Vilasrao Deshmukh  Sarkarnama
विश्लेषण

Vilasrao Deshmukh : विलासराव देशमुखांना 'ही' कला भारीच जमायची..!

अय्यूब कादरी

तो दिवस होता 14 ऑगस्ट 2012. लातूरसह अख्खा मराठवाडा आणि राज्यही सुन्न झाले होते. सगळीकडे दुखाःचे मळभ दाटून आले होते. महाराष्ट्राने एक लोकनेता, लातूरने सरपंच ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारलेला भूमिपुत्र गमावला होता. होय, विलासराव देशमुखच! दीर्घ आजाराशी त्यांचा संघर्ष या दिवशी संपला होता. विलासरावांना संगीताची प्रचंड आवड होती, ते कलासक्त होते. ते स्वतः उत्तम हार्मोनियम वाजयवायचे.

लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर सांगतात, " विलासराव देशमुख हे कलासक्त होते. शास्त्रीय संगीत ऐकणे हा त्यांचा एकमेव विरंगुळा होता. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी शास्त्रीय संगीत ऐकायची एकही संधी सोडली नाही. त्यांना शास्त्रीय संगीताची जाण होती. त्यांचे वडील दगडोजीराव यांनाही संगीताची आवड होती. त्यांच्या घरात बालंगधर्व आदींच्या संगीताच्या खूप रेकॉर्डंस होत्या. लातूरच्या गंजगोलाईत गेलल्या 52 वर्षांपासून नवरात्रात संगीत महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवाला कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आदी दिग्गजांनी हजेरी लावलेली आहे. या महोत्सवाला कष्टकरी लोक यायचे. त्यामुळे कार्यक्रम रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान सुरू व्हायचा. दगडोजीराव या महोत्सवाला न चुकता हजेरी लावायचे. त्यामुळे विलासरावांनाही संगीताची आवड लागली."

महाविद्यालयात असताना विलासराव हार्मोनियम उत्तम वाजयावचे. त्यांचे बंधू दिलीपराव हे तबला उत्तम वाजवतात. विलसरावांना संगीतातले सूक्ष्म बारकावे कळत असत. बेसूर झाला, ठेका बदललेला त्यांना कळत असत. पुण्याचे उल्हासदादा पवार हे विलासरावांचे मित्र. उल्हासदादा यांचे भीमसेन जोशी यांच्याशी चांगले संबंध होते. मुख्यमंत्री असताना विलासराव वेळ काढून भीमसेन जोशी यांना भेटायला जायचे. संगीत ही अमूर्त कला आहे, त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात, संगीतातून काय व्यक्त होते, अशा विषयांवर ते भीमसेन जोशी यांच्याशी गप्पा मारत असत, अतुल देऊळगावकर सांगत होते.

लातूर येथे स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आय़ोजित केली जाते. 2009 मध्ये या व्याख्यानमालेचा रौप्यमहोत्सव होता. यानिमित्त अतुल देऊळगावकर आणि अन्य आयोजकांच्या मागणीनुसार लातुरात सवाई संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. हा महोत्सव पुण्याच्या बाहेर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. महोत्सवात तिन्ही दिवस विलासरावांनी हजेरी लावली, पहिल्या रांगेत बसून ते दाद द्यायचे. कलापिनी कोमकली यांचे गायन सुरू असताना त्यांच्यासाठी काहीजण चहा घेऊन आले. विलासरावांनी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि चहा परत नेण्यास सांगितला. कलाकारांनी कशी दाद दिली जाते, हाडाचा संगीत रसिक कसा असतो, हे विलासरावांनी त्याद्वारे दाखवून दिले होते, अशी आठवण अतुल देऊळगावकर यांनी सांगितली.

देऊळगावकर पुढे सांगतात, की कुणीही फोन केला तरी विलासराव देशमुख तो उचलायचे, उचलणे शक्य नाही झाले तर त्याला पुन्हा कॉल करायचे. डॉक्टरला जसा पेशंट कळतो, तसे लोक स्वतःच्या कामासाठी की इतरांच्या कामासाठी भेटायला यायचे, हेही त्यांना त्यांना कळत असे. मांजरा कारखाना आणि लातूरची मूकबधिर शाळा हे त्यांचे दोन मोठे वीक पॉइंट होते. शहरात कुणी पाहुणा आला की ते आवर्जून या दोन संस्था दाखवायचे. त्यावेळी ही शाळा राज्यात उत्कृष्ट होती.

मांजरा कारखान्यात त्यांनी कार्य संस्कृती रुजवली. उत्कृष्ट माणूस नेमायचा आणि त्याच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, असा विलासरावांचा शिरस्ता होता. त्यामुळेच या दोन्ही संस्था नावारूपाला आल्या होत्या. त्यावेळी मराठवाड्यात उसाला 9 ते 10 टक्के उतारा मिळायचा. अशा काळात मांजरा कारखान्याचा उतारा 13 टक्के होता. यातून झालेला नफा त्यांनी उसउत्पादक शेतकऱ्यांना, कामगारांना दिला. कामगारांना दोन-तीन महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्याची सुरुवात मांजरा कारखान्यानेच केली.

एकेकाळी काँग्रेसमध्ये उदारमतवाद होता. नेत्यांमध्ये समाजाबद्दल कणव असायची. अशा नेत्यांच्या पिढीचे विलासराव देशमुख हे शेवटचेच प्रतिनिधी. यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान असताना लातूर येथील तुकाराम श्रंगारे हे केंद्रात मंत्री होते. श्रंगारे हे अत्यंत प्रामाणिक. त्यामुळे त्यांना अखेरपर्यंत स्वतःचे घर बांधता आले नाही. ते लेबर कॉलनीत राहायचे. ते आजारी असल्याची माहिती विलासरावांना मिळाली. ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांना गुपचूप पाच लाख रुपयांची मदत देऊन आले होते, असे देऊळगावकर यांनी सांगितले.

विलासराव मनात अढी ठेवून वागत नव्हते. अनिल पौलकर हे लातूरचे ज्येष्ठ पत्रकार. ते पूर्वी साम टीव्हीचे प्रतिनिधी होते. त्यावेळी लातुरात पाण्याचे खासगीकरण करण्यात येणार होते. विलासरांवाचा तो ड्रीम प्रोजेक्ट होता. नळाला मीटर लावून 24 तास पाणीपुरवठ्याची ती योजना होती. हा विलासरावांचा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी त्यांचे कार्यकर्ते लोकांपर्यंत ते योग्यरितीने पोहोचवण्यात अयशस्वी ठरले होते. त्यामुळे ती योजना लादली जातेय, अशी भावना निर्माण झाली, त्यामुळे लोकांचा या योजनेला मोठा विरोध होता. लोकभावना लक्षात घेऊन पौलकर यांनी त्यावेळी पाण्यावरचे लोणी ही मालिका सुरू केली होती. साम टीव्हीसह ती 'सकाळ'मध्येही प्रसिद्ध होत असे. त्यावेळी विलासराव केंद्रीय मंत्री होते. ते एक जानेवारीला लातुरात विमानाने आले, विमानतळावर पत्रकारांनी त्यांना गाठले, पण आपण काहीही बोलणार नाही, असे विलासरावांनी पत्रकारांना सांगितले.

या पत्रकारांमध्ये पौलकर हेही होते. पौलकर सांगतात, विलासराव रागात होते. त्यांना पाण्यावरची मालिका आवडलेली नाही, असे दिसत होते. मी म्हणालो, साहेब, नवीन वर्षाच्या शुभेच्छा तरी द्या! गाडीत बसत बसत ते गर्रकन वळले आणि म्हणाले, मी तुमच्या शुभेच्छा रोज पाहतो, मला रोज सायंकााळी तुमच्या शुभेच्छा मिळतात, असे म्हणत ते निघून गेले. मला वाटले मी आता त्यांच्या बॅड बुकमध्ये गेलो, मात्र दोन-तीन महिन्यांतच माझा तो समज खोटा ठरला. तीन महिन्यांनी कुटुंबासह दिल्लीला पर्यटनासाठी गेलो. अधिस्वीकृती असल्याने आमची सहा दिवसांची निवास व्यवस्था मी महाराष्ट्र सदनात करून घेतली. दोन दिवसांनी मला असे कळवण्यात आले की, एका कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रातील आएएस अधिकारी दिल्लीत येत आहेत, त्यामुळे तुम्हाला येथे राहता येणार नाही. प्राधान्यक्रमानुसार महाराष्ट्र सदनाची भूमिका योग्य होती, मात्र त्यामुळे माझी मोठी अडचण झाली होती.

पौलकर सांगतात, सर्व प्रयत्न करून झाल्यावर मी विलासरावांना फोन केला. त्यांनी तो उचलला. मी बोलत असताना ते फक्त हां हां, असे म्हणत होते. माझ्या लक्षात आले ते नाराज आहेत. मी म्हणालो, मी दिल्लीत आहे आणि माझी अडचण झाली आहे. त्यावर त्यांनी काय असा एकच शब्द विचारला आणि अडचण सांगितल्यावर म्हणाले, आय एम इन हंगेरी. हंगेरीच्या संसदेत माझे भाषण. मी म्हणालो, सर, यूआर इन हंगेरी, बट आय एम हंग्री, असे म्हणताच ते जोरात हसले आणि फोन कट केला. मला वाटले आता आपली अडचण सुटणार नाही, पण पुढच्या पाचच मिनिटांत त्यांच्या पीएचा फोन आला आणि त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये आमची सोय करून दिली.

विलासराव म्हटले की त्यांच्या खास वक्तृत्वशैलीची चर्चा निश्चितपणे होतेच. त्यांच्या वक्तृत्वकलेचे लाखो चाहते सापडतील. सामाजिक कार्यकर्ते मेघराज बरबडे हे त्यापैकीच एक. लातूर, धाराशिव जिल्ह्यात त्यांचे भाषण असले की बरबडे सहसा ते चुकवायचे नाहीत. माणसे जपयाची कशी, हे विलासरावांकडून शिकले पाहिजे, असे बरबडे सांगतात. कोणाच्याही खांद्यावर हात घालून बोलणे, भाषणात चिमटे काढणे ही त्यांची खासियत. त्यांची भाषा अत्यंत सुसंस्कृत अशी असायची. बीड येथे स. मा. गर्गे पुरस्काराचे वितरण विलासरावांच्या हस्ते झाले होते. त्या कार्यक्रमाला गोपीनाथ मुंडे, सुरेश धस आदी उपस्थित होते. त्यावर्षीचा पुरस्कार भारतकुमार राऊत यांना प्रदान करण्यात आला होता. त्याचदरम्यान सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची जिल्हा परिषदेतील सत्ता गेली होती. विलासराव बोलायला उठले आणि त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना हळुवार चिमटा काढला. सुरेश धस यांचा उल्लेख करताना, ज्यांचे नाव एेकले अनेकांच्या काळजात धस्स होते, असे सुरेश धस.. असे ते म्हणाले होते. अर्थात गोपीनाथ मुंडे यांनीही नंतर तशाच शैलीत त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

विलासरावांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले, त्यांना राजकारणात संधी दिली. किल्लारी येथील (जि. लातूर) किल्लारी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकीय अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्यानबा राजोळे यांना संधी दिली होती. ग्यानबा राजोळे हे कोरेगाव (ता. उमरगा) येथील शेतकरी. कारखान्याला ते अडचणीतून बाहेर काढू शकतात, याची खात्री विलासरांवाना होती. झालेही तसेच. ग्यानबा राजोळे यांनी आपल्या प्रशासकीय अध्यक्षपदाच्या काळात एक रुपयाचाही भ्रष्टाचार होऊ दिला नाही. ते कारखान्यावर जाताना स्वतःसह अन्य 20 ते 25 लोकांच्या जेवणाचा डबा घरातून न्यायचे. विलासराव असे पारखी होते, कोण कसे आहे त्यांना कळायचे. त्यांचा संपर्क ग्राऊंड लेव्हलवरच्या कार्यकर्त्यांशी असायचा. आलूर (ता. उमरगा) येथील माजी सरपंच मलप्पा व्हट्टे हे विलासरावांचे निकटवर्तीय. आलूरचा पेढा प्रसिद्ध आहे. व्हट्टे हे मुंबईला, लातूरला जाताना विलासरावांसाठी आलूरचा पेढा न्यायये. व्हट्टे यांना पाहताच, आलूरचा पेढा आला, अशी टिपण्णी विलासराव करायचे, अशी आठवण बरबडे यांनी सांगितली.

आज राजकीय वातावरण कलुषित झाले आहे. सुस्ंकृतपणा हरवून गेला आहे. एकमेकांच्या विरोधात बोलताना नेत्यांचे भान हरपत आहे. नेते वापरत असलेल्या भाषेचा स्तर घसरला आहे. राजकारणात जात, धर्माच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले जात आहे. नेत्यांमधील कणव, उदारता संपुष्टात आली आहे. अशावेळी महाराष्ट्राला विलासराव देशमुख यांची उणीव प्रकर्षाने भासत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT