Garjana Morcha update : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रविवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत गर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मोठा प्रतिसादही मिळाला. हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील नेत्यांची उपस्थितीही लक्ष वेधून घेत होती. सर्वत्र या मोर्चाची चर्चा होत असताना आमदार आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थितिवरूनही चर्चांना उधाण आले आहे.
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चाची चर्चा होती. दोन्ही बंधूनी पत्रकार परिषद घेत मोर्चाची घोषणा केली होती. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चात सर्व पक्षांच्या नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले होते. त्यामुळे या मोर्चात कोण-कोण येणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
ठाकरे बंधूंच्या या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह इतर घटक पक्षांच्या नेत्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही मोर्चात सहभाग घेतला. मात्र, युवा सेनेचे अध्यक्ष असलेल्या आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
प्रत्यक्ष मोर्चात सहभागी न घेतलेले आदित्य ठाकरे यांच्याकडून सोशल मीडियातही गर्जना मोर्चाला महत्व दिल्याचे दिसत नाही. त्यांच्याकडून मोर्चानंतर 'एक्स' केवळ एकच पोस्ट करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल, अशी सुरूवात करत त्यांनी या पोस्टमध्ये निवडणूक आयोगावर शरसंधान साधले आहे. मात्र, गर्जना मोर्चाचा साधा उल्लेखही केला नाही.
आदित्य ठाकरे यांच्याकडून मोर्चाआधाहीही एकही पोस्ट करण्यात आलेली नाही, हे विशेष आहे. ठाकरे बंधूंनी या मोर्चासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली होती. दोन्ही पक्षांकडून सोशल मीडियात या मोर्चाचा जोरदार प्रचार करण्यात आला. पण आदित्य ठाकरे त्यापासून दूर राहिल्याचे दिसते. आदित्य यांच्या या भूमिकेवरून आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.