मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एकट्याने लढण्याचे आव्हान शिवसेनेला दिले होते, ते आम्ही स्वीकारतो. पण, आव्हान द्यायचे आणि मागे ईडी आणि इन्कम टॅक्सची पीडा लावायची, हे काही शौर्य नाही. हिम्मत असेल तर कार्यकर्ते राजकारणात जसे भिडतात, ते भिडा म्हणजे कोण सरस आहे, हे कळेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शहा यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले. (Uddhav Thackeray accepted Amit Shah's challenge)
(स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, मध्यंतरी अमित शहा म्हणाले हिम्मत असेल तर एकट्याने लढा. आमची एकट्याने लढण्याची तयारी आहे. शिवसैनिक आहोत आम्ही, मर्द आहोत. आम्ही एकट्याने लढू, अगदी वीरांसारखे लढू. पण, ही लढाई करताना तुमचे जे अधिकार आहेत, ते तुम्ही वापरायचे नाहीत. आम्ही आमचे अधिकार सत्ताधारी म्हणून वापरणार नाही. हिम्मत असेल तर कार्यकर्ते राजकारणात जसे भिडतात, तसे भिडा म्हणजे कोण सरस आहे, हे कळेल. पण आव्हान द्यायचे आणि मागे ईडी आणि इन्कम टॅक्सची पीडा लावायची, हे काही शौर्य नाही. शिवसेनाप्रमुख असते तर आज त्यांनी खास त्यांच्या भाषेत याचा समाचार घेतला असता, त्यामुळे त्यांनी आम्हाला अशी आव्हाने द्यायची गरज नाही.
आपण पुढे जात असताना भाजप आपल्याशी कसा वागला. वापरा आणि फेकून द्या, ही भाजपची नीती आहे. आपण हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांना पाठिंबा देत राहिलो. पण, ते हिंदुत्वाचा वापर स्वार्थीसाठी करत राहिले. सोयीप्रमाणे बदलणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. संघमुक्त भारत करू म्हणणाऱ्या नीतीशकुमारांशी भाजपने युती केली. खरे हिंदू असाल तर जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकच धोरण राबवावा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
लोकशाही आम्ही मोडली नाही. तुम्ही मोडली. फोडाफोडा करून आपले सरकार बनवायचे, ही भाजपची लोकशाही आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. ती उघडपणे केली आहे आणि लोकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यामुळे लोकशाहीबद्दल त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोमणाही त्यांनी भाजपला मारला.
ते म्हणाले की, खूप दिवसांनी समोरासमोर आलो आहोत. राज्यभर शिवसंपर्क मोहिम सुरु झाली आणि कोरोना वाढला. त्यानंतर मानेचे दुखणे, शस्त्रक्रिया. एक व्हायरस लाट आणू शकतो, तर शिवसेनेच्या तेजाची लाट आपण आणायची आहे. दिल्लीतसुध्दा बाळासाहेबांचा पुतळा बसवायचा आहे. गेली दोन महिने उपचारात गेले, लवकरात लवरकर महाराष्ट्र पिंजून काढणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.