CM Shinde Meet Bansode Sarkarnama
विश्लेषण

CM Shinde Meet Bansode: मुख्यमंत्री शिंदेंना बोलावले शिवसेना खासदारांनी; मात्र, चर्चा झाली राष्ट्रवादीच्या आमदाराची

उत्तम कुटे

पिंपरी : 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत दाखले तसेच कल्याणकारी योजनांच्या लाभांचे वाटप आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल (ता.16) पिंपरी-चिंचवड दौरा शिवसेना (शिंदे गट) खासदार अप्पा बारणे यांच्या निमंत्रणावरून झाला. पण, त्यात ते अचानक पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंच्या कार्यालयात गेल्याने या भेटीनेच हा दौरा गाजला. त्यावरून शहराच्या राजकारणात मोठे वादळ उठले.

आमदार बनसोडे हे पक्षांच्या बैठका, कार्यक्रमांना दांडी मारत असल्याने ते अस्वस्थ आणि नाराज असल्याची व त्यातून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्याला कालच्या भेटीने बळकटीच मिळाली. दरम्यान, या भेटीतून आमदार बनसोडे यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. आपल्या पक्षाला त्यांनी त्यातून नेमका संदेश दिला. 2024 ला उमेदवारी दिली नाही, तर शिवसेनेचा पर्याय असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

गतवेळी 2019 ला त्यांना डावलून सुलक्षणा शिलवंत-धर या नगरसेविकेला पक्षाने उमेदवारी दिली होती. अजितदादांमुळे ती बदलून बनसोडेंना नंतर देण्यात आली होती. ही बाब ते विसरलेले नाहीत. तसेच पक्षाच्या बैठका, कार्यक्रम यांना कधीच हजर राहत नसल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याविषयी शहरातील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते उत्सुक नाहीत, हे ही त्यांनी हेरले असावे. त्यांनाही या भेटीतून त्यांनी उत्तर दिले आहे.

तसेच पिंपरीतून तयारी करणारे भाजपचे इच्छूक यांनाही त्यांनी नेमका संदेश त्यातून दिला. त्यामुळे ते सुद्धा गॅसवर गेले आहेत. 2024 ला भाजपने जशी आपले खासदार नसलेल्या मतदारसंघात तयारी सुरु केली आहे, तशीच ती त्यांनी विधानसभेलाही केली आहे.

आमदार नसलेल्या ठिकाणी त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातूनच त्यांनी पिंपरी या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात आपले निवडणूक प्रमुख म्हणून अमित गोरखे यांची नुकतीच नेमणूक केली. त्यानंतर ते ही कामाला लागले असून 'घर चलो अभियान' त्यांनी पिंपरीत सुरु केले आहे.

कालच्या भेटीत आमदार बनसोडेंनी भगवी शाल देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यामुळे चर्चा झाली. तसेच भगवे स्वागत त्यांचेही शिवसेना खासदार बारणेंनी केले. त्यामुळे चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांना खासदार बारणेंनीच आपल्या घराजवळील 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी बोलावले होते.

त्यांनी 2024 च्या लोकसभेला मावळमधून मीच युतीचा उमेदावर असणार आहे, असे नुकतेच जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांना बोलावून एकप्रकारे आपल्या या प्रचाराचा नारळ अप्रत्यक्ष फोडण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, या अचानक भेटीने त्यांची नाही, आमदार बनसोडेंचीच चर्चा झाली. ती आजही शहरात सुरुच होती. विरोधी पक्षाचा आमदार असूनही बनसोडेंनी शहरातील पोलीस आणि महसूल यंत्रणेलाही या भेटीतून नेमका संदेश दिला.

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ असून त्यात दोन भाजपचे आमदार आहेत. युतीच्या जागावाटपात आमदार असलेले भोसरी आणि चिंचवड भाजपकडे तर पिंपरी हा राखीव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तेथे त्यांचा आमदारही (अॅड. गौतम चाबूकस्वार) 2014 ला होता. त्यांचा गतवेळी 2019 ला बनसोडेंनी पराभव करून दुसऱ्यांदा ते आमदार झाले. तेच पिंपरीचे पहिले आमदार आहेत. हवेलीच्या विभाजनानंतर 2009 ला पिंपरी या नवनिर्मित मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.

2024 ला शिवसेना (शिंदे गट) पिंपरीवर दावा ठोकणार आहे. पण, त्यांच्याकडे बनसोडेंना टक्कर देईल, असा तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे बनसोडे हेच आयते उमेदवार मिळाले, तर शिवसेनेला पिंपरीची जागा पुन्हा मिळवता येईल, असा हिशोब या भेटीमागे दडला असावा, अशी कुजबूज आता शहरात सुरु झाली आहे.

एका एसएमएसने झाली भेट आणि उठले वादळ

मुख्यमंत्र्यांचा दौरा काल नक्की होताच आमदार बनसोडेंनी त्यांना एसएमएस करीत आपल्या कार्यालयाला भेट देण्याची विनंती केली. ती त्यांनी आमदार बनसोडेंबरोबर याअगोदर मंत्रालय ते ठाणे असा आपल्या मोटारीतून प्रवास केलेला असल्याने लगेच मान्य केली.

'शासन आपल्या दारी' कार्यक्रम उरकताच शिवसेना खासदार व पदाधिकारी आणि युतीतील भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांच्या कार्यालय व घरी न जाता ते थेट आमदार बनसोडेंच्या कार्यालयात गेले अन् शहरात मोठे वादळ उठले. दोघांनीही ही सदिच्छा भेट असल्याचेच सांगितले. मात्र, या भेटीत दोघांनीही एकमेकांचे तोंडभरून केलेले कौतुक हे नंतर चर्चेचा विषय झाले नसते तर नवलच.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT