Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Ajit Pawar : सत्तेसाठीच्या वेशांतराची वाच्यता अजितदादांसाठी ठरली अडचणीची

Maharashtra Politics BJP NCP : भाजपसोबत जाण्यापूर्वी अमित शाहांना भेटण्यासाठी वेशांतर करून दिल्लीला गेलो होते, असे अजितदादांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

अय्यूब कादरी

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता मुद्दा चर्चेत येईल, याचा नेम राहिलेला नाही. विशेषतः 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्वाचे सारे मुद्दे गेल्या पाच वर्षांत बाजूला पडले आणि केंद्रस्थानी आले ते पक्षांतर, सरकार पाडणे आणि पक्ष फोडाफोडीचे मुद्दे. नागरिकांना याचा वीट आला होता. आपला संताप नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केला होता. तरीही सत्ताधाऱ्यांकडून अशाच मुद्द्यांची चलती सुरू आहे. काका शरद पवार यांच्यापासून वेगळे होण्यापूर्वी अजितदादांनी वेशांतर करून दिल्ली गाठल्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे.

महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा खालावला आहे, अशी टीका सातत्याने होत आहे. त्यात तथ्य असल्याचे गेल्या पाच वर्षांतील घडामोडींवरून दिसून येत आहे. आधी शिवसेना-भाजप युती तुटली. त्यावेळी प्रचंड गदारोळ झाला. भाषेची मर्यादा न पाळता झालेले आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिपण्णींमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला.

हे आता बंद होईल, असे वाटायला लागले की त्यापेक्षा हीन पातळीचे वक्तव्य, आरोप कोणाकडून तरी केले जायचे. अशी वक्तव्ये, विधाने, उतावीळपणा करण्यात महायुतीचे काही नेते आघाडीवर दिसत असले तरी महाविकास आघाडीचेही काही नेतेही त्याला अपवाद ठरले नाहीत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही अशी विधाने, उतावीळपणा केलाच. फरक इतकाच की, पक्ष फुटून महायुतीला जाऊन मिळाल्यामुळे त्याची सहानुभूती महाविकास आघाडीला मिळाली, ती आजही कायम असल्याचे दिसत आहे.

एकनाथ शिंदे 40 आमदारांसह शिवसेनेतून फुटले आणि त्या सर्वांनी सूरतमार्गे गुवाहाटी गाठली. शिवसेनेतून फुटल्यावर काय होते, याची माहिती शिंदे यांना होतीच, त्यामुळे ते महाराष्ट्रात न थांबता गुवाहाटीला गेले. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे वेशांतर करून जायचे, असे फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी अजितदादा पवार दिल्लीत होते. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना, भाजपसोबत जाण्यापूर्वी अमित शाह यांच्यासोबत 10 बैठका झाल्या, असे त्यांनी सांगितले होते. मी मास्क, टोपी घालून अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीला जात असे, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले होते.

अजितदादा चाणाक्ष आहेत, मात्र त्यांचा स्वभाव थोडा मोकळाढाकळा आहे. त्यामुळे पत्रकारांसोबत अजितदादांच्या या अनौपचारिक गप्पा विरोधकांच्या हाती कोलितासारख्या ठरल्या. खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर टीकेची झोड उडवली. अजितदादांनी वेशांतर करून, नाव बदलून विमानप्रवास केला, हे देशाच्या सुरक्षेशी खेळ आहे, अशी टीका केली जाऊ लागली. यावर अजितदादा आता भडकले आहेत. मी नाव बदलून विमानप्रवास केला, याचे पुरावे द्यावेत, असे आव्हान त्यांनी दिले आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास राजकरण सोडून देईन, असेही आव्हान त्यांनी दिले आहे.

गेल्या काही वर्षांपासून राजकारणात नॅरेटिव्ह सेट करण्याचे खेळ सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, असे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला. महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण शरद पवार यांनी सुरू केले, असाही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला.

महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने दोन्ही नॅरेटिव्ह निकाली लागले आहेत. अजितदादांनी मास्क, टोपी घालून अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीला गेलो, असे सांगताच त्यांच्याविरोधात आणखी एक नॅरेटिव्ह सेट होण्याच्या धोका निर्माण झाला. त्यामुळेच नाव बदलून प्रवास केल्याचे पुरावे विरोधकांनी दिले तर मी राजकारण सोडेन, अशी निर्वाणीची भाषा अजितदादा बोलले आहेत.

महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा आणि शिखर बँक घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत केला आणि त्याच्या काही दिवसांनंतर अजितदादा 40 आमदारांसह भाजपसोबत गेले. काका शरद पवार यांची त्यांनी साथ सोडली. त्याचा फटका अजितदादांना राजकारणात सहन करावा लागला. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा पराभव झाला. भाजपमधूनही त्यांच्यावर टीका झाली.

सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजितदादांची गाडी सुसाट होती, पालकमंत्रिपदांच्या वाटपात त्यांना झुकते माप मिळाले होते. लोकसभेची निवडणूक आली आणि अजितदादांचा आलेख खाली घसरला. त्यामुळे आता आपल्याविरोधात कोणतेही नॅरेटिव्ह तयार होऊ द्यायचे नाही, याची काळजी अजितदादा घेत आहेत.

देवेंद्र फडणवीस वेशांतर करून एकनाथ शिंदे यांना भेटायचे. अमित शाहांना भेटण्यासाठी अजितदादा वेशांतर करून 10 वेळा दिल्लीला गेले. हे जाहीरपणे सांगून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांना काय मिळाले? त्यांच्या वेशांतराचे मतदार स्वागत करणार आहेत का? महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात कर्नाटक सरकारने मराठी बांधवांवर कानडी भाषेची सक्ती केली होती. त्या विरोधात आंदोलन करण्यासाठी छगन भुजबळ हे 4 जून 1986 रोजी वेशांतर करून बेळगावात दाखल जाले होते. तेथे त्यांनी आंदोलन केले होते. भुजबळ यांच्या त्या वेशांतराचे लोकांकडून आजही कौतुक केले जाते.

फडणवीस, अजितदादांचे वेशांतर मात्र सत्ताप्राप्तीसाठी होते, कोणाचे तरी सरकार पाडण्यासाठी किंवा कोणाचे तरी पक्ष फोडण्यासाठी होते, त्यामुळे ते उपहासाचे विषय बनले. मग त्याची जाहीर वाच्यता करून अजितदादांनी काय मिळवले? अजितदादांचे वेशांतर सत्तेसाठी होते, याचा विचार नागरिक करणारच आहेत. त्यामुळे शक्यता अशी आहे की, हे वेशांतर लोकांना आवडणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्याविरोधात एक नॅरेटिव्ह सेट करण्याची संधीच त्यांनी विरोधकांना मिळवून दिली. तसे होऊ नये यासाठीच अजितदादांनी विरोधकांना फैलावर घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT