मंत्र्यांवर पक्षवाढीचा प्रश्न – नागपूरमधील चिंतन शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्षवाढीसाठी काम न करण्याबद्दल फटकारले.
पालकमंत्र्यांवर नाराजी – भंडारा–गोंदिया, वाशिम, बुलढाणा आणि हिंगोली अशा जिल्ह्यांमध्ये दिलेली जबाबदारी अनेक मंत्र्यांनी दुर्लक्षित केल्याची चर्चा असून स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत.
निर्वाणीचा इशारा – अजित पवार यांनी स्पष्ट केले की जिल्ह्यात काम न करणाऱ्या मंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी किंवा खुर्ची खाली करावी, अन्यथा पद इतरांना दिले जाईल.
Nagpur, 19 September : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या विदर्भातील नागपूरमध्ये चिंतन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराच्या पहिल्याच सत्रात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला. पण, पक्षाच्या हायकमांडवर ही वेळ का आली, याचेही चिंतन होण्याची गरज आहे. सत्तेमुळे मंत्र्यांच्या भोवती गर्दी होत आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मतदारसंघाबाहेर पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले, हा संशोधनाचा विषय आहे. अनेक पालकमंत्री नेमून दिलेल्या जिल्ह्यात जायलाही तयार नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीचे श्रेष्ठी व्यूहरचनेत कमी पडली की पक्षवाढीत मंत्र्यांना रस नाही, असा सवाल चर्चेला जात आहे.
दोन तासांच्या पर्यटनासाठी आमच्याकडे येऊ नका. यायचं असेल तर आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, त्याला ताकद कशी मिळेल, यासाठीच या, असा इशारा राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी दिला. पण, पटेलांना तो इशारा का द्यावा लागला, असा प्रश्न उपस्थित होतो. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी किती मंत्र्यांनी दौरे केले. विदर्भातील किती जिल्हाध्यक्षांना घेऊन ते संबंधित जिल्ह्यात जनतेत गेले, असा विषय आहे.
खुद्द प्रफुल पटेल यांच्या भंडारा गोंदिया या जिल्ह्याचे पालकत्व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे आहे. मात्र, गेल्या नऊ महिन्यांत सहकार मंत्री पाटील यांनी विदर्भाचा किती वेळा दौरा केला. भंडारा-गोंदियामध्ये फक्त झेंडावंदनासाठी गेले की काय म्हणूनच राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी थेट राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या चिंतन शिबिरात नाराजी व्यक्त केली काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
पटेलांनी ‘हा इशारा कोणा एका मंत्र्यासाठी नव्हता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांसाठी होता. पक्ष सत्तेवर आला म्हणून तुम्ही मंत्री आहात, त्यामुळे पक्षाच्या प्राथमिकेतला तुम्ही नजरअंदाज करू शकत नाही,’ असे नंतर स्पष्ट केले. मात्र, पटेल यांनी हा इशारा नेमका कोणासाठी दिला, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या व्यतिरिक्त कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे वाशिमची जबाबदारी आहे. भरणे यांच्याकडे हे पालकमंत्री येऊन साधारण महिना ते दीड महिना झाला असवा. त्या अगोदर वाशिमची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे होती. पण सतत प्रवास करावा लागत असल्याने मुश्रीफांनी ही जबाबदारी सोडली. पण त्यांनीही पक्षवाढीसाठी किती वेळ दिला, हाही संशोधनाचा विषय आहे.
वाशिमचे पालकमंत्रीपद सोडल्यानंतर मुश्रीफांनी कोल्हापूरमध्ये पक्षवाढीसाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, इतर मंत्र्यांचे काय, असा प्रश्न आहे. पक्षवाढीसाठी कोणी किती योगदान दिले. जिल्हापातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मंत्र्यांनी किती ताकद दिली, त्यांची किती कामे मार्गी लावली. त्यांनी आणलेली सर्वसामान्यांची किती कामे करण्यात आली, यावरही कोणी काही बोलायला तयार नाही.
दुसरीकडे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे बुलढाण्याचे पालकमंत्रिपद आहे. पण त्यांचा बहुतांश वावर हा सातारा जिल्ह्यातच असतो. त्यांनी साताऱ्यात पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. पण बुलढाण्यात पक्षवाढीसाठी मंत्रिमहोदयांनी किती प्रयत्न केले, असा प्रश्न आहे. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा, आधार देण्याची गरज आहे. मात्र, कोणताही मंत्री बांधावर फिरकला नसल्याचे दिसून येते.
औषध व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे हिंगोलीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याबाबत हिंगोलीतूनच तक्रारी येत आहेत. अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असताना पालकमंत्रीच जिल्ह्यात फिरकत नाहीत, मग पक्षाशी लोक कसे जोडले जाणार, असा प्रश्न आहे.
प्रफुल पटेल यांच्यानंतर खुद्द पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर थेट निर्वाणीचा इशारा दिला. पक्षापेक्षा काही मंत्री महोदयांना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपणं मोकळं करूया आणि इतरांना संधी देऊया. ज्यांना ज्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालं आहे, त्यांना त्या जिल्ह्यात जावंच लागणार आहे. त्या ठिकाणी फक्त शासकीय झेंडावंदनासाठी जाऊन चालणार नाही. त्या ठिकाणी जाऊन तेथील जिल्हाध्यक्ष व इतरांना सोबत घेऊन जनतेच्या अडचणी सोडवाव्या लागतील. ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील तर त्या दुरुस्त कराव्या लागतील. नाही तर खुर्ची खाली करावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
प्र.1: चिंतन शिबिर कोठे झाले?
उ. – विदर्भातील नागपूर येथे.
प्र.2: प्रफुल पटेल यांचा मुख्य संदेश काय होता?
उ. – “फक्त दोन तासांच्या दौऱ्यासाठी नका येऊ; स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद द्या,” असा इशारा.
प्र.3: अजित पवारांनी मंत्र्यांना काय सांगितले?
उ. – “जिल्ह्यात जाऊन जनतेच्या अडचणी सोडवा, नाहीतर पद सोडा,” असा कठोर इशारा दिला.
प्र.4: कोणत्या जिल्ह्यांत पालकमंत्र्यांवर टीका झाली?
उ. – भंडारा-गोंदिया, वाशिम, बुलढाणा आणि हिंगोली जिल्ह्यांत सक्रियता कमी असल्याची चर्चा झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.