Vinayak Raut And Bhaskar Jadhav sarkarnama
विश्लेषण

Bhaskar Jadhav : ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर; राऊतांच्या ठाम दाव्यावर भास्कर जाधवांचा पलटवार, म्हणाले,'हाच ह** पणा'

Vinayak Raut vs Bhaskar Jadhav : ठाकरेंच्या शिवसेनेत कोकणात फूट पडणारी घटना घडली असून चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये माजी खासदार विनायक राऊत आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यात वाद रंगला आहे.

Aslam Shanedivan

  1. चिपळूण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत (उद्धव ठाकरे) मोठी फूट पडल्याचे चित्र आहे.

  2. जाधव यांनी राष्ट्रवादीसोबत युती करण्यावर ठाम राहत ‘मी राष्ट्रवादीचाच प्रचार करणार’ असे सांगितले, तर राऊत यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली.

  3. या संघर्षामुळे कार्यकर्त्यांत गोंधळ निर्माण झाला असून राऊत-जाधव यांच्यातील शीतयुद्ध आता प्रत्यक्ष राजकीय संघर्षात रूपांतरित होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Ratnagiri News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चिपळूण नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा अंतर्गत वाद उफाळला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचे जाहीर करत प्रचारात भाग देखील घेतला आहे. दरम्यान माजी खासदार विनायक राऊत यांनी चर्चेची प्रक्रिया थांबवून ठाकरेंची शिवसेना चिपळूणमध्ये स्वतंत्र लढणार अशी घोषणा केली. त्यांनी नगराध्यक्ष पदासह सर्वच 21 जागांवर उमेदवारी अर्जही दाखल केले. यामुळे येथे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

राऊत यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांकडून काही चुका झाल्या असल्यास आम्ही माफी मागू” असे सांगून भास्कर जाधव यांना राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त करत मी माझ्या शब्दावर ठाम असून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचाच प्रचार करणार. कदमांचाच प्रचार करणार त्यांचे काम करणार. मग भलेही शिवसेनेचा उमेदवार पडला तरी मला फरक पडणार नाही अशी थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता राऊत–जाधव यांच्यातील शीतयुद्ध अधिक भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चिपळूण पालिकेवरून महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. परंतु शेवटच्या क्षणी बोलणी फिस्कटली आणि विनायक राऊत यांनी शिवसेनेकडून स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीला दिलेला शब्द पाळताना भास्कर जाधव अडचणीत सापडले आहेत. एकीकडे त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करत आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले.

तर दुसरीकडे गोवळकोट रोडवरील कार्यकर्ता मेळाव्यात राऊत यांनी पुन्हा एकदा कुठलीही आघाडी नाही, जाधव आमचे मार्गदर्शक आहेत आणि ते मशालीचाच प्रचार करतील असा दावा केला. यावेळी लावलेल्या पोस्टरवर जाधव आणि राऊत यांचे फोटो शेजारी शेजारी दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. ज्यावर भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त करताना प्रचंड संतापही व्यक्त केला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी, हाच राजकारणातला पराकोटीचा नीचपणा आहे. पराकोटीचा नीचपणा. दुसरीकडे मी माझी भूमिका स्पष्ट केली असतानाही तुम्ही बैठक घेता भाषणात सांगता की भास्कर जाधव आपल्या सोबत आहेत. जे काही लोक बाकीचे बोलताय त्याच्यावर विश्वास ठेवू नका, आपण सगळे एक आहोत. मी तुमच्याकडे आघाडीच्या बोलणीसाठी आलो नव्हतो. तुम्हीच माझ्याकडे आला होतात.

आता आग लागो त्या नगरपालिकेच्या निवडणुकीला. सगळे पडा नाही किंवा जिंका. मला काय करायची आहे? असेही त्यांनी म्हटलं आहे. तर आपले फोटोही बॅनरवर लावले जातात. मी तेथे नसतानाही, हाच ह** पणा आहे. मी कोणत्याही परिस्थितीत रमेश जाधव यांचाच प्रचार करणार. मला कोकणातील जबाबदारी हवी होती असे कधीच नव्हते. निष्ठेच्या गप्पा मारून पाठीमागून पाय ओढणे मला जमत नाही. पक्षप्रमुखांना खोटे सांगण्याची हिंमत काहीजणांना कशी होते? असा सवाल देखील केला आहे.

तसेच एकीकडे मला निरोप पाठवायचा की मी येणार आहे आणि येथे न येताच जायचं, पक्षप्रमुखांना काय वाटेल ते सांगायचे असे उद्योग केले जात आहेत. पण माझ्यावर तसे संस्कार झालेले नाहीत. मी माझा दुश्मन जरी भेटायला तरी त्याला भेटतो. आपण तर एकाच पक्षातले आहोत.

पण आता हा विषय मागे राहिला असून जे उमेदवार मी त्या ठिकाणी आघाडीमध्ये निवडले आहेत. त्यांचेच काम करणार आणि रमेश कादमांचाच प्रचार करणार असे म्हटले आहे. तर राऊत यांनी निवडणुकीत सांगणे एक आणि करण एक असे करून मला चिडवण्याचे काम केल्यासारखं केलं आहे. माझ्यात आणि त्यांच्यात वादच नाही किंवा काही भांडण नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर मी त्यांच्याशी तसे वागल्याचे त्यांनी दाखवावे.

FAQs :

1) प्रश्न: शिवसेनेत वाद कशामुळे पेटला?
उत्तर: चिपळूण पालिका निवडणुकीत स्वतंत्र लढायचे की राष्ट्रवादीसोबत युती करायची यावरून राऊत आणि जाधव यांच्यात मतभेद झाले.

2) प्रश्न: भास्कर जाधव यांची भूमिका काय आहे?
उत्तर: ते राष्ट्रवादीसोबत युती करण्याच्या भूमिकेवर ठाम असून राष्ट्रवादी उमेदवाराचाच प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

3) प्रश्न: विनायक राऊत यांनी काय जाहीर केले?
उत्तर: त्यांनी शिवसेना (उद्धव) चिपळूण पालिकेत सर्व जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

4) प्रश्न: कार्यकर्त्यांमध्ये काय स्थिती आहे?
उत्तर: दोन्ही गटांतील मतभेदामुळे कार्यकर्ते संभ्रमात असून संघटनात्मक पातळीवर गोंधळ निर्माण झाला आहे.

5) प्रश्न: पुढे काय होऊ शकते?
उत्तर: हा वाद आमने-सामने राजकीय संघर्षात बदलण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT