Latur,Nilanga Political News : आजोबा, माजी मुख्यमंत्री (कै.) शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कामाचा जमाखर्च मागत संभाजी पाटील निलंगेकर यांनी २००४ ची विधानसभा निवडणूक जिंकली होती. तीन वेळा आमदार, एकदा मंत्रिपद उपभोगून आता स्वपक्षाचे सरकार सत्तेवर असताना लातूरचा पाणीप्रश्न सोडवा म्हणणाऱ्या संभाजी पाटील यांनी आपल्यालाही कुणीतरी प्रश्न विचारावेत, हिशेब मागावा, अशी तजवीज स्वतःच करून ठेवली आहे.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनेल जॉईन करा)
शहरात भरदुपारची वेळ होती. २००४ च्या विधानसभा निवडणुकीचा हंगाम होता. उमेदवारासाठीची प्रचारफेरी संपल्यानंतर तरुणांचे लोंढे एका ठरावीक ठिकाणी जमा होत होते. तेथे त्यांच्या पोटाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्यामध्ये उत्साह मोठा होता. कारण नातवाने आजोबांच्या विरोधात दंड थोपटले होते. भाजपचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आजोबा, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आतापर्यंत केलेल्या कामाचा हिशेब मागायला सुरुवात केली होती. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. नातू संभाजी पाटील यांनी आजोबा शिवाजीराव पाटील यांचा २३५६ मतांनी पराभव केला.
हे आता आठवण्याचे कारण म्हणजे २००४ नंतर २००९ वगळता (२००९ च्या निवडणुकीत आजोबांनी त्यांचा पराभव केला होता) सलग आमदार राहिलेले संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जलसाक्षरता रॅली काढली आहे. म्हणजे आजोबांना हिशेब विचारून आमदार झालेले संभाजी पाटील यांनी आपल्या कार्यकाळात काय केले? विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही होते.
दिवंगत शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि विद्यमान आमदार तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असे चार मुख्यमंत्री मराठवाड्याने दिले, मात्र त्यांच्या कार्यकाळात मराठवाड्यातील शेती व पिण्यासाठी पश्चिम वाहिनीतून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी कायमस्वरूपी मिळू शकले नाही, असा आमदार संभाजी पाटील यांचा आक्षेप आहे. तो खराही आहे.
पाणीप्रश्नच नव्हे, तर अन्य क्षेत्रांतही मराठवाड्याला भरीव असे मिळाले नाही. म्हणून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. त्यांनाही जनता किंवा कुणीतरी हिशेब मागणारच आहे. यंदा पावसाने दडी मारली आहे. पिके धोक्यात आली आहेत.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात सोडावे या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील नागरिकांना जलसाक्षर करण्यासाठी आमदार पाटील संपूर्ण गणेशोत्सवात हे अभियान राबवणार आहेत.
गणेश चतुर्थीला त्याची सुरुवात झाली. जिल्ह्याला पाणी मिळावे, यासाठी जनरेटा वाढवणार असल्याचे ते सांगत आहेत. आमदार म्हणून त्यांची मागणी, भूमिका अत्यंत योग्य, जागरूकतेची आहे. मात्र ते मंत्री होते. तिसऱ्या वेळी आमदार म्हणून निवडून आले आहेत, यातील बहुतांश कालावधी त्यांच्याच पक्षाचे सरकार राज्यात होते. मग त्यावेळी त्यांनी काय केले, हा प्रश्न मार्गी का लावला नाही, असा प्रश्न पुढे-मागे निर्माण होऊ शकतो. (कै.) शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सात ते आठ वेळा निलंगा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ या कालावधीत ते मुख्यमंत्री होते. अर्थातच त्यांनीही मतदारसंघात विकासकामे केली होती. आमदार संभाजी पाटील यांनीही विविध विकासकामे केली आहेत, मात्र निवडणूक जिंकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्या आपल्याही अंगलट येऊ शकतात, हे आता त्यांच्या लक्षात येईल. आमदारकीची तिसरी टर्म आणि त्यातील दोन वर्षे कॅबिनेट मंत्रिपद... या काळात या प्रश्नासाठी संभाजी पाटील यांनी काय केले, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ शकतो.
आमदार पाटील हे भाजपमधील नितीन गडकरी गटाचे समजले जातात. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. लातूरचा पाणीप्रश्न सोडवण्यात फडणवीस यांनाही अपयश आले, असे मानायचे का? की आता शक्य नसलेल्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात आपली दखल घेतली जावी, यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे, असे समजायचे? राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे सर्वच मतदारसंघांतील चित्र बदलणार आहे.
अशा परिस्थितीत सर्वच राजकीय नेते आपला खुंटा बळकट करण्यासाठीच प्रयत्न करत आहेत. तसा तो संभाजी पाटीलही करत असावेत. लातूरचा पाणीप्रश्न सुटावा, ही सर्वांचीच इच्छा आहे. आता दुष्काळी परिस्थितीमुळे आमदार संभाजी पाटील यांना हा प्रश्न उपस्थित करावा, असे वाटले असेल. मात्र, त्याद्वारे आपल्यालाही प्रश्न विचारले जावेत, याची तरतूद खुद्द संभाजी पाटील यांनीच केली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.