लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (Assembly Election) सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भाजपची सत्ता असलेल्या या राज्यांतील नागरिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अटीतटीची ठरणार आहे. त्यासाठी भाजपकडून विरोधकांना नमवण्यासाठी राजकीय डाव टाकले जात आहे. असे करताना भाजपकडून मागील 37 वर्षांची राजकीय परंपराही मोडीत काढली आहे.
विधानसभेच्या उपाध्यक्षांची निवडणूक हे त्यामागचं कारण आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खेळी करत भाजपने उपाध्यक्ष पदाची निवडणूक अपरिहार्य केली आहे. उत्तर प्रदेशच्या इतिहासात विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्याची दुसऱ्यांदा वेळ आली आहे. येथील राजकीय परंपरेनुसार विधानसभेचे अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे तर उपाध्यक्ष पद मुख्य विरोधी पक्षाकडे दिले जाते. 1984 नंतर उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झालेली नाही.
1984 मध्ये उपाध्यक्ष पदासाठी पहिल्यांदाच मतदान झाले होते. काँग्रेसला 1980 च्या निवडणुकीत बहुमत मिळाले होते. त्यानंतर दोन वर्षांतच दोन मुख्यमंत्री बदलण्यात आले. 1984 मध्ये नारायण दत्त तिवारी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. याचदरम्यान काँग्रेसनेही उपाध्यक्ष पदाची परंपरा तोडली. यावेळी काँग्रेसने हुकुम सिंह यांना उमेदवारी दिली. तर विरोधकांनी रियासत हुसैन यांना निवडणुकीत उतरवलं होतं. पण काँग्रेसकडं बहुमत असल्यानं हुकुम सिंह या निवडणुकीत विजयी झाले. पण तेव्हापासून मागील 37 वर्षांत एकदाही पुन्हा निवडणूक झाली नाही.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत असल्याने भाजपकडून उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार उतरवण्यात आला आहे. विरोधकांना एकही संधी न देण्याची खेळी भाजपने खेळली आहे. भाजपने ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल (Naresh Agrawal) यांचे पुत्र नितीन अग्रवाल (Nitin Agrawal) यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. भाजप समर्थित उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नितीन हे सध्या अधिकृतपणे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. नरेश अग्रवाल काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पण अद्याप नितीन यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. त्यामुळे आता नितीन यांनीही भाजपचा पाठिंबा घेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं समाजवादी पक्षाला धक्का बसला आहे.
या निवडणुकीत सपाच्या उमेदवारानंही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सपामधीलच दोन आमदार या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढणार असल्याचे चित्र आहे. पण नितीन अग्रवाल हे अजूनही सपाचेच आमदार असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी त्यांनाच तिकीट देत राजकीय डाव टाकला. अग्रवाल समाजाला खूष करण्यासाठी निवडणुकीच्या तोडांवर नितीन यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी सहा तासांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. भाजपकडे बहुमत असल्याने अग्रवाल यांचा विजय निश्चित आहे. पण सपाने राजकीय संदेश देण्यासाठी या निवडणुकीत उमेदवार उतरवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.