कोलकता : माजी केंद्रीय मंत्री व पश्चिम बंगालमधील (West Bengal) खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी नुकताच भाजपला (BJP) धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना डच्चू देण्यात आल्यानं ते नाराज होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी भाजपची खासदारकी सोडणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
सुप्रियो यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते पाचवे नेते ठरले होते. त्यांच्या आधी 4 भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सुप्रियो यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर दोनच महिन्यांत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करुन भाजपला धक्का दिला.
बाबुल यांनी सोमवारी सकाळी ट्विट करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सोपवणार असल्याची माहिती दिली. खासदार पदाचा राजीनामा सोपवण्यासाठी ओम बिर्ला यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजताची वेळ दिली आहे. आता मी भाजपमध्ये नसल्याने खासदारांना मिळणारे वेतन व इतर सुविधांचा लाभ मी घेऊ शकत नाही. ही जागा मी भाजपकडून जिंकलो होतो. मी जागा पुन्हा जिंकेन, असं बाबुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, तृणमूलमध्ये दाखल झाल्यानंतर भाजप सोडण्याचे कारण विचारताच सुप्रियो म्हणाले की, माझे स्वागत करणाऱ्या आणि मला ११ जणांमध्ये स्थान देणाऱ्या संघाचा मला हिस्सा व्हायचे होते. खरेतर मेस्सीलाही बार्सिलोना सोडायचा नव्हता. वेळच अशी आली की त्याला पत्रकार परिषदेत अश्रू आवरता आले नाहीत. नंतर तो पीएसजीकडे गेला. आता तो पीएसजीसाठी खेळताना मनातून बार्सिलोनाचा असेल, अशी अपेक्षा आपण करायची का? जुन्या संघातील खेळांडूंशी निष्ठा दाखवण्यासाठी तो गोलपोस्टसमोर नुसतात उभा राहील का?
मी कोणत्याही संघाकडून खेळलो तरी त्या संघासाठी मी रक्त आणि घाम गाळेन. जनतेच्या पैशातून पगार घेऊन केवळ खुर्ची गरम करणारा मी नाही. मला खेळण्यासाठी मैदानात उतरवेल त्या संघाचा मला सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे मी तुम्हाला फुटबॉलचे उदाहरण दिले आहे, असेही सुप्रियो यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचाही समावेश होता. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर सुप्रियो यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ उडाला होता. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. तसेच, खासदारकीचाही राजीनामा देण्याचीही घोषणा केली होती. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला होता. अशा प्रकारे त्यांनी पक्षालाच तोंडावर पाडले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.