Uddhav Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray Shivsena : ...तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा 'अच्छे दिन' येऊ शकतात!

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची जशी बांधणी केली होती तशीच बांधणी आजही हवी आहे. शिवसेनेला जेव्हा जेव्हा पराभवाला किंवा संकट आले तेव्हा तेव्हा हा पक्ष ताकदीने पुन्हा मैदानात उतरल्याचा इतिहास आहे.

प्रकाश पाटील - Prakash Patil

Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले रंग न बदलता भाजपविरोधात जनतेच्या प्रश्‍नावर लढा सुरू ठेवायला हवा. महायुतीकडे आज बहुमत असले तरी लोकशाहीत विरोधी पक्षालाही तितकेच महत्त्व आहे. शिवसेनेने (Shivsena) प्रबळ विरोधक म्हणून पुढे यावे किंवा तशी किमान प्रतिमा जपण्याचा तरी प्रयत्न करायला हवा. सभागृह असो की मैदान... सरकारला जनतेच्या प्रश्‍नावर जाब विचारण्याची ताकद शिवसेनेत आहे. या संधीचा फायदा उचलायला हवा.

विधानसभा निवडणुका संपल्या. निकाल लागले. महायुती जोमात आणि महाविकास आघाडी कोमात असे चित्र आहे. दर पाच वर्षांनी कोणीतरी सत्तेवर येते. कोणीतरी विरोधी बाकावर बसते. ही परंपरा लोकशाहीत सुरू असते. प्रत्येक पक्षाला बरे वाईट दिवस येत असतात. सध्या तरी देशभर भाजपचा झंझावात सुरू आहे. तो सक्षमपणे रोखणारा नेता अद्याप निर्माण झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा, विजयश्री खेचून आणणारे नेतृत्व विरोधी बाकावर दिसत नाही.

कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे लढवय्ये आहेत. ते डगडगता भाजपविरोधात मैदानात नेहमीच उतरताना दिसतात. आपल्या भूमिकेपासून तसूभरही मागे हटत नाहीत, याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. पण, देशात प्रत्येक राज्यात त्यांच्या नावावर निवडणूक लढवून विजय खेचून आणला जात नाही. जनतेतून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही हे ही तितकेच खरे. लोकसभेला गेल्यावेळापेक्षा त्यांना चांगल्या जागा मिळाल्या हे खरे. पण, कॉँग्रेस प्रत्येक राज्यात आपला दबदबा निर्माण करू शकली नाही.

लढवय्ये फडणवीस...

हे सर्व सांगण्याचे कारण असे की राज्यात विधानसभेचे जे निकाल लागले त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचीच चर्चा होते. हे महायुतीतील नेते आहेत ते नेहमीच म्हणतात, की ‘मोदी है तो मुमकीन है.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत भाजपसाठी प्रयत्न केले. त्यापैकी ते अडीच वर्षे विरोधी पक्षनेतेपदावर होते. या अडीच वर्षात त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडले. सरकारला नीट कारभारच करू दिला नाही. महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

वास्तविक 2019 मध्येच ते मुख्यमंत्री बनले असते. पण, उद्धव ठाकरे यांनी वेगळी वाट धरली. ते स्वत:च मुख्यमंत्री बनले. त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरूवात झाली. पुढे शिवसेनेतच उभे खिंडार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले. पुढे निवडणुका झाल्या आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. या सर्व घडामोडी गेल्या पाच वर्षात घडल्या आहेत. आता मुख्यमंत्री फडणवीस बनले आहे.

विधानसभा सभागृहात विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतकेही आमदार निवडून आणता आले नाहीत. निवडणुकीअगोदरच कॉँग्रेसच्या तर दोनचार लोकांनी स्वत:ला मुख्यमंत्री जाहीर करून टाकले होते. निकालानंतर हे नेते जमिनीवर आले. कुठे थेट पराभव तर कुठे हजार दीड हजार मतांनी विजय मिळाला.

...तर शिवसेनेला सुगीचे दिवस

त्यातल्या त्यात शिवसेनेची बरी कामगिरी राहिले इतकेच म्हणावे लागेल. या पक्षाचे वीस आमदार निवडून आले आहेत. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने फडणवीस सरकारविरोधात टीकास्त्र सुरूच ठेवले आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण किंवा परभणीतील सूर्यवंशी प्रकरण असेल. पक्षाने आपला हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.

एकेकाळचा परममित्र असलेला हा पक्ष भाजपचा एकनंबर विरोधक म्हणून पुढे आला आहे. उद्धव ठाकरे असोत की संजय राऊत त्यांनी महायुती सरकारविरोधात पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा चंग बांधलेला दिसतो. जर असेच चित्र राहिले तर शिवसेनेला पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतात. खरेतर शिवसेना हा पक्ष लढाऊ आहे. हाच त्यांचा बाणा आहे. पक्षाची आजही ताकद आहे. पण, ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची जशी बांधणी केली होती तशीच बांधणी आजही हवी आहे. शिवसेनेवर जेव्हा कधी संकट आले, तेव्हा हा पक्ष ताकदीने पुन्हा मैदानात उतरल्याचा इतिहास आहे. सत्ता मिळाली नाही म्हणून लढायचे थांबता कामा नये. पुढील पाच वर्षे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला संधी आहे या संधीचा कसा फायदा उचलतात. हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT