Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सभेसाठी मालेगावच का निवडलं? 'ही' आहेत कारणं...

सरकारनामा ब्यूरो

Nashik : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज (दि.26 मार्च) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धडाडणार आहे. मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत.

शिवसेनेतील बंडानंतर ठाकरेंनी रत्नागिरीतील खेडमध्ये पहिली जाहीर सभा घेतली. त्यानंतर आज ते मालेगावमध्ये जाहीर सभा घेत आहेत. त्यामुळे मालेगावच्या सभेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र, ठाकरेंनी सभेसाठी मालेगावच का निवडले? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

दादा भुसेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा

मालेगाव हे दादा भुसेंचं होमग्राऊंड आहे. सध्या दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर दादा भुसे शिंदे गटात गेले. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद तेथे कमी झाली. मात्र, काही दिवसांपूर्वी तेथील भाजपचे अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ठाकरे गटाची ताकद वाढण्यासाठी तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची ही सभा महत्वाची ठरणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न

सध्या ठाकरे गटाचा नाशिक, धुळे, नंदुरबारमधून विधानसभेवर एकही आमदार नाही. या भागातीलच आमश्या पाडवी हे विधानपरिषदेवर आमदार आहेत. तर दादा भुसे, गुलाबराव पाटील, सुहास कांदे हे खानदेशातील महत्वाचे नेते शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या मोर्चेबांधणीसाठी तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आजची त्यांची सभा महत्वाची ठरेल, असं बोललं जात आहे.

मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न?

उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज मालेगावमध्ये होत आहे. मात्र, त्यांनी मालेगावमध्येच सभा घेण्याच कारण काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहेत. खरं तर मालेगाव मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांना एक प्रकारे उभारी देण्याचा प्रयत्न या सभेतून असणार आहे. तसेच मालेगावमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे. मुस्लीम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न या सभेच्या माध्यमातून त्यांचा असेल.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट अनेक वेळा आमने-सामने आले आहेत. याबरोबरच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यामुळे या सर्व घडामोडींवर ठाकरे आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT