Ramdas Kadam-Anil Parab

 

Sarkarnama 

विश्लेषण

रामदास कदम यांच्या डोक्यात अनिल परब केव्हा गेले?

अनिल परब (Anil Parab) यांच्यावर तिखट हल्ला चढवत रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा शिवसेनेतून `करो या मरो`चा पवित्रा

योगेश कुटे

मुंबई : माजी मंत्री आणि शिवसेना नेता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आज शिवसेनेतील अंतर्गत वाद महाराष्ट्रासमोर आणला. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर जोरदार आरोप करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले आहे. सेनेतील अशा प्रकारचा वाद बऱ्याच वर्षांनी बाहेर आला आहे. उद्धव ठाकरे हे सध्या तरी परब यांच्या बाजूने झुकल्याचे दिसत आहेत. त्यामुळे या वादाची परिणती कदम यांच्यासाठी नकारात्मक असेल.

परब आणि कदम यांच्यातील हा वाद समजण्याआधी 2019 मधील काही घटनांचा मागोवा घ्यावा लागेल. कदम हे त्या आधी 2014 च्या फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात होते. या मंत्रीमंडळात विधान परिषदेतून आमदार झालेल्या सुभाष देसाई, दिवाकर रावते, दीपक सावंत आणि कदम या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. त्या वेळी अनिल परब यांचा उदय होत होता. भाजपशी विविध विषयांवर वाटाघाटींची चर्चा करण्यात परब हे महत्वाची भूमिका बजावत होते. संजय राऊत हे जाहीरपणे शिवसेनेची भूमिका मांडत असले तरी तेव्हा पडद्यामागील घडामोडीत खासदार अनिल देसाई आणि परब हेच प्रमुख चेहरे होते. कदम यांच्याकडे औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. पर्य़ावरण विभागाचे खाते महत्वाचे खाते त्यांच्याकडे होते. त्याचे `महत्व` समजण्यासाठी सेना नेतृत्व सक्षम होते. त्यामुळे त्यावरूनही कदम यांच्याकडे पाहण्याचा संघटनेचा वेगळा कल होता.

त्याच वेळी कदम आपला मुलगा योगेश याची राजकीय सोय लावायची होती. ती लावण्यासाठी त्यांना आपला आधीचा खेड-दापोली हा मतदारसंघ हवा होता. तो मिळविण्यासाठी त्यांना बराच आटापिटा करावा लागला. कारण परब यांनी योगेश कदम यांना उमेदवारी देण्यास विरोध केला. तेथे राष्ट्रवादीचे संजय कदम यांना उमेदवारी देण्याचा परब यांचा आग्रह होता. त्यावरूनच रामदास कदम आणि परब यांचा पहिला खटका उडाला. मला पुढच्या मंत्रीमंडळात करू नका पण मुलाला संधी द्या, अशी अजिजी कदम यांना करावी लागली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी योगेश यांना उमेदवारी दिली. योेगेश निवडून आले. मुलगा विधानसभेत आणि पिता विधान परिषदेत, असे रामदासभाईंच्या मनाप्रमाणे ठरले.

निवडणुका झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर अचानकपणे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री झाले. तीन पक्षांचे सरकार असल्याने सेनेतून कितीजणांना मंत्रीपदाची संधी मिळणार याची शंका होतीच. त्यावेळी कदम हे ठाकरे यांना भेटले. ``तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नवीन असणार आहेत. तुमच्या मदतीसाठी मी, सुभाष देसाई आणि रावते यांचा अनुभवी मंत्री म्हणून उपयोग होईल. त्यामुळे आम्हाला पुन्हा मंत्री म्हणून संधी द्या,`` अशी विनंती कदम यांनी ठाकरे यांना केली आहे. घेणार असाल तर आम्हा तिघांनाही एकत्र घ्या किंवा एकालाही घेऊ नका, अशीही सूचना त्यांनी केली. त्या सूचनेवर ठाकरे यांनी होय म्हटले. पण त्याच वेळी सुभाष देसाई पुन्हा ठाकरेंच्या मंत्रीमंडळात आले. एवढेच नाही तर ठाकरेंनी परब यांनाही मंत्री म्हणून घेतले. आपले नाव परब यांनीच कान भरल्याने डावलले गेले, हे कदम यांना कळून चुकले.

हे एवढ्यावरच थांबले नाही तर परब यांनाच रत्नागिरीचे पालकमंत्रीपद मिळाले. तेव्हा तर मग छुपा संघर्ष उघडरित्या सुरू झाला. परब यांच्या रिसाॅर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांना कदम यांनीच माहिती दिल्याचा परब यांचा संशय बळावला. त्यांनी मग कदम यांचे पंख छाटण्यास सुरवात झाली. माजी आमदार सूर्यकांत दळवी हे परब यांच्याच गटाचे होते. दळवी आणि कदम यांच्यातील वाद आधीपासूनच होता. त्यामुळे दळवी-परब एका बाजूला आणि कदम दुसऱ्या बाजूला असे युद्ध रंगले. योगेश कदम यांचे विधानसभेचे तिकिट 2024 च्या निवडणुकीत कापण्याचा बेत कदम-परब जोडीने आखल्याचा संशय कदम यांना आला. या जोडीची पावलेही तशीच पडली.

त्यात कदम यांच्या परब यांच्या विरोधातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. मग तर कदम यांना पक्षातून बेदखल करण्याची संधी परब यांना मिळाली. त्यांना विधान परिषदेचे तिकिट पुन्हा मिळणार नसल्याचे नक्की झाले. दापोलीतील नगरपालिका निवडणुकीत कदम पितापुत्रांना डावलून दळवी यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. परब एवढ्यावरच थांबले नाहीत. ठाकरे हे आजारपणामुळे गेले काही दिवस पक्षाकडे फारसे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे परब यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेत कदम यांचे रत्नागिरीतील संघटनेतील पंख पुरते छाटून टाकले. त्यांच्या मतदारसंघातील शिवसेना संघटनेत बदल करत कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवला. शिवसेनेच्या नगरपालिका निवडणूक प्रचारात कदम यांची गद्दार म्हणून हेटाळणी झाली.

या साऱ्या अपमानानंतर कदम यांचा कडेलोट झाला. शांत राहतील ते रामदासभाई कदम कसले? त्यांनी परब यांचे नाव घेत जाहीर हल्लाबोल चढविला. आता या हल्ल्याला परब यांनी थेट उत्तर दिले नसले तरी ते पण कदम हे संघटनेत राहणार नाहीत, यासाठी रणनीती आखत असतील, याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सेनेतील या दोन नेत्यांचा संघर्ष आणखी काही दिवस पाहण्यासारखा असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT