Shiv sena's Manifesto Sarkarnama
विश्लेषण

Shiv sena's Manifesto : शिवसेनेचा ‘वचननामा’ निर्माण करेल का कुटुंबप्रमुखाचे प्रेम?

Assembly Election 2024 : महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील दीड वर्षापेक्षा अधिक काळ हा कोविड संक्रमणाचा होता. या काळात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राने कोविडच्या काळात हाताळलेली परिस्थिती देशभरात वाखाणली गेली होती.

दीपा कदम

Maharashtra Political News : शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी तुलनेने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मात्र अपेक्षित यश मिळालेले नाही. या पक्षाला संघटनात्मक पातळीपासून नव्याने पक्षबांधणी हातात घ्यावी लागली आहे. त्यातच ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गमवावे लागल्याचा फटकाही या पक्षाला बसला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने उभारी घेत ‘कुटुंबप्रमुखाचा वचननामा’ जाहीर केला आहे.

शिवसेनेचा (Shivsena UBT) यापूर्वी ‘वचननामा’ येत असे, यंदा प्रथमच ‘कुटुंबप्रमुखाचा वचननामा’ जाहीर करण्यात आला आहे. कोरोना काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यात आले होते. कोरोना काळात संपर्क साधण्यास बंदी असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधत त्यांना त्या काळात धीर दिला होता.

काळजी कशी घ्यायला पाहिजे, ‘क्वारंटाईन’मध्ये काय शिस्त पाळण्याची गरज असते. इथंपासून सतत हात धुणे आणि मास्क वापरणे याची गरज याविषयीही ठाकरे संवाद साधत होते. संपूर्ण जगावरच ही वेळ प्रथमच आली होती. अशा आव्हानात्मक परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) साधलेला संवाद लोकांना आश्वासक वाटत होता. याच काळात परराज्यातील कामगारांना प्रवास करण्यास मज्जाव केला गेला होता. ट्रेन, रस्ते वाहतूकही बंद होती, त्यावेळी हजारो कामगारांची अन्नपाण्याची व्यवस्था, उपचाराची व्यवस्था करण्याकडे ठाकरेंनी लक्ष पुरवले होते.

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील दीड वर्षापेक्षा अधिक काळ हा कोविड संक्रमणाचा होता. या काळात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राने कोविडच्या काळात हाताळलेली परिस्थिती देशभरात वाखाणली गेली होती. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री म्हणून कौतुक केले गेले. त्यातूनच त्यांना राज्याचे ‘कुटुंबप्रमुख’ म्हटले गेले होते. विरोधकांनी या उपाधीची खिल्ली उडवली होती मात्र लोकांना ठाकरेंचा संवाद आशादायी वाटला होता.

शिवसेना ठाकरे गटाने याचाच आधार ‘वचननामा’ सादर करताना घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या या काळात तयार झालेल्या प्रतिमेचा वापर करण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळातही हा पक्ष व्यक्तिकेंद्रीत होता, तो यापुढच्या काळातही तसाच असेल, हे देखील ठळकपणे ‘कुटुंबप्रमुखाचा वचननामा’ या टॅगलाईनमधूनच स्पष्ट होत आहे. 

पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचे वचन

शिवसेना-भाजपा युतीचे १९९५ मध्ये सरकार आले त्यावेळी शिवसेनेने गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले होते, तसे ते ठेवलेही होते. वाढत्या महागाईमुळे हे आश्वासन पुन्हा एकदा देण्यात आले आहे. यावेळी मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता तांदूळ, गहू, डाळ, तेल आण साखरेचे भाव स्थिर ठेवण्याचे वचन देण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातली आणि कोविडच्या काळात खूप ही योजना लोकप्रिय झाली होती. महाविकास आघाडीने दहा रुपयांत ‘शिवभोजन थाळी’ सुरू केली. कोरोनोकाळात ‘शिवभोजन थाळी’ पाच रुपयांत देण्यात आली होती. या ‘शिवभोजन थाळी’चा विस्तार करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. युतीच्या काळात   ‘एक रुपयात झुणका भाकर’ युती सरकारने सुरु केली होती. मात्र कालांतराने ही योजना बंद पडली, मात्र शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध

शिवसेना ठाकरे गटाने धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध केला आहे. त्याचा उल्लेखही वचननाम्यात करण्यात आला आहे. राज्याचे गृहनिर्माण धोरण नव्याने आखण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.   धारावीकरांना त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी हक्काच्या सुविधांसह जिथल्या तिथे घरे दिली जातील. त्यासाठी नव्याने निविदा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. अदानी उद्योग समूहाला दिलेली जमीन परत घेऊन एक लाख भूमिपुत्रांना हक्काचे घर दिले जाणार आहे.

शिवाजी महाराज मंदिर

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे आणि अरबी समुद्रात महाराजांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतरही तिथे पुतळा उभारण्यात आलेला नाही. उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक भाषणात याविषयी संताप व्यक्त करतात. त्याच पार्श्वभूमीवर  शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वचननाम्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी मंदीर उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

त्याचबरोबर प्रगतीशील व पुरोगामी संस्कृतीचे दर्शन घडवणारी आधुनिक लेणी साकारली जाणार आहे. यामागचे पुरेसे स्पष्टीकरण वचननाम्यामध्ये नसले तरी ‘मराठी माणसाला पुढची हजारो वर्षे आपण कोण याची प्रेरणादायी आठवण यातून होईल’, अशी ही लेणी असणार आहेत. 

स्वतंत्र महिला पोलिस ठाणे उभारणार

महिला सुरक्षेचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या यापूर्वीच्या वचननाम्यामध्ये ठळकपणे होता. यावेळचे वेगळेपण म्हणजे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या बरोबरीने २४ x ७ स्वतंत्र महिला पोलिस ठाणे सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारींची नोंद तातडीने करुन धेणे, प्राधान्याने महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.  

महिलांना एसटी, बेस्ट, टीएमटी, पीएमपीए , एनएमएमटी आदीमध्ये बस प्रवास मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे, ती आकर्षक आहे. मात्र गेली पंचवीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या मुंबई महापालिकेचा उपक्रम असणारी बेस्ट ही तोट्यात आहे. महापालिकेच्या अनुदानावर ती चालते याचीही नोंद होणे आवश्यक आहे. महिला बचत गटांना ताकद देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या मार्फत रोजगार निर्मिती करणे आणि लघू उद्योगांना चालन देण्यासाठी अशा मंत्रालयाची मदत होवू शकते.

रोजगार निर्मितीचे आश्‍वासन

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वचननाम्यामध्ये रोजगार निर्मितीवर भर देण्यात आली आहे. सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले जाणार आहे. त्याचा रोजगार निर्मितीसाठी फायदा होणार आहे. शिवसेनेचा वचननाम्यामध्ये यावेळी प्रथमच ‘कोणत्याही धर्माच्या कारभारात सरकार अवाजवी, विनाकारण हस्तक्षेप करणार नाही’ असे आश्वासन देण्यात आले आहे. मागच्या पाच वर्षात ‘हनुमान चालिसा’वरुन उद्धव ठाकरेंनाच लक्ष करण्यात आले होते.

ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातच मनसेने ‘मशिदीवरील भोंगे हटाव’ची मोहिम हाती घेतली होती. हे प्रकरण स्वतः ठाकरेंनीच मुख्यमंत्री म्हणून हाताळल्याने यामागच्या राजकारणाची झळ त्यांना चांगलीच बसली होती. ही प्रकरणे ज्या संवेदनशीलपणे ठाकरेंनी हाताळली त्यानंतरच्या काळात मुस्लिम मतदारांनी शिवसेनेला स्वीकारल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले.

वर्सोवा मतदारसंघात मुस्लिम उमेदवाराला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारी देणे हे त्याचेच निदर्शक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘कोणत्याही धर्माच्या कारभारात सरकार अवाजवी, विनाकारण हस्तक्षेप करणार नाही’ हे आश्वासन म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष कात टाकत आहे आणि ती स्वागतार्ह आहे. मात्र या पुढील काळातही ते या वचनांवर किती ठाम राहतात हे  पाहावे  लागेल.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT