Vasant More Sarkarnama
विश्लेषण

Vasant More : सर्वात आधी शिवसैनिक, मग मनसैनिक, नंतर भीमसैनिक अन् आता पुन्हा शिवसैनिक! वसंत मोरेंचं नेमकं चाललंय काय..?

Sandeep Chavan

Pune News : रोडरोलर 'वंचित'च्या दारात लावून वसंत मोरे गुरुवारी(ता.4) दुपारी थेट 'मातोश्री'वर जाऊन धडकले. येत्या 9 जुलै रोजी वसंत मोरे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीला वसंततात्या मतपत्रिकेतील 9 नंबरचा रोडरोलर घेऊन पुण्यातल्या रस्त्यारस्त्यावर फिरत होते. पण याच मोरेंनी आता आपला ट्रॅक बदलायचा निर्णय घेतला आहे. त्यांनी वंचितला 'बाय' करत ठाकरेंना 'हाय' केलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तात्यांचं नेमकं चाललंय तरी काय? असाच प्रश्न राजकीय क्षेत्रात पडतो आहे.

लोकसभा निवडणुकीला वसंत मोरे मतपत्रिकेतील 9 क्रमांकाच्या 'रोडरोलर'वरून पुण्याच्या गल्लोगल्लीत फिरत होते. 4 एप्रिल रोजी प्रकाश आंबेडकरांच्या ( Prakash Ambedkar) 'वंचित'मध्ये प्रवेश करत रोडरोलरवर चढले खरे पण अवघ्या 60 दिवसांतच रोडरोलरवरून खाली उतरले आणि तो 'वंचित'च्या दारात लावून आज थेट मातोश्रीवर जाऊन धडकले.

शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वसंत मोरे लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील, असं सूतोवाच राऊत यांनी केलं होतं त्याला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिलाय.

येत्या 9 जुलै रोजी आपण शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं मोरे यांनी सांगितलं. अवघ्या दोनच महिन्यात आपण वंचितची साथ सोडताय, या प्रश्नावर वसंत मोरेंनी, निकाल काय लागला ते आपण पाहिलंत, असं म्हटलं. मला वंचितच्या मतदारांनी स्वीकारलं नाही, असंही ते म्हणाले.

तात्यांनी वंचितला 'बाय' अन् ठाकरेंना 'हाय' का केलं ?

मनसेच्या स्थापनेपासून म्हणजे तब्बल 18 वर्षे वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरेंना साथ दिली. आपल्या अनोख्या आंदोलनांनी सर्वांचं लक्ष वेधत वसंत मोरेंनी मनसेचा पुण्यातील आक्रमक चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्या जोरावर ते 2007, 2012 आणि 2017 असे सलग तीनदा पुण्याचे नगरसेवक बनले. पुणे महापालिकेत मनसेचे विरोधी पक्षनेते, गटनेते आणि मग शहरप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

त्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मशिदींवरील भोंग्यावरून त्यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळं त्यांना शहरप्रमुखपद सोडावं लागलं. त्यानंतर ते काहीसे नाराज झाले. अखेर लोकसभा उमेदवारीच्या मुद्यावरून पक्षातील पदाधिकाऱ्यांशी झालेले मतभेद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी 12 मार्च रोजी मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केला आणि काहीही झालं तरी आपण लोकसभा लढणारच, असा निर्धार केला.

लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं विचारणा केली, साहेबांची भेटही घेतली. तिथं जुळलं नाही म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडं विचारणा केली. संजय राऊतांचीही गाठ घेतली मात्र पुण्याची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला जाणार हे निश्चित झाल्यानं त्यांनी वंचितची वाट धरली. वंचितनं त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली, प्रचाराचा नारळ फुटला, रोडरोलर पुण्यात फिरला, जरांगे फॅक्टरचा फायदा मिळावा म्हणून मराठा उमेदवार असा प्रचारही करून पाहिला पण निकाल काही वेगळाच लागला.

भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांसमोर वसंत मोरेंचा निभाव काही लागला नाही. वसंत मोरेंमुळं धंगेकरांच्या मतांमध्ये घट होऊन भाजपच्या मुरलीधर मोहोळांना फायदा होईल, असं काहीसं चित्र निर्माण झालं खरं पण तसंही काही झालं नाही. 'पुण्याची पसंत मोरे वसंत' हा प्रचार या दोन तगड्या उमेदवारांसमोर काही चालला नाही. मोरेंना अवघी 32012 इतकीच मतं मिळाली.

मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे तिघेही एकेकाळचे पुण्याचे माजी नगरसेवक. आज या तिघांचाही राजकीय आलेख पाहिला तर मुरलीधर मोहोळ पहिल्याच दमात खासदार बनले आणि त्यानंतर पहिल्याच खासदारकीत थेट केंद्रात राज्यमंत्री बनले. रवींद्र धंगेकर जायंट किलर ठरत आमदार बनले पण वसंत मोरे आमदार, खासदारकीला उभे राहून आजही माजी नगरसेवकच राहिले.

वसंत मोरे यावेळी पहिल्यांदाच लोकसभेला उभे राहिले असले तरी त्यांनी याआधी दोनवेळा विधानसभेलाही उभं राहून आपलं नशीब आजमावलंय. 2009 आणि 2019 मध्ये त्यांनी हडपसर मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढवली होती पण दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला होता.

वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात दाखल झाल्यास ते हडपसर विधानसभेची उमेदवारी मागू शकतात. तिकडं हडपसरसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप इच्छुक आहेत तर काँग्रेसकडूनही या जागेवर दावा केला जाऊ शकतो. त्यामुळं हडपसरची जागा कुणाला सुटणार यावर वसंत मोरे यांचा पुढील राजकीय प्रवास अवलंबून असेल. अर्थात, मोरे खडकवासलामधूनही उमेदवारी मागू शकतात पण तसं झालं तर पुन्हा तिथंही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या सचिन दोडकेंचं काय हाही प्रश्न उरतोच.

सर्वात आधी शिवसैनिक मग मनसैनिक, मग भीमसैनिक आणि आता पुन्हा शिवसैनिक असा प्रवास करत करत वसंत मोरे राजकारणात स्वतःला स्थिर करू पाहात आहेत.

आधी धनुष्यबाण खाली ठेवला, मग इंजिनाची साथ सोडली, त्यानंतर वंचितला जय भीम करत आता मशाल हाती घेण्याचा निर्धार केलाय. एकूणच काय तर शिवसेना ठाकरे गटाची ही मशाल वसंत मोरे यांचं राजकीय जीवन प्रकाशमय करणार का हे आगामी काळच ठरवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT