Suvendu Adhikari, Mamata Banerjee (AI Image) Sarkarnama
विश्लेषण

Assembly Election news : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी; ममतादीदींची प्रतिष्ठा पणाला, भाजपचा डाव फसणार की गड मजबूत होणार?

Nandigram Bypoll, Rejinagar Bypoll, West Bengal Election, Mamata Banerjee : तृणमूलच्या दोन गटांमुळे मतविभागणीची शक्यता, सत्तेच्या बळावर भाजप आघाडीवर तर ममतांसमोर करिष्मा दाखविण्याचे आव्हान.

Rajanand More

West Bengal Bypolls : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात मोठा भूकंप झाला होता. राज्यात भाजपची सत्ता येताच माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कधीकाळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड असलेल्या नंदीग्राममध्ये पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये तब्बल ६० हून अधिक आमदार आणि २० खासदारांनी वेगळी चूल मांडली आहे. तर पक्षाचे संघटन आपल्याबाजूने असल्याचा दावा ममतादीदी करत आहे. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नंदीग्रामसह रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून बुधवारपासून प्रक्रिया सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन मतदारसंघात विजय मिळविला होता. त्यांनी नंदीग्राम मतदारसंघाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. तर नावदाचे आमदार हिमांशु कबीर हे रेजीनगर मतदारसंघातूनही विजयी झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे.

दोन्ही मतदारसंघ तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानले होते. मात्र, आता राजकीय उलथापालथ झाल्याने पक्षाची ताकद कमी झाली आहे. त्यातच पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरू असल्याने ममतादीदींसमोर राजकीय अस्तित्वाचेच संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात आपली संपूर्ण ताकद झोकून देत पुन्हा एकदा करिष्मा दाखविण्याची पहिली संधी त्यांच्याकडे असणार आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या भाजपलाही दोन्ही मतदारसंघात विजय मिळवत सरकारवर मतदारांचा विश्वास अधिक दृढ असल्याचे दाखवून द्यावे लागणार आहे. या लढाईत भाजपची बाजू वरचढ आहे. राज्यात सत्ता आणि राजकीय ताकद वाढल्याने ममतादीदींच्या तुलनेत ही लढत सोपी जाईल, असे वाटत आहे.

आधी पक्ष-चिन्हाची लढाई

ममता बॅनर्जी यांच्यासाठी पोटनिवडणुकीआधी पक्ष आणि चिन्हाची लढाई महत्वाची असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर असून ६ ऑक्टोबर रोजी मतदान तर ९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. तृणमूलचा वाद आयोगाकडे असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी त्यावर तोडगा निघण्याची शक्यता नाही. म्हणजे पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार, याचा निर्णय आयोगाला इतक्या कमी वेळात देता येणार नाही.

पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवून दोन्ही गटांना नवे नाव आणि नवे चिन्ह या निवडणुकीपुरते दिले जाईल. असे झाल्यास ममता बॅनर्जी इथेच अर्धी लढाई हरणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक ममता बॅनर्जी यांच्यासाठी सोपी असणार नाही. तृणमूलच्या बंडखोर गटाकडून या निवडणुकीत उमेदवार उतरविला जाणार का, याबाबतही उत्सुकता आहे. तृणमूलचे दोन्ही गट मैदानात उतरल्यास मतविभागणीही अटळ असेल. भाजपसाठी ही जमेची बाजू असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT