Vilasrao Deshmukh - Gopinath Munde News Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : वेगळी विचारधारा, राजकीय पक्षही वेगळे; तरी विलासराव अन् गोपीनाथ मुंडेंच्या मैत्रीची आजही चर्चा...

Vilasrao Deshmukh - Gopinath Munde Friendship News : गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेत्यांच्या भाषेची पातळी घसरली आहे...

अय्यूब कादरी

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे(Gopinath Munde) या लोकनेत्यांच्या मैत्रीची चर्चा त्या दोघांच्या पश्चात आजही होत असते. दोघांचे पक्ष वेगळे असले तरी त्यांची मैत्री निखळ होती, निस्पृह, घट्ट होती. मैत्रीच्या आड त्यांनी त्यांच्या पक्षांना येऊ दिले नाही. अशी मैत्री महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच. दोघे एकत्र आले की, प्रेक्षकांच्या कानांना खमंग, दर्जेदार मेजवानी मिळायची.

विलासराव, गोपीनाथराव यांची भाषणे आजही मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. मैत्री असावी तर अशी, भाषण असावे तर असे, आजही गावोगावी लोक असे बोलताना आढळून येतात. गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेत्यांच्या भाषेची पातळी घसरली आहे. त्या पाश्वर्भूमीवर या दोन नेत्यांची आठवण येणे साहजिक आहे. तशी ती मंत्री गिरीश महाजन यांनाही आली होती.

लातूरचे पालकमंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, मी लोकनेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या तालमीत तयार झालो आहे. त्यांची भाषणे ऐकण्यासारखी असायची. विलासराव आणि गोपीनाथराव यांची जुंगलबंदी पाहणे आणि ऐकणे हा एक वेगळा अनुभव असायचा. मात्र, सध्या होणारी टीका टिप्पणी ऐकून कानावर हात ठेवावे वाटतात, अशी खंतही महजानांनी व्यक्त केली होती.

महाजन काहीही चुकीचे बोलले नव्हते, मात्र काळाच्या ओघात एकनाथ खडसे यांच्यासोबतच्या वाद-प्रतिवादात तेही याला अपवाद ठरले नाहीत. गिरीश महाजन यांच्या पक्षातील अशा नेत्यांची यादी लांबलचक होईल. भाजपसह सर्वच पक्षांतील अशा नेत्यांची यादी मोठी होऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय नेत्यांच्या भाषेची पातळी घसरू लागली. 2019 मध्ये भाजप -शिवसेनेने युती करून निवडणूक लढवली होती. सरकार स्थापनेच्यावेळी मात्र, शिवसेना भाजपपासून वेगळी होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा हात धरला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांच्या भाषेची पातळी वरचेवर घसरू लागली.

गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi News) कोसळून महायुतीचे सरकार आल्यानंतर तर त्यांची भाषा इतकी घसरली की अनेक लोकांनी टीव्ही पाहणे बंद केले. टीव्हीवर नेते आले की, अनेकजण चॅनेल बदलू लागले. या नेत्यांची भाषा चीड आणणारी, त्यांच्या वैचारिक दारिद्र्याचे दर्शन घडवणारी ठरू लागली. त्याचा परिणाम असा झाला की राजकारण, राजकीय नेते, राजकीय पक्ष यांच्याबाबत लोकांच्या मनात असलेली नकारात्मक भावना प्रचंड वाढीला लागली. अशा वातावरणात गिरीश महाजन यांना विलासराव आणि गोपीनाथराव यांची, त्यांच्या मैत्रीची, त्यांच्या भाषणांची आठवण येते, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

लातूर आणि बीड हे मराठवाड्यातील एकमेकांच्या शेजारी असलेले जिल्हे. विलासराव आणि गोपीनाथराव यांच्या अनेक बाबींमध्ये साम्य आढळते. दोघांनीही अगदी गावपातळीपासून राजकारण सुरू केले. दोघेही सामान्य परिस्थितीतून आलेले. पुढे दोघांनीही राज्याच्या, देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. 1980 च्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकदाच विधानसभेत गेले. त्यांची मैत्री महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झाली होती.

मुंडे भाजपचे, देशमुख काँग्रेसचे होते. त्यांचे मतदारसंघही शेजारीच होते. मुंडे यांनी अनेक वर्षे रेणापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि विलासरांवानी लातूरचे. त्यांनी कधीही एकमेकांना पाडण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, याचे कारण अर्थातच मैत्री.

दोन्ही पक्षांतील काही नेत्यांना त्यांची मैत्री खटकत असे, मात्र विलासराव आणि गोपीनाथराव यांनी त्याला कधीही महत्त्व दिले नाही. आम्ही दोघे किती चांगले मित्र आहोत, असे ते जाहीर कार्यक्रमांतून सांगायचे. राजकारणालीकडची अशी मैत्री करणे आणि ती जाहीरपणे सांगणे हे धाडसाचेच काम होते. त्यांचे कार्यक्रमात एकत्र येणे ही प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरत असे. ते एकमेकांच्या फिरक्या घ्यायला लागले की समोर हशा पिकायचा.

राज्यात युती सरकार आले आणि गोपीनाथराव उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या विलासरावांनी त्यांचा लातूर येथे नागरी सत्कार करून आपल्या निखळ मैत्रीचे दर्शन घडवून आणले होते.

आता असे चित्र दिसून येत नाही, राजकारणात अशी मैत्रीही दिसून येत नाही. एकमेकांवर टीका करतानाची पातळी तर कमालीची घसरली आहे. विलासराव आणि गोपीनाथरावांनी राजकीय भाषणांना प्रतिष्ठा मिळवून दिली होती. साहित्यिक वर्तुळातही त्यांचा वावर असायचा. अलीकडच्या काळात अपवाद वगळता राजकारण्यांची स्वतःची माती करून घेतली आहे, समाजात पत कमी करून घेतली आहे. अशा वातावरणात विलासराव आणि गोपीनथराव या लोकनेत्यांच्या मैत्रीची,भाषणांची आठवण अनेकांना आवर्जून येते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT