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आहे, आपल्या राजकीय अपरिपक्वतेचे, सरंजामी वृत्तीचे दर्शन त्यांनी पुन्हा एकदा घडवले आहे. हे करताना त्यांनी या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट उपमर्द केला आहे. मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, असे ते एका आयपीएस अधिकाऱ्याशी बोलताना म्हणाले आहेत. तसा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओतील सावंत यांची देहबोली बेफिकिरी, असंस्कृतपणा दर्शवणारी आहे. सावंत यांनी तो व्हिडिओ पाहिल्यास याची प्रचिती त्यांनाही येईल.

तानाजी सावंत मुख्यमंत्री शिंदे यांनाच लक्ष्य करत आहेत?

काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण सुसंस्कृत होते. राजकीय नेते मर्यादा पाळायचे. त्यांच्यात मतभेद असले तरी मनभेद नसायचे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री ही अलीकडच्या काळातील त्याचे बोलके उदाहरण म्हणावे लागेल. २०१९ नंतर राजकारणाचे चित्र बदलले. पुढे काय काय झाले हे सर्वांना माहीत आहे. सावंत आणि अन्य नेत्यांची यांसारखी वक्तव्ये ही २०१९ नंतरच्या राजकारणाचे फलित आहे. सावंतांसारखे नेते लोकांना गृहीत धरू लागले. नेते एकमेकांवर गलिच्छ भाषेत टीका करू लागले. विरोधक एकमेकांना टार्गेट करणे, हे समजून घेता येईल; पण काही महिन्यांपासून सावंत मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनाच लक्ष्य करत आहेत. वादग्रस्त वक्तव्ये, मुजोरी आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सांवत यांचे जणू अतूट नातेच बनले. खेकड्यामुळे धरण फुटले, महाराष्ट्राला भिकेला लावणार, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही आदी वक्तव्ये सावंत यांनी केली आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात ते धाराशिवच्या पोलिस अधीक्षकांना म्हणत आहेत, की मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, मी सांगितले की करायचेच.... व्हायरल व्हिडिओनुसार, ते धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी बोलत आहेत. सावंत यांनी कुलकर्णी यांनी काहीतरी सांगितले. त्यावर डिस्कस (चर्चा) करू, असे कुलकर्णी म्हणाले. त्यानंतरचा सावंत यांचा तोरा, त्यांचे हातवारे लाजेने मान खाली घालायला लावणारे आहेत. ते पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांना म्हणतात, नाही डिस्कस वगैरे, नो डिस्कस, मी सांगितलं ते करायचे, मी मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही तर तुम्ही मला सांगितल्यावर ते कसं... करायचं म्हणजे करायचं. हां पुढे काही राडा झाला तर उचलून फेकू. त्याला काय, आपणच करणार की...

तानाजी सावंत नाराज झालेत, काय आहे कारण?

महाविकास आघाडी सरकार पडले. ते पाडण्यात तानाजी सांवत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असते. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या खात्याची अपेक्षा असावी. ती पूर्ण झाली नाही. सावंत हे धाराशिवचे पालकमंत्रीही आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सावंत यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यावेळी त्यांनी धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी जुळवून घेतले होते. युतीचे सरकार आल्यानंतर सावंत मंत्री झाले, धाराशिवचे पालकमंत्रीही झाले. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीचे निधी वाटप, वैद्यकीय महाविद्यालयाची जागा ठरवताना आमदार पाटील हे सावंतांना वरचढ ठरले. आमदार पाटील यांचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या दोन्ही प्रकरणांत आपले वजन आमदार पाटील यांच्या पारड्यात टाकले. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही तुळजापूर मतदारसंघाला अधिक निधी मिळाला. युतीचे सरकार आणण्यात मोठी भूमिका बजावूनही अशा काही घटनांमुळे सावंत नाराज झाले असतील. नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूंचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी यासाठी सर्व मंत्रिमंडळ जबाबदार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी स्वयंभू आहे, कुणाला भीत नाही, असा संदेश त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना द्यायचा असतो. मात्र, त्यासाठी निवडलेला मार्ग मात्र अत्यंत चुकीचा आहे, राजकारण्यांविषयी लोकांच्या मनात राग निर्माण व्हावा, लोकांना राजकारणाची किळस वाटावी, असा तो मार्ग आहे. सावंत यांच्यासारख्या राजकीय नेत्यांच्या भाषेची पातळी आणखी किती घसरणार आहे, हे पाहण्याशिवाय राज्यातील लोकांच्या हाती दुसरे काहीही नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT