Shivsena uddhav thackeray Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Assemly Election : दुभंगलेल्या ताकदीसह बंडखोरांना नमवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर आव्हान!

प्रकाश पाटील - Prakash Patil

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सरसावले आहेत. दोन हात करण्यासाठी ते ठामपणे उभे राहिले आहेत. आपल्या शिवसेनेची बांधणी करीत आहेत. नवे कार्यकर्ते, नेते उभे करत आहेत. कोणताही पक्ष किंवा संघटना त्यांचा कितीही शक्तिमान विरोधक असला तरी कोणी एका रात्रीत संपत नाही. पक्षसंघटनेची बांधणी यथावकाश हळूहळू झालेली असते. कार्यकर्त्यांचं जाळं असतं. पक्षावर निष्ठा असते.

काही जण मात्र रातोरात निष्ठा बदलतात. पक्ष, झेंडे, कार्यालयातील आदर्श नेत्यांच्या तस्वीरीही बदलतात. ‘तो मी नव्हेच' अशी भूमिका घेतात. याचंही कौतुक वाटतं. पण सगळेच असे नसतात. पक्षाची ध्येयधोरणं कायम ठेवून एकाच पक्षात भले अन्याय झाला तरी पक्ष सोडत नाहीत. आपली निष्ठा अभंग असल्याचे दर्शन ते घडवतात.

शिवसेनेतही (Shvsena) आजपर्यंत अनेक नेते होऊन गेले. त्यांनी त्यांच्या हयातीत बाळासाहेबांची आणि पक्षाची साथ कधीच सोडली नाही. नावे घ्यायचीच असतील तर दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी हे आठवतात. नव्या कार्यकर्त्यांमध्येही तसे चित्र आहे. अगदीच नाही, असं म्हणता येणार नाही. हे सर्व सांगण्याचं कारण असं की, उद्धव ठाकरेंची (uddhav Thackeray) शिवसेना पुन्हा पाय रोवून उभी आहे.

शिंदेंच्या बंडामुळे पक्ष खिळखिळा झाला असला तरी लोकसभा निवडणुकीत पुन्हा पक्षाचे नऊ खासदार निवडून आले आहेत. काही आमदार आहेत. नेते, कार्यकर्तेही आहेत. पण पक्ष संघटित असतो, तेव्हा लढणे सोपे असते. ही मोळी विस्कटली की पुन्हा खूप मेहनत घ्यावी लागते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चमूसमोर खरे आव्हान आहे ते ५० आमदार पुन्हा निवडून आणण्याचे. नव्या चमूला नव्याने रसद पुरवावी लागणार आहे.

पक्ष बांधणीकडे कमी लक्ष

गेल्या पाच दशकांपासून शिवसेनेची झालेली बांधणी उत्तम होती. शिवसेनाप्रमुख, त्यानंतर नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसैनिक अशी रचना होती. त्यामुळे संपर्क ठेवणे सोपे जात होते. आज हे चित्र पक्षात दिसत नाही.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे मंत्री, महत्वाचे नेते मंत्री बनल्याने पक्ष संघटनेची कशी वाट लागली, हे दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले असेलही.परंतु चांद्यापासून बांद्यापर्यत पक्षाची बांधणी सुरू आहे असे दिसत नाही. शिवसेनेचे जे बालेकिल्ले होते, तेथेही हादरे बसले आहेत.

मुंबई, ठाणे, कोकण, पालघर, मराठवाडा, कोल्हापूरसह अन्य काही जिल्ह्यांत पक्षाने 2014, 2019 मध्ये चांगली कामगिरी केली होती. मोदी लाटेतही उद्धव ठाकरेंनी लढत देऊन दोन्ही काँग्रेसपेक्षा अधिक जागा निवडून आणल्या होत्या. आज मात्र पक्षफुटीमुळे ताकद विभागली गेली आहे.

महाराष्ट्र पिंजून काढण्याची गरज

आगामी निवडणुकीत कोण कोणाबरोबर असेल. कोण स्वबळावर लढेल, हे कळेलच. पण स्वबळावर लढायचे असते, तर शिवसेनेला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. पुणे, नगर किंवा असे काही जिल्हे आहेत तेथे या पक्षाचा एकही आमदार नाही.

आज पक्षाकडे नेत्यांची मोठी फौज नाही. भास्कर जाधव, संजय राऊत, सुषमा अंधारे, नितीन बानुगडे पाटील, अंबादास दानवे अशी नावे घेता येतील. बंडखोरांना निवडणुकीत कसा धडा शिकवितात, कोणता करिष्मा करून दाखवितात, हे आगामी काळात लक्षात येईलच. पण उद्धव ठाकरेंसमोर शिंदेंची शिवसेना हाच प्रमुख विरोधक असणार, हे नक्की.

उद्धव ठाकरेंसमोरील आव्हाने

  • पक्ष संघटनेची ताकद दुभंगलेली, ५० आमदार निवडून आणण्याचे आव्हान

  • मोजके नेते, नेत्यांची मोठी फौज नाही

  • शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांत हादरे, प्रमुख जिल्ह्यांत एकही आमदार नाही

  • काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सहाय्याने शिवसेना कशी लढत देते, हे महत्त्वाचे

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क : ९८८१५९८८१५

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT